Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 13
November 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ दुपारी
१.०० वा.
****
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं
पुढील वर्षी होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सहा हजार कोटी रुपयांच्या कामाचा
शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत
होत आहे. कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने २५ हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे.
पंचवटीतील रामकुंड परिसरात सध्या सुरू असलेल्या राम काल पथ या प्रकल्पाची तसंच अन्य
कामांचीही पाहणी फडणवीस करणार आहेत.
****
पुणे भुखंड घोटाळा प्रकरणी
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांना वाचवलं जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर
इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. राज्यात गैरव्यव्हार उघडकीस येतात मात्र, भारतीय जनता
पक्षाकडून त्यांना वाचवलं जातं, असं ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय
शिरसाठ यांच्याकडून शहरातल्या मतदार यादीत घोटाळा करण्यात आला असून, हे काम अधिकाऱ्यांनी
राजकीय दबावाखाली केलं असेल, असा आरोपही दानवे यांनी केला.
****
बिहार विधानसभा निवडणुकीची
मतमोजणी उद्या होणार आहे. विधानसभेच्या २४३ मतदारसंघांमध्ये दोन टप्यात मतदान झालं.
या प्रक्रियेत निष्पक्षता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा आणि प्रशासन
पूर्णपणे सज्ज असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारत आंतरराष्ट्रीय व्यापार
मेळ्याचं उद्घाटन उद्या नवी दिल्लीत होणार असून, यातल्या महाराष्ट्राच्या दालनाचं
उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र लघु उद्योग विकास
महामंडळानं उभारलेल्या या दालनात महिला बचत गट, महिला उद्योजकांच्या दालनांसह
एकंदर ६० दालनं असतील. या मेळ्यात परवा शनिवारी राज्याची समृद्ध कला आणि संस्कृती दर्शवणारा
सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.
****
आग्रा इथं ज्या ठिकाणी छत्रपती
शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होते, ती वास्तू महाराष्ट्र शासनाकडून
अधिग्रहित करून तिथे स्मारक उभारलं जाणार आहे. यासाठी आग्रा इथल्या या जागेचं अधिग्रहण
आणि संबंधित प्रक्रिया राबवण्याकरता उत्तर प्रदेश शासनाशी समन्वय साधण्यासाठी 'समन्वयक' म्हणून पणन
आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी
सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावं, असे निर्देश मुख्य सचिव राजेश
कुमार यांनी दिले. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. चैत्यभूमी परिसरात
मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, तसंच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात यावेळी
चर्चा झाली.
****
अहिल्यानगर तालुक्यात बिबट्याचा
वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मंगळवारी कामरंगाव इथं अज्ञात वाहनांच्या धडकेने
बिबट्याचा मृत्यू झाला होता. तर काल खारे कर्जुने इथं बिबट्याने पाच वर्षाच्या मुलीला
उचलून नेलं. अद्यापही तिचा शोध लागला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, या नरभक्षक
बिबट्याला ठार मारण्याची परवानगी वनविभागाने दिली असून, प्रशिक्षित शार्पशूटर आणि
विशेष पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आलं आहे.
****
कोल्हापूर शहरात दाट लोकवस्तीत
आपल्या अस्तित्वाने दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला मंगळवारी वन विभागाने काही तासांतच
जेरबंद केले होतं. त्याला काल सह्याद्रीच्या अधिवासात सुरक्षित सोडण्यात आल्याची माहिती
वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली. पकडलेला बिबट्या वाट चुकून शहरात
आल्याने त्याला टॅपिंग करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातल्या
कुंडलवाडी शहरात एस एस टी अर्थात स्थिर सर्वेक्षण पथकाने काल २१ लाख ५० हजार रोख रक्कम
आणि एक बंदूक पकडली. कुंडलवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पथकाने
ही कारवाई केली. बिलोली शहराकडून येणाऱ्या एका वाहनांमध्ये लोखंडी पत्र्याच्या पेटीत
ही रक्कम ठेवली होती. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
****
नाशिक जिल्हा काँग्रेसचे माजी
अध्यक्ष आणि माजी आमदार ऍडव्होकेट शिरीष कोतवाल तसेच नाशिकचे माजी उपमहापौर गुरुमितसिंग
बग्गा यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपाचे
नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसंच माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह अन्य
मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
ढाका इथं झालेल्या आशियाई
तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताने आज दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली.
महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात ज्योती सुरेखा वेण्णम, प्रितिका प्रदीप आणि दीपशिखा
यांच्या संघानं कोरियाचा २३६ - २३४ असा पराभव करत सुवर्ण पदक पटकावलं. तर मिश्र सांघिक
प्रकारात अभिषेक वर्मा आणि दीपशिखा यांनी बांग्लादेशचा १५३ - १५१ असा पराभव करत विजेतेपद
पटकावलं. पुरुषांच्या
कंपाऊंड सांघिक प्रकारात अभिषेक वर्मा, साहिल जाधव आणि प्रथमेश फुगे
यांच्या संघाचा अंतिम फेरीत कझाकिस्तानच्या संघाकडून पराभव झाल्यानं त्यांना रौप्य
पदकावर समाधान मानावं लागलं.
****
No comments:
Post a Comment