Friday, 10 March 2017

AIR News Bulletin, Aurangabad 0.03.2017 10.00am


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१० मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

आधार कार्ड नसल्याच्या कारणावरुन एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभापासून कोणालाही वंचित ठेवलं जाणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत लाभासाठी “आधार” सक्तीचं करण्यात आलं असून, सहा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी शिध्याऐवजी रोख हस्तांतरण करण्याचं सरकारनं ठरवलं आहे, अशा बातम्या काही प्रसारमाध्यमांमधून आल्या होत्या. यावर सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं. एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत अंगणवाड्यांना लाभार्थी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक गोळा करण्यास सांगण्यात आलं आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांच्या नोंदणीचं काम सुरु असून तोवर इतर पर्यायी आधारे त्यांना लाभ दिले जातील, असं सरकारनं सांगितलं आहे. 

****

सातारा तालुक्यातल्या फत्यापूर इथले जवान दिपक घाडगे हे जम्मू कश्मीर मधल्या पूंछ काल झालेल्या चकमकीत शहिद झाले. पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करून  भारतीय चौकीवर गोळीबार केला, त्यावेळी प्रतिकार करत असताना झालेल्या चकमकीत दिपक घाडगे यांना वीरमरण आलं. फत्यापूर या त्यांच्या गावी शोककळा पसरली आहे.

****

सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथल्या अवैध गर्भपात प्रकरणी आरोपी डॉ बाबासाहेब खिद्रापुरेच्या पत्नीला सांगली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरु असल्याचं ते म्हणाले. या प्रकरणात अटक केलेल्या विजापूर इथल्या डॉक्टरसह औषध दुकानदाराला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

****


राज्यातल्या सर्व महानगरपालिकांना ई-कचरा व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. राज्यात निर्माण होणारा ई-कचरा आणि या कचऱ्याची विल्हेवाट यासंदर्भातील लक्षवेधी सूचना सदस्या स्मिता वाघ यांनी मांडली होती. या नियमामध्ये उद्योग, कामगार, कौशल्य विकास, नगरविकास, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या असल्याचं कदम यांनी सांगितलं. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...