Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16
March 2018
Time 6.50 AM
to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१६ मार्च २०१८ सकाळी
६.५०
मि.
*****
· कर्मचारी उपदान देयक सुधारणा विधेयक २०१७ लोकसभेत
चर्चेविना संमत
·
कचरा प्रश्नी
आंदोलकांवर कारवाई प्रकरणी औरंगाबादचे पोलिस आयुक्त सक्तीच्या
रजेवर
·
राज्यसभेच्या सहा जागांवर भाजपचे तीन, आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस तसंच शिवसेनेच्या
प्रत्येकी एका उमेदवाराची बिनविरोध निवड
आणि
·
अनुसूचित
जाती तसंच नवबौध्द प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी तालुका तसंच जिल्ह्याच्या ठिकाणी
२० नव्या वसतीगृहांना मंजूरी; मराठवाड्यात सहा वसतीगृहं उभारली जाणार
****
लोकसभेत काल ग्रॅच्युइटी अर्थात कर्मचारी उपदान देयक सुधारणा विधेयक २०१७ कोणत्याही
चर्चेविना पारित करण्यात आलं. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची सध्याची १०
लाख रुपयांची मर्यादा वाढवून २० लाख रुपये करण्याची तरतूद या विधेयकात आहे. विशेष सवलत
दुरुस्ती विधेयकही विरोधकांच्या गदारोळातच काल पारित करण्यात आलं. त्यानंतर लोकसभेचं
कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
दरम्यान, राज्यसभेचं कामकाज सकाळच्या तहकुबीनंतर दुपारी दोन वाजता सुरु झाल्यानंतरही
विरोधकांचा गदारोळ सुरुच राहिल्यामुळे कामकाज कालही दिवसभरासाठी स्थगित झालं.
****
औरंगाबादमध्ये निर्माण झालेल्या कचराकोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या
मारहाणीचे संतप्त पडसाद काल विधीमंडळाच्या दोन्ही
सभागृहात उमटले.
विधानपरिषदेत
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याबाबत स्थगन प्रस्ताव मांडत, कायदा हातात
घेणाऱ्या पोलिस आयुक्तांवर कारवाईची मागणी केली. विधानसभेत विरोधी पक्षनेते
राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी, जो पर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत पोलिस आयुक्त आणि
महापालिका आयुक्त यांना पदावरून दूर करावं, अशी मागणी
केली.
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी, औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवत
असल्याची घोषणा केली.
कचरा टाकण्यास विरोधात्मक
आंदोलन केल्याबद्दल स्थानिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेऊ, मात्र पोलिसांवर दगडफेक तसंच मारहाणीचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट
केलं.
औरंगाबादची कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन ८६ कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल
डीपीआर मंजूर करण्यात आला असून, हा निधी, केंद्र आणि राज्य शासनाकडून उपलब्ध करून देणार
असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, या प्रकरणात तीन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.
****
एस टी
स्थानकांमधल्या स्वच्छतागृहांची दुरवस्था संपवण्यासाठी, यापुढे बांधा-वापरा-आणि हस्तांतरीत
करा या तत्वावर स्वच्छतागृहांचं कंत्राट दिलं जाणार
नाही, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल विधान परिषदेत
सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमरसिंह पंडित यांनी
मराठवाड्यातल्या या समस्येबाबत प्रश्न उपस्थित केला होता. सामाजिक दायित्व निधीतून या स्वच्छतागृहांचं काम हाती
घेतलं जाईल, असं रावते यांनी सांगितलं.
****
राज्यात परवा १८
मार्चपासून प्लास्टिकच्या काही वस्तूंवर बंदी लागू होणार आहे. यामध्ये प्लास्टिकच्या
पिशव्या, प्लास्टिक तसंच थर्माकोलच्या ताटल्या, वाट्या, चमचे, कप यांचाही समावेश असेल.
प्लास्टिकच्या इतर वस्तूंवर बंदीबाबत, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या नेतृत्वात
स्थापन समिती चर्चा करून निर्णय घेईल, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्रातून राज्यसभेवरील सहा जागांवर काँग्रेसचे कुमार उर्फ केशव केतकर, राष्ट्रवादी
काँगेसच्या वंदना चव्हाण, भाजपाचे प्रकाश जावडेकर, नारायण राणे, आणि व्ही. मुरलीधरन
तसंच शिवसेनेचे अनिल देसाई यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष
विजया रहाटकर यांनी अर्ज मागे घेतला, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचं विधीमंडळाच्या उपसचिवांनी सांगितलं आहे.
****
भीमा कोरेगाव दंगल
प्रकरणी संभाजी भिडे यांना २६ मार्च पर्यंत अटक न केल्यास, रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन
करण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. ते काल
मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, या प्रकरणातले दुसरे आरोपी मिलिंद एकबोटे यांना
पुणे न्यायालयानं १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
जागरुक ग्राहक ही
काळाची गरज असून, प्रत्येकाने आपल्या हक्कांची आणि कायद्याची माहिती ठेवणं आवश्यक असल्याचं
मत, ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलं आहे. जागतिक ग्राहक दिनाच्या
निमित्तानं मुंबईत आयोजित ग्राहक प्रबोधन कार्यक्रमात ते काल बोलत होते. दैनंदिन जीवनात
होणाऱ्या गैरप्रकारांबाबत ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर त्यावर योग्य वेळेत कारवाई
करणं, हे ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेचं मुख्य कर्तव्य असल्याचं बापट म्हणाले.
****
अनुसूचित जाती तसंच
नवबौध्द प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी तालुका तसंच जिल्ह्याच्या ठिकाणी नवीन वसतिगृहांसह
निवासी शाळांच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. एकूण २० वसतीगृहं उभारली जाणार असून, यापैकी सहा वसतीगृहं मराठवाड्यात बांधण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी, या वसतिगृहात
दोन हजार विद्यार्थी तसंच विद्यार्थीनींच्या निवासाची सोय होणार असल्याचं सांगितलं.
ते काल मंत्रालयात पत्रकारांशी ते बोलत होते.
हिंगोलीसह पाच जिल्ह्यात
प्रत्येकी दोन, तर नांदेड, उस्मानाबाद, जालना, लातूर, या सह एकूण दहा जिल्ह्यात प्रत्येकी
एका वसतिगृहाचं बांधकाम करण्यात येणार असल्याचं, बडोले यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद इथं आज
मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. शहरातल्या सुभेदारी विश्रामगृह इथं सकाळी ११ ते
चार या वेळेत नागरिक, संस्था, संघटनांकडून यासंदर्भातली निवेदनं स्वीकारण्यात येणार
आहेत. मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण तसंच शासकीय नोकऱ्यांमध्ये
असलेलं प्रमाण यासंबंधीचा सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी राज्यशासनानं दिलेल्या सूचनेनुसार
अशा सुनावण्या घेण्यात येत आहेत.
****
मराठवाड्यात काल
नांदेडसह अनेक भागात दिवसभर ढगाळ वातावरण होतं, जालना शहर परिसरात रात्रीच्या सुमारास
तुरळक पाऊस झाल्याचं वृत्त आहे. उस्मानाबाद शहर परिसरात पहाटेच्या सुमारास पाऊस झाल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****
मराठवाड्यानं जपानसारख्या देशाचा आदर्श घेऊन सुधारणा करण्याचं आवाहन
जपानच्या कागवा विद्यापीठातले प्राध्यापक रवींद्र रानडे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथल्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘मराठवाड्याचा विकास: संधी आणि आव्हाने’
या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन रानडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी
ते बोलत होते.
****
तरुणाईनं सामाजिक
प्रसार माध्यमांचा वापर चांगल्या समाज निर्मितीसाठी करावा, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे यांनी केलं आहे. काल नांदेड इथं, सोशल मीडिया महामित्र
उपक्रमांतर्गत आयोजित संवादसत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सोशल मीडिया महामित्र हा उपक्रम बीड इथंही राबवण्यात आला. संपर्काची अति वेगवान साधनं
असलेल्या समाज माध्यमांचा वापर, सावधपणे वापर केला
पाहिजे असं मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
जालना जिल्ह्यातल्या
पारध इथल्या शालेय समितीच्या सदस्यांनी काल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
निमा अरोरा यांच्या दालनासमोरच विद्यार्थ्यांची शाळा भरवली. वारंवार लेखी मागणी करूनही
उर्दू शाळेच्या वर्गखोल्यांचं बांधकाम न केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. शिक्षणाधिकारी
पांडुरंग कवाणे यांनी मराठी शाळेच्या तीन वर्गखोल्या उपलब्ध करून देत असल्याचं लेखी
पत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
क्रिकेट :
महिलांच्या आयसीसी
अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत वडोदरा इथं सुरू असलेल्या भारत ऑस्ट्रेलिया मालिकेत काल,
ऑस्ट्रेलियानं भारताचा ६० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघानं,
२८७ धावा केल्या, मात्र भारतीय संघ २२७ धावात सर्वबाद झाला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं
मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
दरम्यान श्रीलंकेत
सुरू असलेल्या निदाहास चषक टी ट्वेंटी तिरंगी मालिकेत आज श्रीलंका आणि बांगलादेश संघात
सामना होणार असून, या सामन्यातल्या विजेत्यासोबत भारताची परवा रविवारी अंतिम लढत होणार
आहे.
//**********//
No comments:
Post a Comment