Friday, 1 September 2023

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date: 01 September 2023 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi


आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ०१ सप्टेंबर २०२   दुपारी १.०० वा.

****

संपूर्ण देशभरात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या विचारानं केंद्र सरकारनं 'एक देश एक निवडणूक' समिती स्थापन केली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष असतील. सध्या यावर केवळ विचार सुरू आहे, समिती अहवाल सादर करेल, त्यानंतर लोकांकडून मतं मागवले जातील. संसदेतही यावर चर्चा होण्याची शक्यता केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केली. जयपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे. यात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची हे लवकरच निश्चित होईल, त्यानंतर त्याची माहिती दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'एक देश एक निवडणूक' या निर्णयाचं समर्थन केलं आहे. सातत्यानं निवडणुका होत असल्यानं वेळ, पैसा आणि मनुष्यबळाचा अपव्यय होतो. एकाचवेळी सर्व निवडणुका झाल्या तर उर्वरित वेळ विकासकांमाना गती देण्यासाठी वापरता येईल, असं त्यांनी म्हटलं आहे. 

****

महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक युद्धनौकेचं आज मुंबईत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पत्नी सुदेश धनखड यांच्या हस्ते जलावतरण झालं. ही युद्धनौका आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असून, देशाच्या सागरी इतिहासातला हा एक मैलाचा दगड असल्याचं, उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी भारत गुंतवणूक करत राहील, असा संदेश महेंद्रगिरीच्या जलावतरणाने दिला असल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो,  सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात येणारा पहिला उपग्रह आदित्य एल-वनचं, उद्या प्रक्षेपण करणार आहे. या प्रक्षेपणासाठीची उलट गणना सुरु झाली आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा अवकाश केंद्रातून, उद्या  सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी हा उपग्रह प्रक्षेपित केला जाईल. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या, एल-वन लॅग्रेंज बिंदूच्या भोवती प्रभामंडळ कक्षेत हा उपग्रह सोडला जाईल. तिथपर्यंत पोचायला त्याला चार महिने लागतील. या कक्षेमुळे आदित्य एल -वन ला अवकाशातल्या ग्रहणासारख्या कोणत्याही घडामोडींचा अडथळा न येता सौर घडामोडींचं निरीक्षण करणं शक्य होईल. सौर वारे आणि सूर्याच्या वातावरणाचा अभ्यासही हा उपग्रह करणार आहे.

****

व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत पेट्रोलियम कंपन्यांनी १५८ रुपयांनी कमी केली आहे. पूर्वी १ हजार ६४० रुपयांना मिळणारं १९ किलो वजनाचं सिलिंडर, आता मुंबईत १ हजार ४८२ रुपयांना मिळेल. औरंगाबादमध्ये या सिलिंडरची किंमत १ हजार ५८६ रुपये ५० पैसे इतकी असेल.

****

रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जया वर्मा सिन्हा यांनी आज पदभार स्वीकारला. भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेच्या अधिकारी असलेल्या सिन्हा या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला आहेत. मंत्रीमंडळाच्या नियुक्ती समितीनं काल त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती. वर्षभर त्या या पदावरचा कार्यभार सांभाळतील. यापूर्वी त्या रेल्वे बोर्डाच्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या. १९८८ मध्ये त्या भारतीय रेल्वे ट्राफिक सेवेत रुजू झाल्या होत्या.

****

भारतीय माहिती सेवेच्या वरीष्ठ अधिकारी वसुधा गुप्ता यांनी आकाशवाणी आणि राष्ट्रीय वृत्त विभागाच्या प्रधान महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी त्या महासंचालक पदी त्या कार्यरत होत्या. 

****

दहीहंडी उत्सव आणि प्रो-गोविंदा लीग स्पर्धेत, मानवी मनोरे रचताना होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर, ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा शासन निर्णय जारी केल्याचं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितलं. ५० हजार गोविदांव्यतिरिक्त, आणखी २५ हजार गोविंदांना विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्यात येईल, असं बनसोडे यांनी सांगितलं. त्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीला प्रति गोविंदा ७५ रुपये विमा हप्ता, याप्रमाणे एकूण १८ लाख ७५ हजार इतका निधी देण्यासाठी, दहीहंडी समन्वय समितीला वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

****

डायमंड लीग जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं रौप्य पदक जिंकलं आहे. स्वित्झर्लंडमध्ये काल झालेल्या अंतिम फेरीत नीरजनं ८५ पूर्णांक ७१ मीटर अंतरावर भाला फेकला. झेक प्रजासत्ताकच्या जाकुब वादलेचनं सुवर्ण पदक जिंकलं. १७ सप्टेंबरला अमेरिकेत होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज पात्र ठरला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...