आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०९ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
संसदेच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरु होत आहे. राज्यसभेत पहिल्या सत्रात
अर्थ विधेयक-२०१७ सादर झाल्यानंतर, आता वस्तु आणि सेवा कर - जीएसटी विधेयक सादर करण्यात
येणार आहे. लोकसभेत आज प्रसूती लाभ विधेयक मांडण्यात येणार आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन
१२ एप्रिलला संपणार आहे.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा आजपासून सुरु
होत आहेत. दहावीच्या परीक्षेला नऊ लाख तर बारावीच्या परीक्षेला ११ लाख विद्यार्थी बसले
आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राची माहिती प्राप्त व्हावी यासाठी सीबीएसईनं एक्झाम
लोकेटर हे ॲप तयार केलं आहे. दहावीची परीक्षा १० एप्रिलला तर बारावीची परीक्षा २९ एप्रिलला
संपणार आहे.
****
मध्यप्रदेशात भोपाळ उज्जैन रेल्वेत परवा मंगळवारी
झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी, उत्तरप्रदेशात लखनौ इथं पोलिस कारवाईत मारला गेलेला दहशतवादी
सैफुल्ला याचा, इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या वृत्ताचा, उत्तर प्रदेश
पोलिसांनी इन्कार केला आहे. सैफुल्ला यास इसिसकडून पैसा पुरवला जात असल्याच्या वृत्ताचंही
पोलिसांनी खंडन केलं आहे.
****
महिलांविषयीच्या विविध कायद्यांबाबत जागरूकता निर्माण होण्याची
गरज असून यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्नरत असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष
विजया रहाटकर यांनी सांगितलं. दिल्ली इथं महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीनं महाराष्ट्र
सदनाच्या सभागृहात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आपल्यासाठी
अस्तित्वात असलेल्या कायद्यांबाबत महिलांमध्ये जागरूकता निर्माण हण्याची गरज त्यांनी
व्यक्त केली.
****
महिला क्रीडापटूंच्या तक्रारींचे
निवारण करण्यासाठी क्रीडा मंत्रालय क्रीडा सहसचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती
नेमेल, अशी घोषणा क्रीडा राज्यमंत्री विजय गोयल यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय
महिला दिनानिमित्त काल युवा आणि क्रीडा मंत्रालयानं आयोजित केलेल्या “महिला आणि क्रीडा क्षेत्र”
या विषयावर परिषदेत ते बोलत होते. या समितीमध्ये खेळाडू, वकील, मंत्रालयातील वरिष्ठ
अधिकारी आणि क्रीडा पत्रकार असतील. सर्व सदस्य महिला असतील. मंत्रालय पुरुष आणि महिला
यांच्यात भेदभाव करत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
//******//
No comments:
Post a Comment