Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 March 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ मार्च २०१८ दुपारी १.०० वा.
****
‘सब
का साथ सबका विकास’ हा मंत्र घेऊन देशातील गरीब आणि अल्पउत्पन्न मध्यम वर्गाचं
जिवनमान सुधारण्यासाठी सरकार काम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. आंध्रप्रदेशमध्ये श्री शैलम इथं आज उगादी सणानिमित्त आयोजित
कार्यक्रमात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते. जनआंदोलनाचं महत्व
सरकारला माहित असून, त्यामुळेच स्वच्छ भारत अभियानाचं काम दुपटीनं झालं असल्याचं ते
म्हणाले.
****
जम्मू काश्मीरमधल्या पूँछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यानं
आज शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यावेळी केलेल्या गोळीबारात एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा
मृत्यू झाला. पाकिस्तानी सैन्यानं आज सकाळी बालाकोट सेक्टर परिसरात रहीवाशी भाग आणि
लष्करी चौक्यांना लक्ष्य करुन अंदाधुंद गोळीबार सुरु केला. भारतीय सैनिकांनीही या हल्ल्याला
चोख प्रत्यूत्तर दिलं.
****
कोणत्याही
सेवेचा लाभ घेण्यासाठी इंटरनेटवर आधारबाबतची वैयक्तिक माहिती देताना सावधागिरी बाळगण्याचं
आवाहन भारतीय विशेष ओळख प्राधिकरणानं केलं आहे. आधार ओळखपत्र प्रक्रीया सुरक्षित असल्याचं
प्राधिकरणानं म्हटलं आहे. परंतु, इंटरनेटवर उपद्रव करणाऱ्या काहीजणांकडून आधारचा गैरवापर होऊ शकतो, असंही प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. तसंच एखाद्याची वैयक्तिक माहिती
प्रकाशित केल्यानं
आधार सुरक्षेला कुठल्याही प्रकारचा धोका नसून आधार डेटाबेस सुरक्षित असल्याचंही प्राधिकरणानं
म्हटलं आहे.
****
इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्यांना देण्यात
आलेल्या वाईट वागणुकीशी संबंधित घटनांचा भारतानं पाकिस्तानला तपास करण्यास सांगितलं
आहे. इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांसोबत करण्यात आलेला दुर्व्यवहार
आणि त्यांना देण्यात आलेल्या धमक्यांचा विरोध केला असून, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला
याबाबत एक पत्रही पाठवलं आहे. या विषयावर भारतीय उच्चायुक्तालयाकडून पाकिस्तान सरकारला
पाठवण्यात आलेलं हे बारावं राजनैतिक पत्र आहे. याबाबतची एक घटना काल झाली होती तर आणखी
एक घटना १५ मार्च रोजी झाली होती.
****
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला प्रमुख आरोपी हिरे व्यापारी
नीरव मोदी याच्या १२५ एकर जमिनीवर स्थानिक दोनशे शेतकऱ्यांनी काल कब्जा केला. अहमदनगर
जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात खंडाळा इथं ही जमीन आहे. काल या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर
आणि बैलजोड्या आणून जमीन नांगरुन घेतली. या जागेत आपण, आजपासून शेती करणार असल्याचं,
या शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या बँक घोटाळ्याप्रकरणी, अटकेत असलेले बँकेचे
माजी उप महाव्यवस्थापक गोकुलनाथ शेट्टी यांच्यासह अकरा जणांना काल मुंबईच्या विशेष
सीबीआय न्यायालयानं २८ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
****
गुढी पाडव्याचा सण राज्यभरात उत्साहात साजरा होत
आहे. घरांवर गुढी उभारुन नागरिकांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं. नाशिक शहरात विविध भागातून
मोठ्या उत्साहात ढोलताशांच्या गजरात स्वागत यात्रा काढण्यात आल्या. पारंपरिक वेशात
सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांनी नृत्य आणि कवायती सादर केल्या. अनेक ठिकाणी महिलांच्या
मोटार सायकल रॅली काढण्यात आल्या. तसंच पाडवा
पहाट या सांगीतिक मैफिलीही पार पडल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे.
सम्राट शालिवाहनाची राजधानी असलेल्या पैठण शहरात
आज सकाळी शोभायात्रा काढण्यात आली. शिनसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं गुलमंडी परिसरात
खासदार चद्रकांत खैरे यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. औरंगाबाद इथंही दुपारी तीन
वाजता, शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीपासून शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ मार्चला आकाशवाणीवरच्या
मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४२वा भाग
असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक
सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र
मोदी ॲप वर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्हा सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. जी. एम गायकवाड यांना निलंबित करण्यात आलं आहे. शिस्तभंग प्रकरणी ही कारवाई करण्यात
आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचं इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं
आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीत सिंधूला जपानचा अकाने यामागुची कडून १२ - १९, १९
- २१, १८ - २१ असा पराभव पत्करावा लागला.
*****
***
No comments:
Post a Comment