Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 7 May 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ७ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
लातूर उस्मानाबाद बीड विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी
कॉंग्रेस पक्षाचे रमेश कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला. कराड यांनी
नुकताच भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. या मतदारसंघातून आज पाच उमेदवारांनी
आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीचे उमेदवार सुरेश धस आणि अपक्ष
उमेदवार अशोक जगदाळे या दोन उमेदवारांमध्येच लढत होणार आहे.
****
पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूकीसाठी कॉंग्रेसतर्फे विश्वजित कदम यांनी आज उमेदवारी
अर्ज भरला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते
उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं कदम यांना
पाठिंबा दिला आहे. पतंगराव कदम यांच्या निधनानं ही जागा रिक्त झाली आहे.
दरम्यान, पालघर लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. भाजपाचे
खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. चिंतामण वनगा यांचे
पुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. भाजपाही, वनगा कुटुंबियांशी चर्चा करत असल्याचही
सूत्रांचं म्हणणं आहे.
****
राज्यातल्या विविध प्रकल्पातील पुनर्वसित व्यक्तींना
दिल्या जाणाऱ्या सवलती निर्बंधमुक्त असाव्यात, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई
इथं आज लोकशाही दिनात वर्धा इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या
तक्रारीवर सुनावणी करताना ते
बोलत होते. प्रकल्पग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या
जमिनींना वर्ग एकचा दर्जा देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
****
उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामार्फत महापुरुषांची चरित्रे आता संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात
येणार आहेत. विभागानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी
शाहू महाराज, साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि महाराजा सयाजीराव गायकवाड
यांची चरित्रे साधनं प्रकाशन समित्या गठीत केल्या आहेत. या वेगवेगळ्या
पाच समित्यांनी प्रकाशित केलेले साहित्य सर्व जगाला मार्गदर्शक ठरणारं असल्यानं, या
साहित्याचं डिजिटायझेशन करुन हे साहित्य संकेतस्थळाच्या माध्यमातून लोकांपर्यत
पोहोचवण्यात येणार आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं यासाठी
निधी उपलब्ध करुन दिला आहे.
****
वाशिम
जिल्ह्यात मेडशी इथं आज एका
अपघातात तीन जण ठार तर चौदा जण जखमी झाले. आज सकाळी अकोला
- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रक - टेम्पो आणि खासगी बस यांच्यात हा अपघात झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज ठाणे
जिल्ह्यात सुरू असलेलं, मुंबई
अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या मोजणीचं काम बंद पाडलं. या कार्यकर्त्यांनी
मोजणीच्या कामात वारंवार अडथळा आणला, पोलिस संरक्षणात काम सुरु केल्यावरही जमाव वाढत
गेल्यानं, दुपारनंतर काम बंद करावं लागलं, असं रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितल्याचं, पीटीआय
च्या बातमीत म्हटलं आहे.
****
अहमदनगरमधल्या
केडगाव इथल्या दु्हेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी आज नऊ जणांना अटक केली असून, त्यांना
दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये शिवसेनेच्या
पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
****
जम्मू
काश्मीरमधल्या कठुआ लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा खटला सर्वोच्च न्यायालयानं
पठाणकोट न्यायालयात वर्ग केला आहे. यावरील पुढची सुनावणी नऊ जुलै रोजी होणार आहे. न्यायालयानं
रोज सुनावणी घेण्याबरोबरच रेकॉर्डिंग करण्याचे आदेशही दिले आहेत. आपल्या
जीवाला धोका असल्यामुळे या खटल्याची सुनावणी चंडीगढ़च्या न्यायालयामधे
व्हावी, अशी मागणी पीडितेच्या वडीलांनी केली होती.
दरम्यान,
या प्रकरणातल्या आरोपींनीही याचिका दाखल करुन हा खटला पोलिसांकडून केंद्रीय अन्वेषण
विभाग - सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली
होती. मात्र न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली.
****
इंदिरा गांधी राष्ट्रीय खुल्या विद्यापीठानं जुलै २०१८ या शैक्षणिक वर्षासाठी आपल्या
विविध अभ्यासक्रमांसाठीचा प्रवेश खुला केला आहे. पदवी तयारी अभ्यासक्रम, पदव्यूत्तर पदविका, पदविका आणि प्रशस्तीपत्रक
अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. प्रवेशासाठीची मुदत ३० जून असल्याचं विद्यापीठानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
राज्यात
आज सर्वात जास्त ४५ पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमान अकोला आणि ब्रम्हपुरी इथं नोंदवलं
गेलं. परभणी ४४, नांदेड ४३, तर औरंगाबाद आणि उस्मानाबाद इथं सरासरी ४१ अंश सेल्सिअस
तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह
पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment