Monday, 16 October 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 16.10.2017 11.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१६ ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यातल्या तीन हजार ७०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १५८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या १५८ सरपंच पदासाठी ५०८ तर एक हजार ५६१ सदस्य पदांसाठी तीन हजार ५६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ६७० मतदान केंद्रांवर तीन लाख ३७ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

****

नाशिक शहरात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. नाशिकरोड भागात अंधशाळा बस स्टॉप जवळ मोटार कार झाडावर आदळल्यानं हा अपघात घडला. या अपघातात रिपाईच्या कार्यकर्त्या प्रीती भालेराव, पूजा भोसले, सुरज गिरजे, निशांत बागुल असे चौघे जण ठार झाले. चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

****

कोकण रेल्वेमार्गावरच्या तेजस एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करणाऱ्या चोवीस प्रवाशांना काल अन्नातून विषबाधा झाली. या गाडीत रेल्वेमार्फतच अल्पोपाहार पुरवण्यात येत असल्यानं त्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रवाशांना चिपळूणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर सुमारे अडीच तासांनंतर गाडी मुंबईकडे रवाना झाली.

****

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सांगली जिल्ह्याच्या खानापूर नगरपंचायतीला एक कोटी रुपयांचं पारितोषिक जाहीर झालं आहे. नगरपंचायतीनं नियोजनबद्ध रितीनं आणि नागरिकांना प्रोत्साहित करुन यशस्वीपणे गाव निर्मल केल्यामुळे नगरपंचायत पारितोषिकास पात्र ठरली आहे.

****

दिवंगत कडुबाई गर्कळ राज्यस्तरीय वाङमय साहित्य पुरस्कार नाशिकचे प्राध्यापक ऐश्वर्य पाटेकर यांच्या ‘जू’ या आत्मकथनाला जाहीर झाला आहे. येत्या रविवारी २२ ऑक्टोबरला बीड जिल्ह्यातल्या शिरुर कासार इथं या पुरस्काराचं वितरण होणार आहे.  

****

दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आज साजरा होत आहे. आजच्या दिवशी सवत्स धेनु अर्थात गायवासराची पूजा करण्याचा प्रघात आहे. दरम्यान, दिवाळीनिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे. आकाशदिव्यांसह शोभेच्या विविध वस्तुंच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या गर्दीनं बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 5 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्...