Tuesday, 1 October 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.10.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 October 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०१ ऑक्टोबर २०१ सकाळी ७.१० मि.
****  

Ø  भाजप - शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीची घोषणा; जागावाटप लवकरच जाहीर होणार  
Ø  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
Ø  गोपीचंद पडळकर, नमिता मुंदडा यांच्यासह अनेकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
आणि
Ø  महात्मा गांधींजींच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त औरंगाबाद इथं िशेष कार्यक्रमंचं आयोजन
****

 भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि अन्य घटकपक्ष महायुती म्हणून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा काल करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी काल मुंबईत याबाबतचं संयुक्त पत्रक जारी केलं. भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम आणि रयतक्रांती या पक्षांचा महायुतीत समावेश आहे. कोणता पक्ष किती जागा लढवणार याचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल, असं या पत्रकात सांगण्यात आलं.

 दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री पद देण्यासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही पाटील यांनी सांगितलं.
****

शिवसैनिकांची संमती असेल, तर विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याची घोषणा, आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते काल मुंबईत शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते. आदित्य ठाकरे यांना वरळी मतदार संघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यात आहे.
****

 राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी काल ६३ मतदारसंघातल्या एकशे एक उमेदवारांनी १२६ उमेदवारी अर्ज दाखल केले. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली. यामध्ये मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात चार मतदारसंघातून आठ उमेदवारांनी, जालना - एका मतदारसंघातून दोन उमेदवारांनी, नांदेड - पाच मतदारसंघातून पंधरा, परभणी- दोन मतदारसंघातून सहा, बीड - चार मतदारसंघातून नऊ, लातूर जिल्ह्यात तीन मतदार संघातून तीन, तर हिंगोली तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका मतदारसंघातून एका उमेदवारानं अर्ज दाखल केला.

 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर विधानसभा मतदार संघातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. निवडणूकीनंतर राज्यात काँग्रेस आघाडीचाच मुख्यमंत्री असेल असा विश्वास, थोरात यांनी व्यक्त केला.

 माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथून उमेदवारी अर्ज दाखल केला. बीड जिल्ह्यातल्या गेवराई विधानसभा मतदार संघातून शिवसेना नेते बदामराव पंडित यांनी एक अर्ज अपक्ष तर एक अर्ज शिवसेनेच्या वतीनं दाखल केला.
****

 औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेनं अब्दुल सत्तार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल सत्तार यांना अधिकृत उमेदवारीचा ए बी फॉर्म दिला. उमेदवारी जाहीर होताच सिल्लोडमध्ये शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि घोषणा देऊन जल्लोष केला.
****

 धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी विधानसभा निवडणुक लोकसंग्राम या आपल्या पक्षातर्फेच लढवणार असल्याची घोषणा केली, ते काल धुळे इथं समर्थकांच्या मेळाव्यात बोलत होते. जो पक्ष आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद देईल त्या पक्षात प्रवेश करण्यास आपण तयार असल्याचंही अनिल गोटे यांनी जाहीर केलं.
****

 महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. काल, मुंबईत वांद्रे इथं आयोजित पक्ष मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. पक्ष कोणत्या जागांवर निवडणूक लढवणार याबाबत आपण योग्यवेळी घोषणा करणार असल्याचं ते म्हणाले. मंत्रालयात आत्महत्या केलेले धुळे जिल्ह्यातले शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील आणि नाशिक महापालिकेतले शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी मनसेत प्रवेश केला.
****

 भाजपचे ठाणे जिल्ह्यातले माजी आमदार दौलत दरोडा तसंच काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी काल मुंबई इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. नेत्यांच्या फोडाफोडीचा शेवट आम्ही करू, असं पवार यावेळी म्हणाले
****

 वंचित बहुजन आघाडीने काल १८० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये औरंगाबाद मध्य मतदार संघातून अमित भुईगळ यांच्यासह मराठवाड्यातून २३ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

 एमआयएम पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी काल सहा उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण विधानसभा मतदार संघातून प्रल्हाद राठोड, परभणी इथून अली खान मोईन खान, बीड इथून शेख शफिक मोहम्मद यांना उमेदवारी दिल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर काल भारतीय जनता पक्षात परतले. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत पडळकर यांनी पक्षात प्रवेश केला, मुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्षांनी त्यांचं स्वागत केलं. पडळकर यांना बारामती मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी देण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. शिरपूरचे आमदार काशिनाथ पावरा, शिरपूरचे काँग्रेस नेते प्रभाकर चव्हाण यांच्यासह अनेकांनी यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
****

 बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. परळी इथं गोपीनाथ गडावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी नमिता मुंदडा यांचं पक्षात स्वागत केलं. नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यावेळी उपस्थित होते. भाजप प्रवेशापूर्वी नमिता मुंदडा यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईमेलद्वारे पाठवला. नमिता मुंदडा या माजी मंत्री दिवंगत विमल मुंदडा यांच्या स्नुषा आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून केज मतदार संघातून मधून नमिता मुंदडा यांचं नाव निश्चित झालं असल्याचं मुंदडा समर्थकांनी सांगितलं. 
****

 महात्मा गांधींजींच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्तानं, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा क्षेत्रीय जनसंपर्क विभाग आणि महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमानं, आज औरंगाबाद इथं गांधीजींच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे चित्रप्रदर्शन आजपासून परवा तीन ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री नऊ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य सुरू राहणार आहे.

 औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या महात्मा गांधी अध्यसन केंद्राच्या वतीनं, गांधी जयंतीनिमित्त, पर्यावरण तज्ज्ञ विजय दिवाण यांचं आज व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. विद्यापीठात मराठी विभागाच्या सभागृहात दुपारी साडे बारा वाजता हे व्याख्यान होणार आहे.
****

 गांधीजींच्‍या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्‍त देशभरात स्‍वच्‍छता ही सेवा हे विशेष अभियान राबवलं जात आहे. यानिमित्‍त नांदेड जिल्ह्यात उद्या २ ऑक्‍टोबर रोजी प्‍लास्टिक कचरा निर्मुलनासाठी महाश्रमदान मोहीम आयोजित करण्‍यात आली आहे. या महाश्रमदान मोहिमेत नागरीकांनी सक्रीय सहभाग घ्‍यावा, असं आवाहन जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे आणि जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केलं आहे. यामध्‍ये ग्राम पंचायत, शाळा-महाविद्यालयं, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, आणि शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयातून एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्‍लास्‍टीकच्या कचऱ्याचं निर्मूलन केलं जाणार आहे.
****
 जालना शहरात, औरंगाबाद मार्गावर काल सकाळी स्कुटीवरून जाणाऱ्या दोन महिलांना अज्ञात वाहनानं धडक दिली, या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. मनिषा इंगोले असं मृत महिलेचं नाव आहे.
****

 उस्मानाबाद तालुक्यातल्या आंबेजवळगे गावचे माजी सरपंच मनोहरराव उर्फ मनू काका कुलकर्णी यांचं काल निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. ते सलग ५० वर्ष अंबेजवळग्याचे सरपंच होते. त्यांच्या पार्थिव देहावर आंबेजवळगे इथं अंत्यसंस्कार झाले.
****

 लोकमान्य टिळक हे भाषा घडवणारे ग्रंथकार असल्याचं प्रतिपादन, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथल्या बलवंत वाचनालयाच्या शताब्दी महोत्सवा निमित्त, ‘ग्रंथप्रेमी लोकमान्य टिळक’ या विषयावर ते काल बोलत होते. लेखक हा वाचनातूनच घडतो. टिळक हे उत्तम वाचक होते. त्यामुळे त्यांनी गीतारहस्य, 'ओरायन' ब्रह्मसूत्र वृत्ती यासारखे ग्रंथ लिहिल्याचं मत मोरे यांनी व्यक्त केलं.
****

 जम्मू काश्मिरच्या कलम-३७० चा प्रश्न ७० तासांत संवैधानिकरित्या सोडवला असल्याचं भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या एकता अभियानाच्या अनुषंगानं ‘कलम ३७० - ऐतिहासिक चुकीची ऐतिहासिक सुधारणा’ या विषयावर बोलत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही कलम ३७० ला विरोध केला होता, असंही ते यावेळी म्हणाले.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 17 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...