आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१८ मार्च २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
चैत्र
शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आज साजरा होत आहे. हिंदू कालगणनेनुसार शालिवाहन शक
१९४० या नववर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. इतर राज्यांमध्ये चैत्र सुकलादी, उगादी,
चेटी चंद, नावरेह आणि साजीबू छैरोबा या विविध नावानं हा सण साजरा करण्यात येतो. यानिमित्त
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी,
राज्यपाल सी विद्यासागर राव, तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. विविध
भागात विविध पद्धतीनं साजरा होणारा हा सण विविधेतून एकतेचं दर्शन घडवतो. अशा
सणांमुळे एकमेकातील संबंध अधिक दृढ होतील असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं
आहे.
नववर्षारंभानिमित्तानं आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. सम्राट शालिवाहनाची राजधानी असलेल्या पैठण शहरात आज सकाळी शोभायात्रा
काढण्यात आली. औरंगाबाद इथंही दुपारी तीन वाजता, शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान
गणपतीपासून शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
****
राज्यात आजपासून प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंच्या
वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीच्या नियमांचं उल्लंघन
करणाऱ्यांवर जास्तीत जास्त २५ हजार रुपयांपर्यंत दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाच्या
शिक्षेची तरतूद करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जालना इथल्या मुख्य पोस्ट कार्यालयात येत्या आठवड्यात
पारपत्र कार्यालय सुरू होईल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार
रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी काल टपाल कार्यालयात
जाऊन जागेची पाहणी केल्यानंतर पारपत्र कार्यालय उभारणीच्या जागेला मान्यता दिल्याचं
खासदार दानवे यांनी, या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
****
येत्या २१ ते २५ मार्च दरम्यान परभणी इथं जिल्हा
कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान संस्थेच्या वतीनं
आयोजित हा महोत्सव शहरातल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात होणार असल्याची
माहिती जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. लातूर इथंही येत्या २४ ते २८ मार्च दरम्यान जिल्हा कृषी महोत्सव
आयोजित करण्यात आला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment