Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 27 October 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
जीएसटी बचत महोत्सवामुळे नागरिकांमध्ये उत्साह-मन की बातमधून
पंतप्रधानांचं प्रतिपादन
·
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर-इंडिया मेरिटाईम
वीक परिषदेचं आज उद्घाटन
·
डॉ. संपदा मुंडे मृत्यूप्रकरणी कारवाईचं मुख्यमंत्र्यांचं
आश्वासन-एसआयटीद्वारे तपासाची मागणी
·
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर-डॉ. जयंत नारळीकर यांना
मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार
आणि
·
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत बांगलादेश सामना
रद्द-दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण
****
देशभरात
सध्या जीएसटी बचत महोत्सव सुरू असून यामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते काल देशवासियांशी
संवाद साधत होते. हा या कार्यक्रमाचा १२७ वा भाग होता. यंदाच्या सणासुदीच्या काळात
स्वदेशी वस्तूंची खरेदी प्रचंड वाढल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
देशवासियांना
छट पूजेच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या. येत्या ३१ ऑक्टोबरला लोहपुरुष सरदार पटेल यांच्या
जयंतीदिनाचं स्मरण करून, सरदार पटेल यांच्या योगदानाला त्यांनी उजाळा दिला.
संस्कृत
भाषेचं महत्व आणि तिच्या संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली.
यासाठी तरुण वर्ग करत असलेल्या प्रयत्नांमुळे आनंद वाटत असल्याची भावना पंतप्रधानांनी
व्यक्त केली. 'वंदे मातरम्' हे देशाचं राष्ट्रगान यावर्षी
७ नोव्हेंबरला दीडशेव्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान म्हणाले...
7 नवंबर को हम ‘वन्दे मातरम्’ के 150वें वर्ष के उत्सव में प्रवेश करने
वाले हैं| 1896 में गुरुदेव रवीन्द्रनाथ टैगोर ने पहली बार इसे गाया था| हमें ‘वन्दे मातरम्’ के 150वें वर्ष को भी यादगार बनाना है| आने वाले समय में ‘वन्दे मातरम्’
से जुड़े कई कार्यक्रम होंगे| मैं चाहूँगा, हम सब देशवासी ‘वन्दे मातरम्’ के गौरवगान के लिए स्वत:
स्फूर्त भावना से भी प्रयास करें| आप मुझे अपने सुझाव #VandeMatram150 के साथ जरूर भेजिए| मुझे आपके
सुझावों का इंतजार रहेगा|
ऑपरेशन
सिंदूरनं प्रत्येक भारतीयाला अभिमानानं भारून टाकलं आहे, असंही पंतप्रधानांनी
नमूद केलं. नक्षलवादाविरोधातल्या कारवाईमुळं यंदाच्या सणात आनंदाचे दीप प्रज्वलित झाले,
असं सांगून, नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करायच्या
ध्येयाचा पुनरुच्चार त्यांनी केला.
भारतीय
वंशाचे श्वान आजूबाजूच्या परिस्थितीशी सहजपणे जुळवून घेणारे असतात, त्यामुळे,
यापूर्वी देशवासियांना आणि सशस्त्र दलांना भारतीय जातीचे श्वान पाळायचं
आवाहन केल्याचं स्मरण पंतप्रधान मोदी यांनी करून दिलं. त्याला प्रतिसाद देत सीमा सुरक्षा
दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं पथकांमध्ये भारतीय वंशाच्या श्वानांची संख्या वाढवल्याची
माहिती त्यांनी दिली. सीमा सुरक्षा दलानं श्वानांना भारतीय नावं देण्याची परंपरा सुरू
केल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या मुधोळ हाउंड, तसंच उत्तरप्रदेशातल्या रामपूर हाउंड या जातीच्या श्वानांना प्रशिक्षण दिलं
जात असून, या श्वानांच्या धाडसी कामगिरीची माहिती देतांना पंतप्रधान
म्हणाले...
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. काल रात्री त्यांचं मुंबई विमानतळावर आगमन
झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यासह
मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं. आज मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक या पाच दिवसीय परिषदेचं
शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि ओडिशाचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. खोल समुद्रात
मासेमारी करण्यासाठीच्या विशेष नौकांचं गृहमंत्री शहा यांच्या हस्ते आज माझगांव गोदीत
हस्तांतरण होणार आहे.
****
हरित माणदेश
निर्माण करणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
आहे. काल फलटण इथं नीरा देवघर प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या
प्रारंभासह एक हजार ३५२ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी
मुख्यमंत्र्यांनी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येबद्दल दुःख व्यक्त केलं तसंच त्यांच्या
मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा होईल, असं आश्वासन दिलं.
****
दरम्यान, बीड मधल्या
कवडगाव इथं राहणाऱ्या डॉ मुंडे यांच्या कुटुंबीयांची काल पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
यांनी भेट घेऊन सांत्वन केलं. डॉ. संपदा यांचा मृत्यू वेदनादायी असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू असं आश्वासन
त्यांनी दिलं.
आमदार सुरेश
धस तसंच आमदार धनंजय मुंडे यांनीही काल संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन
सांत्वन केलं. मुंडे यांचा मृत्यू हा संशयास्पद असून, या प्रकरणी
वरिष्ठ आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक एसआयटी
स्थापन करून वस्तुनिष्ठ चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं या
दोन्ही नेत्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या प्रकरणातल्या
गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी डॉ. संपदा मुंडे यांच्या वडिलांनी
केली आहे.
****
विज्ञान
क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार काल जाहीर
झाले. डॉ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार घोषित झाला आहे. विज्ञान
युवा श्रेणी अंतर्गत, विविध विषयांमध्ये १४ युवा शास्त्रज्ञांची निवड झाली आहे,
तर कृषी विज्ञानामधल्या योगदानासाठीचा विज्ञान टीम पुरस्कार,
‘टीम अरोमा मिशन सीएसआयआर’ ला दिला जाईल.
नागपूरच्या
नीरी, अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन, यांची
यंदाच्या ‘विज्ञान श्री’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
****
आणीबाणीच्या
पन्नाशी निमित्त' तत्कालीन 'मराठवाडा' वृत्तपत्रातील गोपाळ साक्रीकर, निळू दामले आणि अरविंद
वैद्य या तीन ज्येष्ठ पत्रकारांना अनंत भालेराव प्रतिष्ठान तर्फे गौरवण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि
मानपत्र असं या गौरवाचं स्वरूप आहे. येत्या नऊ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथं
निवृत्त न्यायमूर्ती सुनील देशमुख यांच्या हस्ते या सर्वांचा गौरव करण्यात येणार आहे.
यावेळी 'आणीबाणी: काल आज आणि उद्या' या
विषयावर विनोद शिरसाठ यांचं व्याख्यान होणार आहे.
****
क्रिकेट
महिला विश्वचषक
एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत काल नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावरचा भारत बांगलादेश
सामना पावसामुळे रद्द करावा लागला. पावसामुळे प्रत्येकी २७ षटकांच्या झालेल्या या सामन्यात
नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत, बांगलादेशला
नऊ बाद ११९ धावांवर रोखलं. डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला २७ षटकांत १२६ धावांचं लक्ष्य
दिलं गेलं. या लक्ष्याचा पाठलाग करतांना भारतीय संघाने बिनबाद ५७ धावा केल्या असतांना,
पावसामुळे सामना थांबला, तो परत सुरू होऊ शकला
नाही. त्यामुळे सामना रद्द करून, दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात
आला.
दरम्यान, भारतानं या
स्पर्धेच्या उपांत्य फेरीत या पूर्वीच प्रवेश केला असून, मालिकेतला
दुसरा उपांत्य सामना येत्या ३० तारखेला नवी मुंबईत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार
आहे.
****
क्रीडा
मंत्री माणिकराव कोकाटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्पोर्ट
ऑथरिटी ऑफ इंडिया केंद्राला भेट दिली. यावेळी उपसंचालक आणि एनसीओई छत्रपती संभाजीनगरच्या
केंद्रप्रमुख डॉ. मोनिका घुगे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील
क्रीडा रचना अधिक बळकट करण्यासाठी खेळाडू आणि प्रशिक्षक विकास, पायाभूत सुविधा
वाढ आणि तळागाळातील खेळाडूंना क्रीडा प्रोत्साहन यासाठी राज्य आणि राष्ट्रीय योजना
प्रभावीपणे राबवण्याबाबत चर्चा झाली.
****
परभणी जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांनी जल जीवन मिशन योजने अंतर्गत
परभणी तालुक्यातील ग्रामपंचायत लोहगाव, मांडाखळी आणि ब्राह्मणगाव या ग्रामपंचायतींना
प्रत्यक्ष भेटी देऊन गावातील पाणी पुरवठ्याची पाहणी केली. गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या
समस्या माथूर यांनी जाणून घेतल्या. तसंच योजनेची योग्य अंमलबजावणी व्हावी याबाबत ग्रामपंचायत
अधिकारी आणि सरपंच यांना निर्देश दिले.
****
स्थानिक
स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मोठ्या ताकदीने लढणार
असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या
संपर्क मंत्रीपदी नियुक्त झालेले पाटील यांनी काल पक्ष कार्यालयात कार्यकर्ता संवाद
मेळाव्याला मार्गदर्शन करतांना पक्षाची ही भूमिका स्पष्ट केली. या निवडणुकांमध्ये महिलांच्या
बरोबर तरुणांना देखील अधिक संधी दिली जाणार असल्याचं, पाटील यांनी
सांगितलं.
****
No comments:
Post a Comment