Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 28 October 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
महाराष्ट्रासह इतर तीन राज्यांतल्या शेतकऱ्यांकडून डाळी
आणि तेल बिया खरेदी करण्यासाठीच्या योजनांना केंद्र सरकारची मंजूरी
·
भारताचा सागरी दृष्टिकोन सुरक्षा-स्थैर्य-आत्मनिर्भरतेवर
आधारित-केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन, पंतप्रधान उद्या सागरी परिषदेला संबोधित
करणार
·
बारा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मतदार याद्या विशेष
सखोल आढावा मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ
·
सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडून पुढचे सरन्यायाधीश
म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस
आणि
·
मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव वगळता उर्वरीत जिल्ह्यांना
आज पावसाचा यलो अलर्ट
****
केंद्र
सरकारनं महाराष्ट्रासह तेलंगणा, ओडिशा आणि मध्य प्रदेश या चार राज्यातल्या
शेतकऱ्यांकडून डाळी आणि तेल बियांच्या खरेदी करण्यासाठीच्या योजनांना मंजूरी दिली आहे.
यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज
सिंह चौहान यांनी यांनी काल या राज्यांच्या कृषिमंत्र्यांसोबत 'प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान' अंतर्गत बैठक
घेतली. या योजनेत राज्यातल्या शेतकऱ्यांकडून १८ लाख ५० हजार ७०० मेट्रिक टन सोयाबीन,
तीन लाख २५ हजार ६८० मेट्रिक टन उडीद आणि ३३ हजार मेट्रिक टन मूग एवढी
खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी १२ हजार ६९० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं
चौहान यांनी सांगितलं.
****
भारताचा
सागरी दृष्टिकोन हा सुरक्षा, स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेवर आधारित असल्याचं
प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. शहा यांच्या हस्ते काल मुंबईत
इंडिया मेरिटाईम वीक या परिषदेचं उद्घाटन झालं, तेव्हा ते बोलत
होते. अलिकडच्या काळात करण्यात आलेल्या व्यापक संरक्षणात्मक सुधारणांमुळे भारत एक मजबूत
सागरी शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचंही शहा म्हणाले. गेट वे ऑफ इंडिया सारख्या ऐतिहासिक
वास्तू लाभलेल्या ठिकाणी होणाऱ्या मेरिटाईम वीक या परिषदेत गेट वे ऑफ वर्ल्ड दृष्टिकोनाविषयी
विचारमंथन होणार असल्याचं ते म्हणाले. वाढवण बंदराचा जगातल्या पहिल्या दहा सर्वोत्कृष्ट
बंदरामध्ये समावेश होईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला,
ते म्हणाले...
बाईट - केंद्रीय गृहमंत्री अमित
शहा
केंद्रीय
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
इंडिया मेरिटाईम वीक ही सागरी शिखर परिषद जगातल्या सर्वात प्रमुख परिषदेपैकी एक असून
त्यात ८५ देशांनी सहभाग घेतल्याचं सोनोवाल यांनी सांगितलं. तर, वाढवण बंदरामुळे भारताची सागरी शक्ती आणखी मजबूत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत
५५ हजार ९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार यावेळी करण्यात आले. या सामंजस्य करारामुळे
बंदर विकास, जहाज बांधणी, सागरी संशोधन,
आणि तांत्रिक प्रशिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असून,
सागरी व्यापार क्षमतेत वाढ होणार असल्याचा विश्वास, मत्स्य व्यवसाय मंत्री निलेश राणे यांनी व्यक्त केला.
**
दरम्यान, पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या सागरी शिखर परिषदेला संबोधित करणार आहेत. तसंच या परिषदेतील ग्लोबल
मेरीटाईम सीईओ फोरमचं अध्यक्षपद पंतप्रधान भूषवतील.
****
देशभरातल्या
मतदार याद्यांच्या विशेष सखोल आढावा मोहीम स्पेशल इंटेन्सिव रिविजन-एसआयआरच्या दुसऱ्या
टप्प्याला आजपासून प्रारंभ होत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल
नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र वगळता बारा राज्यं आणि केंद्रशासित
प्रदेशांमध्ये ही मोहीम राबवली जाणार असल्याचं ज्ञानेशकुमार यांनी सांगितलं, ते म्हणाले...
बाईट - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश
कुमार
****
भारताची
संरक्षण निर्यात आता २३ हजार ५०० कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची माहिती
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली. नवी दिल्ली इथं एसआयडीएम वार्षिक परिषदेला
ते काल संबोधित करत होते. स्वदेश निर्मित शस्त्रांस्त्रांमुळे भारताची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय
स्तरावर वाढल्याचंही सिंग यांनी सांगितलं.
****
अयोध्येतल्या
श्री राम जन्मभूमी मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र
ट्रस्टनं ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ नोव्हेंबर रोजी
या मंदिरावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
****
सरन्यायाधीश
भूषण गवई यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस
केली आहे. सरन्यायाधीश गवई येत्या २३ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सरन्यायाधीशांच्या
शिफारशीनंतर केंद्र सरकार अधिसूचना जारी करेल. त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत २४ नोव्हेंबर
रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतील. त्यांना १४ महिन्यांचा कालावधी मिळणार असून ते ९
फेब्रुवारी २०२७ रोजी सेवानिवृत्त होतील.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातील मतदार याद्यांसंदर्भात नागरिकांच्या असणाऱ्या आक्षेप आणि तक्रारींचं
तात्काळ निराकरण करावं, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. काल जिल्हाधिकारी
कार्यालयात याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या
पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ रोजी अंतिम केलेल्या मतदार याद्यांबाबत
काही ठिकाणी आक्षेप घेण्यात आले आहेत.
****
नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय पातळीवरील आण्विक डॉकिंग या विषयावरील
पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं काल उद्घाटन झालं. हे प्रशिक्षण २७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर
या दरम्यान चालणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली
हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलं आहे.
****
केंद्र
शासनाच्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच पीएम जनमन योजनेमध्ये
महावितरणने केलेली कामगिरी तसंच १३१ टक्के उद्दिष्टपूर्तीचं, केंद्रीय
विदयुत मंत्रालयाने कौतुक केलं आहे. याबाबत केंद्रीय ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल यांनी
राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांना पाठवलेल्या पत्रामध्ये
महावितरणच्या कामगिरीचा गौरव केला आहे.
****
पुण्यातल्या
एचएनडी हॉस्टेल प्रकरणी सकल जैन समाजातर्फे काल छत्रपती संभाजीनगर इथं मूकमोर्चा काढण्यात
आला. विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकलेल्या या आंदोलकांनी अशा घटना यापुढे होऊच नये, अशी मागणी
केली. पैठण इथंही सकल जैन समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
****
सातारा
जिल्हयात फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या
निषेधार्थ काल ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून निषेध
नोंदवला.
****
बीड शहरातही
काल या घटनेच्या निषेधात कँडल मार्च काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचलेल्या
या आंदोलकांनी सदर आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.
विविध सामाजिक संघटना, महिला कार्यकर्त्या आणि डॉक्टर वर्ग मोठ्या
संख्येने या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते.
****
दक्षता
जनजागृती सप्ताहानिमित्त काल परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलनाची
प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या संदेशांचं उपस्थितांसमोर वाचन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी याना शपथ दिली.
****
अतिवृष्टी
आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्याच्या आठही तालुक्यात सामुदायिक विवाह
सोहळ्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही
माहिती दिली. आपत्तीग्रस्त कुटुंबातल्या या नियोजित लग्न कार्याबाबत ३० नोव्हेंबरपर्यंत
तहसीलदारांकडे नावनोंदणी करण्याचं आवाहन आमदार पाटील यांनी केलं.
****
केंद्रीय
आयुष मंत्रालयाच्या यांच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याच्या
नारायणपूर इथं मोफत आयुष रोगनिदान आणि उपचार शिबीर घेण्यात आलं. जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. अभय धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या शिबीरात, नागरिकांची
तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला.
****
हवामान
खानदेश
आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे तसंच मराठवाड्यातले लातूर आणि धाराशिव जिल्हे
वगळता, सर्वत्र आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे, विदर्भातल्या काही जिल्ह्यांना उद्या बुधवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment