Wednesday, 1 March 2017


आकाशवाणीऔरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०१ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

राज्याच्या विकासकामांसाठी जागतिक बँक सात हजार कोटी रूपयांचा निधी महाराष्ट्र शासनाला देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशभरातल्या इतर कोणत्याही राज्याला जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या निधीपेक्षा हा निधी जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्तलीना जॉर्जिव्हा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंळानं काल मुंबईला भेट दिली, त्यावेळी झालेल्या बैठकी, राज्याच्या जलयुक्त शिवार अभियानासह इतर विकास योजनांची जॉर्जिव्हा यांनी प्रशंसा केली.

****

नांदेड इथं फळ प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासनानं पेप्सिको या शीतपेयांच्या कंपनीसोबत करार केला आहे. यासंदर्भात पेप्सिकोच्या अध्यक्षा इंद्रा नूयी यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच चर्चा केली. व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन मिशन या राज्यशासनाच्या अभियानात सहभागी होण्यासाठी पेप्सिको उत्सुक असल्याचं सांगत, नांदेड मधल्या या प्रकल्पासाठी कंपनी एकशे ऐंशी कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असल्याचं नूयी यांनी सांगितलं आहे.

****

      राज्याच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार काल सुमित मल्लिक यांनी स्वीकारला. मावळते मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी त्यांना पदाची सूत्रे सुपूर्द केली. भारतीय प्रशासन सेवेतील १९८२ च्या तुकडीचे अधिकारी असलेले मल्लिक हे राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते.

दरम्यान, माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे आज राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून शपथ घेणार आहेत.

*****

अमेरिकेतल्या कॅन्सस इथे नुकत्याच झालेल्या, श्रीनिवास कुचिभोटला या भारतीय अभियंत्याच्या हत्येचा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्र्ंप, यांनी निषेध केला आहे. अशा प्रकारच्या सर्व गुन्ह्यांच्या आपण विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  अमेरिका अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर पांघरूण घालणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

*****

No comments: