Tuesday, 28 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 28 October 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ ऑक्टोबर २०२ सकाळी .०० वाजता

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या आठव्या संमेलनाला संबोधित करणार आहेत. या चार दिवसीय संमेलनात जागतिक स्तरावरील १२४ देशातील विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सौर उर्जा क्षेत्रात जागतिक समुदायातील सहकार्य वाढवणे, सौरऊर्जेच्या वापराला गती देणे आणि कमीत कमी दरात सौरउर्जा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं उपाययोजना करण्यासंदर्भात या संमेलनात चर्चा होणार आहेत.

****

देशाची स्मार्टफोन निर्यात १ पूर्णांक ८ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. समाज माध्यमांवरील संदेशात देशातून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.

****

भारतानं हरित सागरी भविष्याकडे वाटचाल सुरू केली आहे. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं मुंबईत सुरु असलेल्या सागरी शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी ५५ हजार कोटी रुपयांच्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले. शाश्वत बंदर विकासाला चालना देण्यासाठी भारत आणि नेदरलँड्सने सागरी सहकार्य आणि हरित डिजिटल सागरी कॉरिडॉरवर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

****

सूर्यपूजेचा लोक उत्सव म्हणून ओळखला जाणाऱ्या छठ उत्सवाचा आज सकाळी उगवत्या सूर्याला प्रार्थना करून, श्रद्धा, भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात समारोप झाला. महिलांनी नद्या, तलाव आणि जलाशयांमध्ये उभे राहून सूर्यदेवाला प्रार्थना केली. कार्तिक शुक्ल षष्ठीला बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेशच्या पूर्वेकडील भागात छठपूजा साजरी केली जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठ पूजेत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी छठीमैय्याची अमर्याद कृपा देशवासीयांचे जीवन सदैव उजळून टाको, अशा शब्दात आपली भावना व्यक्त केली.

छटपूजा ही केवळ धार्मिक विधी नसून आपल्या आस्थेचे, संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. संजय निरुपम आणि बिहारी फ्रंटतर्फे जुहू इथं झालेल्या छटपूजेच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. या वेळी शिंदे यांनी उत्तर भारतीय बांधवांना बिहारी भाषेत छटपर्वाच्या शुभेच्छा दिल्या.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना विकसित भारत प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. देशाच्या प्रगतीत सहभागी होण्यासाठी ही एक उत्तम संधी असल्याचं त्यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

****

राज्य परिवहन मंडळ एस टी तर्फे सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर इथं होणाऱ्या कार्तिकी यात्रेसाठी १ हजार १५० अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

****

बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात सोनाळा इथं पाच पिस्तुलं आणि सोळा जिवंत काडतूस असा ७ लाख ३३ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी काल सायंकाळी याठिकाणी छापा टाकला असता तीन चारचाकी वाहनांमधून हा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

****

लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज परभणी कृषी विद्यापीठ परिसरात परभणी पोलीस दल आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने वॉक फॉर युनिटी पदयात्रा काढण्यात आली. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी हिरवा झेंडा दाखवून या पदयात्रेला रवाना केलं. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार यांच्यासह पोलीस दलातील आणि कृषी विद्यापीठातील कर्मचारी अधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते.

दरम्यान, येत्या शुक्रवारी, 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस संचलन होणार आहे. यामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या स्वदेशी श्वान पथकाचं k 9 हे एक विशेष पथक सादरीकरण करणार आहे.

****

सर्बिया इथं काल झालेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत सुजीत कलकलने पुरुषांच्या ६५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. त्याने विजेतेपदाच्या लढतीत उझबेकिस्तानच्या खेळाडूचा १०-० असा पराभव केला. यापूर्वी, भारतीय महिला कुस्ती संघानं पाच कांस्य आणि दोन रौप्य पदके जिंकली असून सांघिक विजेतेपदही पटकवले आहे.

****

बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या 'मोंथा' चक्रीवादळामुळे ओडीशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ या राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.  या परिस्थितीच्या अनुषंगानं ओडीशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी आज भुवनेश्वरमध्ये आपत्कालीन बैठक बोलावली आहे आणि परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील दक्षिणेकडील आणि किनारी जिल्ह्यांमध्ये अग्निशमन सेवा, ओडिशा आपत्ती जलद कृती दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातले लातूर आणि धाराशिव जिल्हे वगळता, सर्वत्र आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments: