Sunday, 13 August 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 13.08.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 13 August 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूरच्या बाबा राघवदास सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात प्राणवायूच्या कमतरतेमुळे मृत्यू झालेल्या बालकांची संख्या ७० च्यावर पोहोचली आहे. या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. आज केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा, राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्यासह आदित्यनाथ यांनी या रुग्णालयाला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. मृत बालकांच्या कुटुंबियांचीही त्यांनी भेट घेतली. दरम्यान, प्राणवायूच्या कमतरतेमुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आशुतोष टंडन यांनी फेटाळून लावला आहे. कामात कुचराई करणारे या महाविद्यालयाचे प्राचार्य राजीव मिश्रा यांना निलंबित केल्याचं त्यांनी सांगितलं. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीला सात दिवसाच्या आत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.

****

गोरखपूरच्या घटनेत ६० मुलांचा मृत्यू  प्राणवायूचा पुरवठा बंद केल्यानेच झाल्याचं, काँग्रेस नेते खासदार गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. भारतीय जनता पक्षाला लोकांच्या सुरक्षेपेक्षा आपली ध्येयधोरणं लादण्यात अधिक रस असल्याची टीका आझाद यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांच्या गावातच ही घटना घडल्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचं, आझाद म्हणाले. देशात आज अनेक वर्गांमध्ये असुरक्षेची भावना असल्याचं सांगत, आझाद यांनी केंद्र सरकारवरही टीका केली.

****

काश्मीरमध्ये दहशतवाद आता शेवटच्या टप्प्यात आला असल्याचं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. जम्मू इथं आयोजित संकल्प से सिद्धी तिरंगा यात्रेत ते आज बोलत होते. गेल्या काही महिन्यात सरकारनं दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं.  
दरम्यान, जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. काल रात्रभर ही चकमक सुरु होती. या हल्ल्यात तीन जवानांना वीरमरण आलं.
उत्तर काश्मीरमधल्या बंदीपोरा जिल्ह्यातही दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस जखमी झाले.

****

न्यायालयांमधल्या प्रलंबित खटल्यांमध्ये कनिष्ठ न्यायालयांनी नियमित जामीन देणं बंद करावं, असं सर्वोच्च न्यायालयानं, सांगितलं आहे. देशातल्या सर्व न्यायिक संस्थांच्या संचालकांना या आदेशाची प्रत पाठवण्यात येणार आहे, झारखंडच्या एका कनिष्ठस्तर न्यायालयानं एका आरोपीला सतत जामीन दिल्याचं समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं हे आदेश दिले.

****

महिला लोकप्रतिनिधीनी कामाचं आणि वेळेचं नियोजन करुन आत्मविश्वासानं जबाबदारी पूर्ण करावी, असं मत भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या राष्ट्रीय सचिव कुमुदिनी भार्गव यांनी व्यक्त केलं आहे. भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या लातूर शाखेच्या वतीनं महिला लोकप्रतिनिधींसाठी आयोजित कार्यशाळेत त्या आज बोलत होत्या.

****

अंबाजोगाई इथं येत्या २३ आणि २४ डिसेंबरला होणाऱ्या ३९व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेच्या कार्यकारिणीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, मराठवाडा साहित्य परिषदेचा जीनवगौरव पुरस्कार यंदा, परिषदेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष मधुकर अण्णा मुळे यांना जाहीर झाला आहे. २९ सप्टेंबर रोजी उस्मानाबाद इथं, परिषदेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात मधुकर अण्णा मुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.   

****

२८वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा पुणे आर्मीच्या रणजित सिंगनं जिंकली आहे. रणजित सिंगनं एक तास दहा मिनिटं सहा सेकंदात २१ किलो मीटरचं अंतर कापून प्रथम क्रमांक पटकावला. तर महिलांच्या गटात नाशिक इथल्या भोसला मिलिटरी स्कूलच्या आरती पाटील हीनं १५ किलोमीटरचं अंतर ५७ मिनिटांमध्ये कापून पहिला क्रमांक पटकावला.

****

भारत श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेत कॅन्डी इथं सुरू असलेल्या तिसऱ्या सामन्यात श्रीलंका संघावर फॉलो ऑन ची नामुष्की ओढवली आहे. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात अवघ्या १३५ धावांवर सर्वबाद झाला. कुलदीप यादवनं सर्वाधिक चार बळी घेतले, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी दोन तर हार्दिक पंड्यानं एक बळी घेतला. त्यापूर्वी आज सकाळी भारताचा पहिला डाव संपुष्टात आला. हार्दिक पंड्याचं ९६ चेंडूत सात षटकार आणि आठ चौकारांनी साकारलेल्या एकशे आठ धावा तसंच शिखर धवनच्या ११९ धावांच्या बळावर भारतानं पहिल्या डावात ४८७ धावा केल्या. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंका संघाच्या दुसऱ्या डावात, एक बाद १५ धावा झाल्या होत्या.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...