Saturday, 22 June 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.06.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 June 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ जून २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      राष्ट्रीय परीक्षा परिषदेच्या कार्यान्वयासंदर्भात उच्चस्तरीय समितीची स्थापना

·      सरकारच्या आश्वासनानंतर ओबीसी नेत्यांचं उपोषण तात्पुरतं स्थगित

·      अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन-छत्रपती संभाजीनगरात हज हाऊसमध्ये कार्यालय

आणि

·      टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर एट फेरीत आज भारत-बांगलादेश सामना

****

राष्ट्रीय परीक्षा परिषदेच्या कार्यान्वयासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. परीक्षा प्रक्रियेतल्या सुधारणा, माहिती सुरक्षा नियमन प्रणाली, तसंच परीक्षा परिषदेची एकूण संरचना आणि कार्यान्वयन, याचा ही समिती आढावा घेईल, तसंच दोन महिन्यात मंत्रालयाला अहवाल सादर करेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीनं घेण्यासंदर्भात ही समिती एक प्रणाली सुनिश्चित करेल.

****

स्पर्धा परीक्षांमधले गैरप्रकार आणि अनियमिततेला आळा घालण्यासाठीचा, सार्वजनिक परीक्षांमधील अयोग्य माध्यमांना प्रतिबंध कायदा २०२४ आजपासून लागू झाला. कार्मिक मंत्रालयानं राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे ही माहिती दिली. या कायद्यात गुन्हेगारांना जास्तीत जास्त दहा वर्ष तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.

दरम्यान, नेट परीक्षेतल्या गैरप्रकारासंदर्भात उत्तरप्रदेशातल्या कुशीनगर इथून एकाला ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.

****

ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि व्याख्याते म्हणून निवड करण्यासाठी संयुक्तपणे घेतली जात असलेली सी एस आय आर युजीसी नेट परीक्षा राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेनं पुढे ढकलली आहे. २५ जून ते २७ जून दरम्यान ही परीक्षा नियोजित होती. मात्र परीक्षा आयोजित करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचं सांगत अपरिहार्य कारणानं ही परीक्षा पुढे ढकलली असल्याचं एनटीएनं म्हटलं आहे.

****

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेतलेल्या सामायिक प्रवेश प्रक्रिया-सीईटीबाबतचे नागरिकांचे आक्षेप वस्तुस्थितीला धरून नसल्याचं, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी म्हटलं आहे. सदर परीक्षा वेगवेगळ्या दिवशी प्रत्येकी दोन सत्रात घेण्यात आलेली आहे. त्यामुळे विविध सत्रांमधील समान गुण मिळालेल्या उमेदवारांना वेगवेगळे पर्सेंटाईल मिळाल्याचं सरदेसाई यांनी सांगितलं. ही प्रक्रिया संगणकाधारित असल्याने, पूर्णपणे पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेपरहीत आहे. त्यामुळे विद्यार्थी तसंच पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन आयुक्त सरदेसाई यांनी केलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री इथं आंदोलन करणारे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आज आपलं उपोषण स्थगित केलं. तत्पूर्वी राज्य सरकारच्या एका शिष्टमंडळाने आज वडीगोद्री इथं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर यांच्यास१२ जणांचा समावेश होता. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं आश्वासन या शिष्टमंडळाने दिलं. त्यानंतर हाके यांनी उपोषण तात्पुरतं स्थगित केलं.

दरम्यान, बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटणाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन सरकारनं दिल्यामुळे आंदोलन स्थगित केल्याचं, हाके यांनी सांगितलं आहे.

छगन भुजबळ यांनी यावेळी बोलतांना, आमच्या ताटातले आम्हाला राहू द्या. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, या मागणीचा पुनरुच्चार केला.

सरकार कोणावरही अन्याय करणार नाही, असं मंत्री धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. तर ओबीसी आरक्षणाचं संरक्षण झालं पाहिजं, असं मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं.

****

हाके यांच्या या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा सुरुवाती पासूनच पाठिंबा असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज जाहीर केलं आहे. ते आज मुंबईत बोलत होते. ओबीसी आणि मराठा समाजातील नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असं आवाहन आठवले यांनी यावेळी केलं आहे.

दरम्यान, ओबीसी समाजाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरनजिक झाल्टा फाटा परिसरात रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळे या मार्गावरची वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.

****

मराठा आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी या दोन मागण्यांबाबत राज्य शासनावर आमचा विश्वास असून, १३ जुलै पर्यंत आम्ही वाट पाहणार, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं माध्यमांशी बोलत होते. मराठा सामाजाला आजवर दिलेल्या कुणबी नोंदी रद्द होऊ देणार नाही, असंही जरांगे म्हणाले.

****

लोकशाही मार्गाने प्रत्येकाने आंदोलन करावे मात्र आंदोलनात हिंसा नसावी अशी अपेक्षा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे. आज ते छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा समाजाला पूर्वी ही कुणबी प्रणामपत्र दिलं जात होतं, यात या राज्य सरकारने नवीन काहीही केलं नाही अशी टिप्पणीही दानवे यांनी केली. राजकीय नेत्यांनी भूमिका घेतांना जातीय सलोखा कायम राहिल यांची खबरदारी घ्यावी, असं दानवे यांनी नमूद केलं.

****

खासगी उपसा सिंचनासाठीच्या वाढीव दरांना स्थगिती देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच ती पूर्ण होणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. २९ मार्च २०२२ रोजी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने काढलेल्या आदेशामुळे खासगी उपसा सिंचनाला प्रवाही उपसा सिंचनाचे दर लागू झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षानं काल अटल सेतुला भेगा पडल्याच्या अफवा पसरवल्यानंतर या पाणीपट्टीसंदर्भातही संभ्रम पसरवत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

****

राज्य शासनाने अल्पसंख्याक आयुक्तालयांची स्थापना केली असून अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मोईन ताशिलदार यांच्याकडे आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या हज हाऊसमध्ये हे आयुक्त कार्यालय असणार आहे. कार्यालयाचा कारभार चालवण्यासाठी ६० अधिकारी-कर्मचारी यांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या वर्षी २ फेब्रुवारीला हज हाऊसच्या लोकार्पण सोहळ्यात अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी हे आयुक्तालय स्थापनेची घोषणा केली होती.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री - सी आय आय या संघटनेच्या मराठवाडा विभागाच्या कार्यालयाचं उद्घाटन टाटा केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा सी आय आयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आर मुकुंदन यांच्या हस्ते झालं. सीआयआयचे उपाध्यक्ष ऋषी कुमार बागला आणि मराठवाड्याचे अध्यक्ष सुनील किर्दक यावेळी उपस्थित होते. मराठवाड्यातली पाणी समस्या, रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासह पर्यावरण संवर्धनासाठी काम करण्याचा मानस, मुकुंदन यांनी यावेळी व्यक्त केला.

****

माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षात दहा वर्षे काम करण्याची संधी मिळाली, याबाबत पक्ष नेतृत्वाचे त्यांनी आभार मानले आहेत.

****

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि महाराष्ट्र क्रीडा संचलनालयाच्या वतीनं उद्या २३ जून रोजी जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्राचं नाव उज्वल करणाऱ्या ऑलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान, ऑलिम्पिक दौड, हॉकी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा केला जाणार आहे. शासनाच्या वतीने सर्व जिल्ह्यांना ऑलिम्पिक दिन साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सुपर आठ फेरीतील सामना होणार आहे. अँटीग्वा इथं रात्री आठ वाजेपासून हा सामना खेळवला जाणार आहे. भारतानं सुपर आठ फेरीतील अफगाणिस्तानविरूध्दचा आपला पहिला सामना जिंकला असून बांगलादेशला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.

या स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडीजनं अमेरिकेचा नऊ गडी राखून पराभव केला. उद्या ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे.

****

छत्रपती संभाजनगर महानगरपालिकेच्या वतीनं आज संत कबीर यांची जयंती साजरी करण्यात आली. मनपा मुख्यालयात जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद यांच्या हस्ते संत कबीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

****

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथल्या बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेत १९६५ आणि १९७१ च्या युद्धात पराक्रम गाजवलेल्या टी-५५ या रणगाड्याच्या शौर्य स्मारकाचं आज उद्‌घाटन झालं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...