Saturday, 22 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 22.06.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 22 June 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २२ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

स्पर्धा परिक्षांमधले गैरप्रकार आणि अनियमिततेला आळा घालण्यासाठीचा, सार्वजनिक परिक्षांमधील अयोग्य माध्यमांना प्रतिबंध कायदा २०२४ आजपासून लागू झाला. कार्मिक मंत्रालयानं राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे ही माहिती दिली. या कायद्यात गुन्हेगारांना जास्तीत जास्त दहा वर्ष तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. यासंदर्भातलं विधेयक संसदेनं फेब्रुवारी महिन्यात मंजुर केलं होतं. केंद्रीय लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, राष्ट्रीय चाचणी संस्था - एनटीए रेल्वे भरती आणि बँकिंग भरती अशा विविध सार्वजनिक परिक्षांमध्ये होणार्या अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे.

****

ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि व्याख्याते म्हणून निवड करण्यासाठी संयुक्तपणे घेतली जात असलेली सी एस आय आर युजीसी नेट परीक्षा राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेनं पुढे ढकलली आहे. २५ जून ते २७ जून दरम्यान ही परिक्षा नियोजित होती. मात्र परीक्षा आयोजित करण्यासाठी पुरेशी संसाधनं नसल्याचं सांगत अपरिहार्य कारणानं ही परिक्षा पुढे ढकलली असल्याचं एनटीएनं म्हटलं आहे.

****

राज्य शासनाच्यावतीने काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी विभागाच्या वतीने नऊ कोटी ३० लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.            जम्मू -काश्मीर सरकारने बडगाम जिल्ह्यात इच्चगाम तालुक्यातली अडीच एकर जमीन राज्य सरकारला महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी प्रदान केली आहे.

****

मानवी तस्करी आणि बळजबरीनं सायबर गुन्हे करण्यास प्रवृत्त करणाऱ्या टोळीविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं पाच आरोपींच्या विरोधात काल मुंबईच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. यात दोन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. 

****

हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मागणीनुसार रासायनिक खतं, बियाणं आणि इतर कृषी निविष्ठा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश, हिंगोलीचे पालकमंत्री आणि पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. अद्याप जिल्ह्यात पुरेसा पाऊस न पडल्यानं ३२ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. पावसाचा खंड जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या पेरणी करु नये असं आवाहनही सत्तार यांनी केलं. बँकांनी शेतकऱ्यांना १०० टक्के खरीप पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री - सी आय आय या संघटनेच्या मराठवाडा विभागाच्या कार्यालयाचं उद्घाटन टाटा केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा सी आय आयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आर मुंकुदन यांच्या हस्ते झालं. सीआयआयचे उपाध्यक्ष ऋषी कुमार बागला आणि मराठवाड्याचे अध्यक्ष सुनील किर्दक यावेळी उपस्थित होते. मराठवाड्यातली पाणी समस्या, रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासह पर्यावरण संवर्धनासाठी आम्ही काम करू, असं मुकुंदन यावेळी म्हणाले.

****

लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या देवकरा ग्रामपंचायतीमध्ये 'माझं लातूर, हरित लातूर' या पाच हजार झाडं लावण्याच्या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनाने वटपौर्णिमा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचं आवाहन केलं होतं, या आवाहनाला प्रतिसाद देत देवकरा ग्रामपंचायतीने ही मोहिम सुरु केली आहे. गावात टाळ-मृदुंगाच्या गजरात वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आलं, यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजनगर महानगरपालिकेच्या वतीनं आज संत कबीर यांची जयंती साजरी करण्यात आली. मनपा मुख्यालयात जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद यांच्या हस्ते संत कबीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

****

टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश दरम्यान सामना होणार आहे. अँटिग्वा इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. या स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं अमेरिकेचा नऊ गडी राखून पराभव केला. 

****

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात काल मुसळधार पाऊस पडला. मंडणगडमध्ये १०५, खेडमध्ये १०१, तर चिपळूणमध्ये ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज सकाळी जिल्ह्यातल्या पावसाचा आणि सर्व यंत्रणांचा आढावा घेतला. जिल्ह्यातली परिस्थिती नियंत्रणात असून, सर्व यंत्रणा सतर्क असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...