Wednesday, 24 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.04.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 April 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४  एप्रिल २०१९  सकाळी ७.१० मि.

****



v लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी देशभरातल्या ११६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के तर राज्यातल्या १४ मतदारसंघात ६१ टक्के मतदान

v औरंगाबाद जिल्ह्यातल्या शरीफपूरवाडी आणि कविटखेड्यात मतदानावार बहिष्कार

v बुलडाणा जिल्ह्यात डोणगाव मतदान केंद्रावर आज फेरमतदान

 आणि

v इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची हाताळणी ही चिंतेची बाब असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मत

****



 लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी देशभरातल्या ११६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान झालं. सर्वाधिक सरासरी ८० टक्के मतदान त्रिपुरात तर त्याखालोखाल पश्चिम बंगाल मध्ये सरासरी ७९ टक्के मतदान झालं. काही किरकोळ अपवाद वगळता लोकसभेच्या ११६ मतदारसंघात शांततेत मतदान झालं असल्याची माहिती निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी नवी दिल्ली इथं काल सायंकाळी दिली.

****



 राज्यातल्या १४ मतदारसंघामध्ये सरासरी ६१ टक्के मतदान झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे. काही मतदान केंद्रांवर सायंकाळी सहानंतरही मतदारांच्या रांगा असल्यानं उशिरापर्यंत मतदान सुरु होतं.



 औरंगाबाद ६२ टक्के, जळगाव, रावेर आणि रायगड मध्ये प्रत्येकी ५८, पुणे ५३, बारामती ५९, जालना, अहमदनगर आणि माढ्यात प्रत्येकी ६३, सांगली ६४, सातारा ५७, रत्नागिरी-सिंधुदुर्ग ६२, हातकणंगले ६८ तर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक ६९ टक्के, मतदान झाल्याचं शिंदे यांनी सांगितलं.



 औरंगाबाद मतदारसंघातल्या १८ गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता, त्यापैकी १७ गावातल्या ग्रामस्थांशी प्रशासनानं चर्चा केल्यानंतर, या गावांनी बहिष्कार मागे घेतला. मात्र गंगापूर तालुक्यातल्या शरीफपूरवाडी इथल्या ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी पुकारलेला बहिष्कार, कायम राहिल्याचं, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितलं.



 एका अज्ञात मतदाराने मतदान कक्षामध्ये मोबाईलद्वारे चित्रीकरण करुन ते टिकटॉक या मोबाईल ॲप्लीकेशनच्या आधारे सोशल मीडीयावर व्हायरल केल्याचा प्रकार, निदर्शनास आला. या प्रकरणी सायबर पोलीस विभागाने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

****



 जालना लोकसभा मतदारसंघात काल शांततेत मतदान पार पडलं. या मतदारसंघात समावेश असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातल्या कविटखेडा गावातल्या नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता. ३८५ मतदारांपैकी एकाही मतदारानं या गावात मतदान केलं नाही. मतदानाबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर



बदनापूर मतदार संघातल्या काजला  इंथल्या मतदान केंद्रावर मतदान यंत्रांत बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया तासभर थांबवण्यात आली होती. मतदान यंत्रांतील बिघाड दुरूस्त केल्यानंतर  मतदानाला पुन्हा सुरूवात झाली. अंबड तालुक्यातल्या खडकेश्वर येथे एका  मतदार केंद्रावर  मोबाईलमध्ये मतदानयंत्राचं छायाचित्र घेतल्यामुळे, एका मतदारा विरूध्द लोकप्रतिनिधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. एंकदरीतचं जालना लोकसभा मतदार संघांत सायंकाळी सहा पर्यंत ६३ टक्के मतदार झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा निवडणूक विभागानं वर्तवला आहे.  

आकाशवाणी बातम्यासाठी, बाबासाहेब म्हस्के, जालना.   

****



 अहमदनगर लोकसभा मतदार संघात एका मतदाराने मतदान यंत्र फोडण्याचा प्रयत्न केला. बाबुर्डी बेंद इथं ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 रायगड मतदार संघात रोहा इथं, एका पोलिंग एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले. या मतदान केंद्रावर पोलिंग एजंट मतदारांच्या बोटाला शाई लावत असल्याची तक्रार आली होती, या केंद्रावरचे सर्व कर्मचारी तात्काळ बदलण्यात आले. मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्या विरोधात हलगर्जीपणा दाखवल्याप्रकरणी कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

****



 सांगली शहरातल्या एका मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं, या मतदान केंद्रावरचं मतदान सुमारे दोन तास बंद राहिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या मतदान यंत्रावर बटन न दाबताही, भाजप उमेदवाराला मतदान होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकानं केली होती. ३८ जणांनी मतदान केलेलं असतानाही, या मतदान यंत्रावर ४० जणांनी मतदान केल्याचं दाखवलं जात होतं.

****



 जळगाव जिल्ह्यात २९ मतदान केंद्रांवर मतदान पडताळणी यंत्र नादुरुस्त आढळल्यानं मतदान उशीरा सुरू झालं. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी ही माहिती दिली. २९ मतदान पडताळणी यंत्र, २२ मतदान यंत्र बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्याचं ढाकणे यांनी सांगितलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****



 राज्यात १७ मतदारसंघात चौथ्या टप्प्यातलं मतदान येत्या २९ एप्रिलला होणार असून या सर्वच ठिकाणी आता प्रचार शिगेला पोहोचला आहे. विविध राजकीय पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांच्या सभा, मेळावे यांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****



 ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची असून देशाची कामं कोणाच्या हातात द्यायची हे ठरवणारी असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. मावळ मतदार संघातले युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी काल पनवेलमधील कामोठे इथं सभा घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

****



 मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांच्या सारख्या मोठ्या उद्योगपतींनी काँग्रेस उमेदवाराला दिलेल्या जाहीर पाठिंब्याचा अर्थ देशात भाजपाची सत्ता येणार नाही असा असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबईत काल जाहीर सभेत ते बोलत होते. आपल्या सभांमुळे भाजप नेते बिथरले असून आपल्या प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तर नाहीत असंही ते म्हणाले.

****



 भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना हे चारही पक्ष केवळ लोकांना दाखवण्यासाठी वेगवेगळे लढत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. धुळे मतदार संघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहमद यांच्या प्रचार सभेत ते काल बोलत होते. प्रस्थापित पक्षांनी लोकशाहीची कुटुंबशाही केली त्यामुळे समाजातले वंचित घटक सत्तेपासून दूर गेल्याचं आंबेडकर यांनी यावेळी नमूद केलं.

****



 बुलडाणा जिल्ह्यात डोणगाव इथल्या एका मतदान केंद्रावर आज २४ एप्रिलला फेरमतदान होत आहे. या केंद्रावर निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अठरा एप्रिलला मतदान घेण्यात आलं होतं. मात्र, मतदान यंत्रात नोंदवलेलं मतदान केंद्रावरच्या अधिकाऱ्यांनी डिलीट केल्यामुळे, हे फेरमतदान घ्यावं लागत आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी त्या मतदार केंद्रावर असलेल्या चार कर्मचाऱ्यांना काल निलंबित करुन, त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

****



 इलेक्ट्रॉनिक मतदान ंत्रणांची हाताळणी ही चिंतेची बाब असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रत्येक मतदार संघातल्या किमान पन्नास टक्के, व्ही व्ही पॅट यंत्रातल्या मतदानाच्या पावत्या, पडताळून पाहण्याची मागणी आपण पुन्हा करणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री तसंचं तेलगु देशम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

****



 मराठा क्रांती मोर्चा बाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशित केल्याप्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद न्यायालयानं, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यासह व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्या विरोधात वॉरंट बजावलं आहे. मराठा क्रांती मोर्चा दरम्यान, सामना वृत्तपत्रात हे आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशित झालं होतं.

****



 लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वीरभद्रअप्पा शीलवंत यांचं काल सकाळी निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. आर्य समाजाचे अनुयायी असलेले शीलवंत, मराठवाडा मुक्तिसंग्रामात सक्रीय सहभागी होते. प्रशासनाच्या वतीनं शीलवंत यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करून, श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले.

****



 जागतिक पुस्तक दिन काल साजरा झाला. या निमित्तानं परभणी जिल्हा ग्रंथालयात आयोजित विशेष कार्यक्रमात मान्यवरांनी पुस्तकांचं महत्त्व पटवून देत, वाचन वाढवण्याचं आवाहन केलं. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.



 नांदेड इथं, जिल्हा शासकीय ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं होत. साहित्यिक जगदीश कदम, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

****



 परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातली १३ गावं आठ दिवसापासून अंधारात आहेत. १६ एप्रिल रोजी वादळी वाऱ्यामुळे या गावांना वीज पुरवठा करणारे खांब उन्मळून पडल्यानं, वीज पुरवठा खंडीत झाला आहे, यामुळे भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह इतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं, या नागरिकांनी वीज वितरण कंपनीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या गावांचा वीज पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे.

****



 परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं एका कुलर तयार करणाऱ्या कंपनीत आग लागून मोठं नुकसान झालं. काल पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवानं या आगीत जीवीत हानी झाली नाही.

****



 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी, पाऊस पडेपर्यंत म्हणजे १५ जूनपर्यंत सरकारनं दूध अनुदान मुदतीत वाढ करावी अशी मागणी, आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सध्या प्रती लिटर तीन रूपये एवढं अनुदान सरकार देत असून, ते येत्या ३० एप्रिलपर्यंत मिळणार आहे.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...