Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 February
2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ फेब्रुवारी
२०१९ दुपारी १.०० वा.
****
रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय संस्कृतीची जगाला ओळख करून दिल्याचं, राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत टागोर सांस्कृतिक सद्भावना पुरस्कार
प्रदान केल्यानंतर ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सांस्कृतिक कार्यमंत्री महेश
शर्मा यावेळी उपस्थित होते. मणीपुरी नृत्य गुरु राजकुमार सिंहजीत सिंह यांना २०१४ साठीचा,
बांग्लादेशातल्या छायानट या सांस्कृतिक संस्थेला २०१५ साठीचा तर शिल्पकार राम सुतार
यांना २०१६ साठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक कोटी रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र,
असं या पुरस्कारचं स्वरुप आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या
पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलानी केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले. पिंगलीना भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर,
सुरक्षा दलानं या भागात शोधमोहीम सुरु केली. यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये
चकमक झाली. या चकमकीत लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह
चार सैनिकांना वीरमरण आलं, तर
एका स्थानिक नागरिकाचाही मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात, १४ तारखेला पुलवामा इथं, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर
झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी, आज मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा संबंध असल्याची शक्यता
वर्तवण्यात येत आहे.
****
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा
झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांप्रती संवेदना आणि एकतेची भावना व्यक्त करण्यासाठी
अखिल भारतीय व्यापारी महासंघानं आज राष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे. बंद दरम्यान व्यापारी
आपापल्या राज्यात एक दिवस उपवास करणार असून, श्रद्धांजली फेरीही काढणार आहेत. महाराष्ट्रासह
जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, पंजाब
आदी राज्यांमध्ये बंद पुकारण्यात आला आहे.
****
एयरसेल मॅक्सिस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीच्या
न्यायालयानं माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ति चिदंबरम
यांना दिलेल्या अटकेपासून संरक्षणाची मुदत आठ मार्च पर्यंत वाढवली आहे. केंद्रीय अन्वेषण
विभाग - सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयानं हा खटला दाखल केला आहे. याप्रकरणी संचालनालयानं
कार्ति यांना पाच, सहा, सात आणि १२ मार्चला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे.
****
राज्यातले सर्व वन हक्क दावे येत्या १५ मार्चपर्यंत
निकाली काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पालघर, ठाणे
आणि नाशिक जिल्ह्यातल्या संबंधित विभागांशी दूरदृश्य संवाद यंत्रणेद्धारे झालेल्या
बैठकीत ते बोलत होते. आतापर्यंत ४३ हजार वन हक्क दावे निकाली काढण्यात आल्याची माहिती
अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. या अंतर्गत, गेल्या अनेक वर्षांपासून कसत असलेली वनजमीन,
संबंधित शेतकऱ्यांच्या नावे, करून दिली जाते.
****
बल्गेरियात सोफिया इथं
सुरू असलेल्या सत्तराव्या स्ट्रॅन्डजा मेमोरीयल मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत, भारताच्या
एक पुरुष आणि चार महिला अशा एकूण पाच मुष्टियोद्ध्यांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
त्यामुळे भारताची किमान पाच कांस्यपदकं निश्चित झाली आहेत. पुरुषांच्या ४९ किलो
वजनी गटात आशियाई सुवर्ण पदक विजेत्या अमित पांघलनं युक्रेनच्या नाझर कुरोचीनला तीन - दोन अस़ं हरवून उपांत्य फेरी गाठली. महिलांच्या उपांत्यपूर्व लढतींमध्ये, ६९ किलो
वजनी गटात लवलिना बुरगोहीननं ब्राझीलच्या सोरेझ बिट्रीझला, ४८ किलो
वजनी गटात राष्ट्रीय विजेत्या मंजू राणीनं इटलीच्या बोनाटी रॉबर्टाला, ५२ किलो
वजनी गटात निखत झरीननं बेलारूसच्या बुर्याम यानाला, तर
नीरजनं अमेरिकेच्या अॅमेलिया मूरला, पाच-शून्य अशा एकसारख्याच फरकानं हरवत उपांत्य फेरी गाठली.
सोनिया लॅथरचं आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - आयसीसीनं जारी केलेल्या
कसोटी क्रिकेट क्रमवारीतं भारतीय कर्णधार विराट कोहली प्रथम स्थानावर तर, चेतेश्वर
पुजारा तिसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहली ९९२ गुणांकनासह तर पूजारा ८८१ गुणांकनांसह
आघाडीवर आहे. गोलदांजाच्या यादीत भारताचा रविंद्र जडेजा ७९४ गुणांकनासह पाचव्या स्थानावर
असून अष्टपैलू किक्रेटपटूंच्या यादीमध्ये त्यानं, तिसरं स्थान पटकावलं आहे. या क्रमवारीत
वेस्ट इंडिजचा जॅसन होल्डर पहिल्या स्थानावर तर बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शाकिब-अल-हुसैन
दुसऱ्या स्थानावर आहे.
*****
***
No comments:
Post a Comment