Thursday, 15 March 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 15.03.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 March 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ मार्च २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

लोकसभेत आज ग्रॅच्युइटी अर्थात कर्मचारी उपदान देयक सुधारणा विधेयक २०१७ कोणत्याही चर्चेविना पारित करण्यात आलं. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची सध्याची १० लाख रुपयांची मर्यादा वाढवून २० लाख रुपये करण्याची तरतूद या विधेयकात आहे. विशेष सवलत दुरुस्ती विधेयकही विरोधकांच्या गदारोळातच पारित करण्यात आलं. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.

दरम्यान, राज्यसभेचं कामकाज सकाळच्या तहकुबीनंतर दुपारी दोन वाजता सुरु झाल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ सुरुच राहिल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं.  

****

ग्राहकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव असणं आवश्यक असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ग्राहक तक्रार निवारण प्रणाली अधिक बळकट बनवण्यात येत असल्याचं सांगतानाच, उत्पादनांची किंमत सर्व ठिकाणी सारखी पाहिजे, असं ते म्हणाले.

****

औरंगाबादमध्ये निर्माण झालेल्या कचराकोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे संतप्त पडसाद आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले.

विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी, ही माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असल्याचं सांगत, जो पर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना पदावरून दूर करावं, अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याची घोषणा केली. आंदोलन केल्याबद्दल स्थानिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेऊ, मात्र पोलिसांवर दगडफेक तसंच मारहाण केल्याबद्दल दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याबाबत स्थगन प्रस्ताव मांडत, जनतेचं आंदोलन चिरडून टाकण्यासाठी कायदा हातात घेणाऱ्या पोलिस आयुक्तांवर कारवाईची मागणी केली. शिवसेनेचे अनिल परब आणि काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनीही याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी, याप्रकरणी पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवलं असून, अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमल्याचं सांगितलं.

****

एस टी स्थानकांमधल्या स्वच्छतागृहांची दुरावस्था संपवण्यासाठी, यापुढे बांधा-वापरा-आणि हस्तांतरीत करा या तत्वावर स्वच्छतागृहांचं कंत्राट दिलं जाणार नाही, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी मराठवाड्यातल्या या समस्येबाबत प्रश्न उपस्थित केला होता. राज्य परिवहन मंडळाला मिळालेल्या सामाजिक दायित्व निधीतून या स्वच्छतागृहांचं काम हाती घेतलं जाईल, असं रावते यांनी सांगितलं. राज्यातल्या सर्व एस टी स्थानकावर सीसीटीव्ही लावण्याचं काम सुरू झालं असून या पहिल्या टप्प्याचं काम मराठवाड्यात झालं आहे, उर्वरित स्थानकांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. विमानतळाच्या धर्तीवर राज्यातल्या १५ बस आगारांमध्ये “बसतळ” सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांना २६ मार्च पर्यंत अटक न केल्यास, रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. या प्रकरणातले दुसरे आरोपी मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी एकबोटे यांना काल अटक केली.

****

जालना जिल्ह्यातल्या पारध इथल्या शालेय समितीच्या सदस्यांनी आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा आरोरा यांच्या दालनासमोरच विद्यार्थ्यांची शाळा भरवली. वारंवार लेखी मागणी करूनही उर्दु शाळेच्या वर्गखोल्यांचं बांधकाम न केल्यामुळे जिल्हा परिषद कार्यालयात वर्ग भरवण्याचा इशारा समितीनं यापूर्वी दिला होता. या प्रकारामुळे काही वेळ गोंधळ उडाला. दरम्यान, शिक्षणाधिकारी पांडुरंग कवाणे यांनी मराठी शाळेच्या तीन वर्गखोल्या उपलब्ध करून देत असल्याचं लेखी पत्र दिल्यानंतर शालेय समितीचे सदस्य विद्यार्थ्यांना घेवून परतले.

****

मराठवाड्यानं जपानसारख्या देशाचा आदर्श घेऊन सुधारणा करण्याचं आवाहन जपानच्या कागवा विद्यापीठाचे प्राध्यापक रवींद्र रानडे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात यूजीसी सीपीईपीए अंतर्गत ‘मराठवाड्याचा विकास : संधी आणि आव्हाने’ या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन रानडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जपानमधल्या लोकांमध्ये शिस्त, चिकाटी आणि नवनिर्मिती करण्यासंबंधी जिज्ञासा आहे, म्हणून आज जगभरात जपानचे ब्रँड प्रसिद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...