आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०२ ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.००
वाजता
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची
जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे. या निमित्तानं विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून गांधीजी
आणि शास्त्रीजींना अभिवादन करण्यात येत आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहीली आहे. गांधी जयंतीच्या
निमितानं महात्मा गांधी, त्यांचे आदर्श आणि मुल्यांप्रती पुनरसमर्पित होता येत असल्याचं,
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. जवानांचे आणि शेतकऱ्यांचे प्रणेते शास्त्री
यांना तसंच महात्मा गांधीजींना नमन करत असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवरच्या संदेशात
म्हटलं आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांसह उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान
मनमोहन सिंग, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि इतर नेत्यांनी
राजघाटावर, गांधीजींच्या समाधीवर पुष्पांजली वाहिली.
****
देशभरातल्या महामार्गांवर आजपासून मोफत नेत्र तपासणी शिबीरं
भरवण्यात येत आहेत. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आज नागपूर नजिक पांजरी पथकर
नाक्यानजिक या नेत्र तपासणी शिबीराचं उद्घाटन करतील.
****
यापुढच्या काळात उच्च शिक्षणाच्या धोरणाचा संशोधन हाच
आधार असेल आणि त्याला चालना मिळण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असं केंद्रीय मनुष्यबळ
विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीनं देशातल्या
आंतर विद्यापीठीय केंद्रांतर्फे पुणे इथं आयोजित शोध, शिक्षण आणि समीक्षा या कार्यक्रमात
ते काल बोलत होते.
****
शांततेचं नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांनी
मुलांच्या सुरक्षिततेसाठी काढलेल्या भारत यात्रेचं काल नाशिक शहरात उत्साहात स्वागत
करण्यात आलं. सुरक्षित बालपण सुरक्षित देश या ब्रीद वाक्याखाली गेल्या ११ सप्टेंबरपासून
काढण्यात आलेल्या या यात्रेचे सहा गट देशभरात जागृती करत आहेत.
****
गृह आणि नागरी कार्य मंत्रालयातर्फे स्वच्छ भारत अभियानाच्या
तीन वर्ष पूर्तीनिमित्त सहकारी रासायनिक खत निर्मिती कंपनी कृभकोला आज स्वच्छता पुरस्कारानं
सन्मानित केलं जाणार आहे. मंत्रालयातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात
आली.
****
No comments:
Post a Comment