Thursday, 10 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 10.05.2018 13.00

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 May 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० मे  २०१ दुपारी १.०० वा.
*****

 भारतीय जनता पक्षामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, तसंच अल्पसंख्याक समाजातले सर्वाधिक लोकप्रतिनिधी आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज कर्नाटकातल्या भाजपाच्या अनुसूचित जाती जमाती, ओबीसी आणि झोपडपट्टी आघाडीच्या कार्यकर्त्यांशी नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून संवाद साधत होते. भाजप सरकारनं अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याला अधिक कठोर बनवण्यासाठी गुन्ह्यांची यादी २२ वरुन ४७ केली असल्याचं त्यांनी नमूद केलं. इतर मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा मिळू नये यासाठी काँग्रेसनं संसदेचं कामकाज होऊ दिलं नाही, असा आरोप पंतप्रधानांनी यावेळी केला.
****

 दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. विधानसभेच्या २२४ मतदारसंघांपैकी २२३ जागांसाठी येत्या शनिवारी मतदान होणार असून, १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण दोन हजार ६५५ उमेदवार रिंगणात आहेत.
****

 कर्नाटकात काँग्रेसनं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात धर्माच्या नावावर मतं मागितली असल्याचा आरोप करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. राष्ट्रीय हिंदू सेनेचे प्रमोद मुतालिक यांनी ही याचिका दाखल केली होती. एकदा निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कोणतंही न्यायालय त्याहस्तक्षेप करु शकत नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे. अल्पसंख्याकांचं सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण दूर करण्याचं आश्वासन देणं हे धार्मिक आधारावर मतांचं राजकारण समजण्याचं कारण नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
****

 भारतीय माध्यमं वेगानं प्रगती करत असून, डिजिटल माध्यमाला एक आव्हान समजण्याबरोबरच एक मोठी संधीही समजत असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज पंधराव्या आशियाई प्रसार माध्यम परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. सामुदायिक रेडिओ केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं अनुदानात ५० टक्क्यांवरुन ९० टक्के इतकी वाढ केली असल्याचं त्यांनी सांगितलं. या संमेलनात ४० देशांचे प्रतिनिधी माध्यमांशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत.
****

 ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी चुकती करण्यासाठी साखर कारखान्यांना अर्थसहाय्य देण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. उसाच्या दराचा भार हलका करण्यासाठी साखर कारखान्यांना २०१७-१८च्या हंगामाकरता क्विंटल मागे साडे पाच रुपये अर्थसहाय्य देण्याचं सरकारनं निश्चित केलं आहे. ही रक्कम कारखान्याच्या वतीनं थेट शेतकऱ्यांना दिली जाईल, असं अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****

 रेल्वेगाडीत चढताना किंवा उतरताना प्रवासी जखमी झाला, किंवा त्याचा मृत्यू झाला तर त्यासाठी नुकसान भरपाई देणं ही रेल्वेचीच जबाबदारी असून, अशा घटनांमध्ये प्रवाशांच्या निष्काळजीपणाचं कारण देत रेल्वे जबाबदारी नाकारु शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. रेल्वेतून प्रवास करताना पडून मृत्यू झालेल्या एका प्रवाशाच्या पत्नीला नुकसान भरपाई देण्याचा निर्णय पाटणा उच्च न्यायालयानं दिला होता, त्याविरोधात रेल्वेनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं हा निर्णय दिला. प्रवासी विना तिकीट असेल तरीही नुकसान भरपाईचा दावा फेटाळता येणार नाही, मात्र अशा परिस्थितीत योग्य ते पुरावे सादर करुन आपण प्रवास करत असल्याचं सिद्ध करणं, ही प्रवाशांचीच जबाबदारी असेल, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
****

 नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या, 'अटल टिंकरिंग इनोव्हेशन' स्पर्धेत देशातल्या सर्वोत्तम ३० विद्यार्थी संशोधनांची निवड करण्यात आली आहे. या योजनेत राज्यातल्या चार शाळा निवडण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांमधल्या संशोधक वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्याकडून नवनवीन संशोधन करवून घेण्यासाठी या स्पर्धेचं सहा महिन्यांपूर्वी आयोजन करण्यात आलं होतं.
****

 येत्या रविवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब पदांसाठीची परीक्षा होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात आठ उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार असून, या केंद्रांवर एक हजार ८७२ उमेदवार परीक्षा देणार आहेत.

 बीड इथंही १३ उपकेंद्रांवर चार हजारावर उमेदवार परीक्षा देणार आहेत. या सर्वच ठिकाणच्या परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे.
****

 बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथं दोन ठिकाणी दरोडा टाकून साडे पाच लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शस्त्राचा धाक दाखवून रोख रक्कम आणि दागिने लुटल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. तालुक्यातल्या लहामेवाडी, मंजरथ याठिकाणी देखिल तीन – तीन घरं फोडल्याच्या घटना घडल्या आहेत.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...