Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 29 October 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
आठवा वेतन आयोग स्थापन करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या
बैठकीत मंजुरी
·
अतिवृष्टीबाधितांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये मदत देण्याचा
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
·
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चासह
अतिरिक्त निधी देण्यास मान्यता
·
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर
·
छत्रपती संभाजीनगर इथं अवैध कॉल सेंटरचा पर्दाफाश-सुमारे
सव्वाशे तरुण ताब्यात
आणि
·
'मोंथा' चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीवर धडकलं-महाराष्ट्राच्या
अनेक भागात पाऊस
****
आठवा वेतन
आयोग स्थापन करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि
प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही
माहिती दिली. ते म्हणाले...
बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
दरम्यान, येत्या रबी
हंगामासाठी फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतांसाठीच्या अनुदानित किमतींनाही केंद्रीय मंत्रिमंडळानं
काल मान्यता दिली. यासाठी सुमारे ३७ हजार ९५२ कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आलं.
हे अनुदानित दर एक ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत.
****
विकसित
महाराष्ट्र-२०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मान्यता
देण्यात आली. याच्या अंमलबजावणीसाठी विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट गठित
करण्यात येणार आहे. या अंतर्गत कृषी, उद्योग, सेवा,
पर्यटन अशा १६ गटात शंभर उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
अतिवृष्टीबाधितांसाठी
सुमारे ११ हजार कोटी रुपये मदत देण्याला कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुढच्या
पंधरा दिवसांत हा निधी आपदग्रस्तांच्या बॅक खात्यावर जमा होणार असल्याचं, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता
प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं
घेतला. त्यासाठी संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव
या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चाला तसंच राज्य शासनाच्या ५० टक्के
हिश्श्यानुसार जास्तीचा निधी देण्यालाही मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली. या निर्णयाबद्दल
आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचे आभार मानले...
बाईट – आमदार राणा
जगजीतसिंह पाटील
****
राज्यात
बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा, म्हणजे एम सँडचा वापर करण्याबाबत धोरण
निश्चितीसंबंधीचा शासन आदेश काल जारी झाला. या संदर्भात मंजुरीचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना
बहाल करण्यात आले आहेत.
****
माजी खासदार
डॉक्टर हीना गावित आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह काल भारतीय जनता पक्षात परतल्या. गेल्या
विधानसभा निवडणुकीच्या वेळी गावीत यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक २०२५ मध्ये मेरीटाईम
लीडर्स परिषदेला पंतप्रधान आज संबोधित करतील. ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचं अध्यक्षपदही
ते भूषवणार आहेत.
****
इयत्ता
पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढच्या वर्षी ८ फेब्रुवारीला घेण्यात येणार
आहे. या परीक्षेसाठी २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत नियमित शुल्कासह
तर, १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज
करता येणार आहे.
****
राज्यातील
स्वायत्त संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती, शिष्यवृत्तीचा
लाभ मिळवण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वं निश्चित करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने
समिती नियुक्त केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दहा दिवसात जाहिरात प्रसिद्ध
करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
****
उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी काल मंत्रालयात नांदेड जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीचा
आढावा घेतला. सिंचन प्रकल्पांचं काम वेगानं पूर्ण होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वेळेवर
पाणी उपलब्ध व्हावं, यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.
****
लोहपुरुष
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने दक्षता जनजागृती सप्ताह सध्या पाळण्यात
येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन
छत्रपती संभाजीनगर इथले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत
शिनगारे यांनी केलं आहे.
बाईट – अतिरिक्त
पोलीस अधीक्षक शशिकांत शिनगारे
या सप्ताहात
राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबाबत शिनगारे यांनी दिलेली माहिती, आमच्या प्रासंगिक
या सदरात आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम आमच्या केंद्रावरून आज सकाळी पावणे अकरा वाजता
प्रसारित होणार आहे.
****
सरदार पटेल
यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त परभणी कृषी विद्यापीठ परिसरात काल वॉक फॉर युनिटी पदयात्रा
काढण्यात आली. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी पदयात्रेविषयी माहिती दिली, ते म्हणाले...
बाईट – पोलीस अधीक्षक
रवींद्र सिंह परदेशी
****
छत्रपती
संभाजीनगर इथं चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय अवैध कॉल सेंटरचा
पोलिसांनी पर्दाफाश केला. सोमवारी मध्यरात्री केलेल्या या कारवाईत जवळपास १०० ते १२५
तरूण तरूणींना ताब्यात घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. जळगाव रोडलगत
असलेल्या वोखार्ट कंपनीच्या पाठिमागे हे अवैध कॉल सेंटर सुरू होतं.
****
बंगालच्या
उपसागरात निर्माण झालेलं 'मोंथा' चक्रीवादळ काल रात्री आंध्रप्रदेशात
मछलीपट्टणम् ते कलिंगपट्टणम् या भागात धडकलं.
या वादळाचा जोर कमी पडला आहे, मात्र आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि ओडिशासोबतच महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस सुरू आहे. राष्ट्रीय
आपत्ती प्रतिसाद दलाच्या २६ तुकड्या या तीन राज्यांच्या किनारपट्टीच्या भागात तैनात
आहेत.
मराठवाड्यात
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर,
नांदेड, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस
झाला. मांजरा धरणाचे दोन दरवाजे काल उघडण्यात आले, जायकवाडी धरणाच्याही
१८ दरवाजातून सुमारे १९ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातल्या काही जिल्ह्यांना
आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
****
ज्येष्ठ
साहित्यिक बाबू बिरादार यांचं देगलूर इथं निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. देगलूर तालुक्यात
मंगाजीवाडी इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
बीड जिल्ह्यात
अतिवृष्टीबाधित साडे चार लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३३५ कोटी ८६ लाख रूपये अनुदान
जमा झालं आहे. उर्वरित शेतकऱ्यांचं अनुदान जमा करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती
जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
दरम्यान, नुकसान भरपाई
न मिळाल्याने, परभणी इथं एका संतप्त शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांची
गाडी फोडल्याची घटना काल घडली. या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
****
प्रधानमंत्री
धनधान्य कृषी योजने अंतर्गत देशातल्या १०० आकांक्षित जिल्ह्यात राज्यातल्या छत्रपती
संभाजीनगरसह नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. या योजनेसाठी जिल्ह्याचा सर्वसमावेशक कृती
आराखडा विहित मुदतीत पूर्ण करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
यांनी दिले. ते काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते.
****
No comments:
Post a Comment