Friday, 1 September 2023

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०१ सप्टेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०१ सप्टेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक युद्धनौकेचं आज मुंबईत जलावतरण करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पत्नी सुदेश धनखड यांच्या हस्ते या युद्धनौकेनं जलावतरण होणार आहे.

****

अणुविद्युतनिर्मितीच्या क्षेत्रात भारतानं मैलाचा दगड पार केला असून, गुजरातमध्ये काक्रापार इथल्या देशातल्या सर्वाधिक क्षमतेच्या अणुविद्युत केंद्राचं तिसरं युनिट शंभर टक्के क्षमतेनं कार्यान्वित झालं आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून वैज्ञानिक आणि अभियंत्यांचं अभिनंदन केलं आहे.

****

स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा आणि अमृत अभियानाचा दुसरा टप्पा यांसाठी एकूण चार लाख ७१ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या दोन्ही अभियानांचा पहिला टप्पा उद्दिष्टपूर्तीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी परिणामकारक पद्धतीनं सुरु असून, २०१४ ते २०२३ या काळात देशांतल्या शहरांच्या स्थितीत लक्षणीय परिवर्तन घडून आल्याचं ते म्हणाले.

****

रायगडच्या महाड तालुक्यात मांडले धबधब्यामध्ये दोन तरूणांचा काल बुडून मृत्यू झाला. हे दोघेही रायगड नजिकच्या हिरकणी वाडीतील रहिवासी आहेत. मित्रांबरोबर धबधब्याच्या ठिकाणी सहलीला आले असताना ते दोघेही पाण्यात बुडाले. बचावकार्य राबवत या दोन्ही तरूणांचे मृतदेह काल रात्री सापडले.

****

सहावा राष्ट्रीय पोषण माह आजपासून सुरु होत आहे. कुपोषणाचा सर्वसमावेशकपणे सामना करणं हे पोषण माहचं या वर्षीचं उद्दिष्ट आहे. गर्भधारणा, बाल्यावस्था, बालपण आणि पौगंडावस्था या मानवी जीवनातल्या गंभीर टप्प्यांबद्दल व्यापक जागरूकता निर्माण करणं, हा पोषण माहचा उद्देश आहे.

****

ओमानमध्ये सलालाह इथं सुरु असलेल्या पुरुषांच्या अशियाई हॉकी फाईव्ह एस विश्वचषक पात्रता स्पर्धेत भारतीय संघानं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. साखळी सामन्यात भारतानं मलेशियाचा सात - पाच आणि जपानचा ३५ - एक असा पराभव केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...