Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 17 August 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ ऑगस्ट २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
राज्याच्या विविध भागांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत; मराठवाड्यात
६५ मंडळात अतिवृष्टी
·
अनेक धरणांमधून विसर्गाला सुरुवात; हिंगोली जिल्ह्यात
पूर परिस्थिती
·
पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कृषी मंत्री
दत्तात्रय भरणे यांची सूचना
·
यशस्वी मोहिमेनंतर अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचं आज
पहाटे नवी दिल्लीत आगमन
आणि
·
राज्यात दहीहंडीचा उत्साह; दहा थर रचत
ठाणे इथल्या कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाची विश्वविक्रमाची नोंद
****
राज्याच्या
विविध भागांत पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाशी
निगडीत वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला.
मुंबई आणि
परिसरामध्ये काल झालेल्या जोरदार पावसात दोन जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी
झाले. मध्यरात्री एका घरावर दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. या पावसामुळे मुंबईत
ठिकठिकाणी पाणी साचून वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता.
**
मराठवाड्यातल्या
आठही जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस सुरू असून, ६५ मंडळात अतिवृष्टीची
नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरच्या १०, धाराशिव ११, बीड १७ तर नांदेड जिल्ह्यातल्या २७ मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
छत्रपती
संभाजीनगर शहरालगत असलेल्या वरूडकाजी, पीसादेवी, हर्सूल
सावंगी, चौका तसंच वैजापूर तालुक्यातील गारज आणि लोणी मंडळात
ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे पीकांचे नुकसान झालं आहे. जिल्हाभरात काल मध्यम स्वरुपाचा
पाऊस झाला. जायकवाडी धरण पट्ट्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली.
तसंच लासूरस्टेशन परिसरात दोन दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे लासूरगाव इथल्या शिवना
नदीला पूर आला आहे.
नांदेड
जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातल्या कोटबाजार इथं संततधार पावसानं कच्च्या मातीच्या
घराची भिंत कोसळून पती-पत्नीचा मृत्यू झाला.
लातूर
- धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा प्रकल्पाचे दहा दरवाजे काल उघडण्यात
आले असून, नदीपात्रात तीन हजार ८०६ घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरु
आहे. तर धाराशिव- बीड जिल्ह्याच्या सीमेवरील मांजरा प्रकल्पाच्या चार दरवाजातून तीन
हजार ४९४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तेरणा
आणि मांजरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात
माजलगांव तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. अतिवृष्टी झालेल्या
महसूल मंडळामध्ये पिकांचं नुकसान झालं आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे
करावेत, असं पत्र खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांना दिलं, तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी बिंदुसरा नदी परिसराची
पाहणी करत, या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन
केलं आहे.
हिंगोली जिल्ह्यातही ठिकठिकाणी
पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कयाधू नदीला पूर आला असून, हिंगोली,
कळमनुरी तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. पुराच्या पाण्याने
चिखली गावाला वेढा दिला आहे. कळमनुरी तालुक्यातल्या शेवाळा इथल्या पुलावरून एक ते दीड
फूट पाणी वाहत असल्यामुळे आखाडा बाळापूर -हदगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. विदर्भ
आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीला गौळ बाजार इथं मोठा पूर आला असून,
हा रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानं, मराठवाडा
विदर्भाचा संपर्क तुटला आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी अनेक ठिकाणी भेट देऊन
अधिकाऱ्यांना सजग राहण्याच्या सूचना दिल्या. ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार
पाऊस सुरू असल्यानं, धरणाच्या तेरा दरवाजातून बावीस हजार घनफूट
प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जालना शहरासह
जिल्ह्यात आज पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे.
बदनापूर तालुक्यातल्या बाजार गेवराई कडेगाव, वरुडी, ढासला,
पिरवाडी, सोमठाणा, गोकुळवाडी
या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीपिकांचं मोठ नुकसान झालं आहे. परतूर तालुक्यातल्या
कसुरा नदीला आलेल्या पुरामुळे परतूर-आष्टी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. घनसावंगी
तालुक्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातले नदी-नाले दुथडी भरून वाहत असून,
दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाच्या तडाख्यात ढाकेफळ इथल्या
माणिकदंड दत्त मंदिर इथला नळकांडी पूल वाहून गेला आहे, तर मांदळा
धरणाची पाणीपातळी वाढली आहे.
धाराशिव
जिल्ह्यात वाशी तालुक्यात घोडकी गावात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पीकांची कृषी मंत्री
दत्तात्रय भरणे यांनी काल पाहणी केली. नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना
त्यांनी संबंधितांना यावेळी दिल्या. शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळण्याचा अनुषंगाने
कार्यवाही केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
बाईट
- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
****
राज्यात
आजपासून २१ तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. या कालावधीत
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजा आणि
गडगडाटासह अधूनमधून ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात
आली आहे.
****
यशस्वी
अंतराळ मोहिमेनंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचं आज पहाटे नवी दिल्लीत आगमन
झालं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी विमानतळावर
त्यांचं स्वागत केलं. आपल्या मूळ गावी लखनौला जाण्यापूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांची भेट घेतील. जून महिन्यात ॲक्झिओम फोर मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात
पोहोचणारे शुक्ला हे पहिले भारतीय बनले.
****
भारतातून
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ४७ टक्के
वाढ झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी समाजमाध्यमावर ही
माहिती दिली. ही वाढ गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीतली असून मेक इन इंडिया कार्यक्रमाची
ही सफलता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. २०१४-१५ यावर्षात इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची
निर्यात ३१ अब्ज डॉलर्स होती. ती यंदा १३३ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे.
****
मुंबई उच्च
न्यायालयाच्या कोल्हापूर इथल्या सर्किट बेंचचं उद्घाटन आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती
भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या सर्किट बेंचचा लाभ कोल्हापूर, सातारा, सांगली,
सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना
होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे
मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
****
राज्यात
काल दहीहंडीचा उत्सात पाहायला मिळाला. राज्यात विविध ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात
आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि ठाणे इथल्या अनेक दहीहंडी आयोजनाच्या
ठिकाणी भेट देऊन गोविंदांना शुभेच्छा दिल्या. ठाण्यात प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि संस्कृती
युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहीहंडी मध्ये १० थर रचत कोकण नगरचा राजा गोविंदा
पथकानं विश्वविक्रमाची नोंद केली. त्यांना २५ लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यात
आलं.
दरम्यान, मानखुर्द
इथल्या बाल गोविंदा पथकातल्या एका गोविंदाचा दहीहंडीचा थर रचत असताना उंचावरून खाली
पडून मृत्यू झाला. दहीहंडी दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत ३० जण जखमी
झाले असून, १५ जणांवर उपचार सुरू आहेत.
छत्रपती
संभाजीनगर शहरात गुलमंडी, क्रांती चौक, टीव्ही सेंटर, कॅनॉट प्लेस, कोकणवाडी तसंच गजानन मंदीरासमोर दहीहंडीचं
आयोजन करण्यात आलं होतं. गोविंदा पथकांसह नागरीकही मोठ्या उत्साहात यात सहभागी झाले
होते.
****
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती
चांदेकर यांचं काल पुण्यात निधन झालं, त्या ६९ वर्षांच्या होत्या. गुरू,
मी सिंधूताई सपकाळ, तिचा उंबरठा या चित्रपटांमध्ये,
तर मिसेस आमदार सौभाग्यवती यासह अनेक नाटकात त्यांनी भूमिका साकारल्या.
सध्या सुरू असलेल्या ठरलं तर मग, या मालिकेसह त्यांनी अनेक दूरचित्रवाणी
मालिकांमध्ये ही काम केलं होतं. ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
होणार आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या त्या मातोश्री होत.
****
छत्रपती
संभाजीनगर शहरातल्या मकाई दरवाजाच्या कामाची काल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे यांनी पाहणी केली. पुढील एका महिन्यात विहित वेळेत काम पूर्ण करण्याची त्यांनी
राज्य पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केली.
****
छत्रपती
संभाजीनगर महानगरपालिकेच्या शास्ती से आझादी योजनेत शास्ती मध्ये ९५ टक्के सुट या योजनेला
३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन शहराच्या
विकासासाठी हातभार लावण्याचं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत
१५७ कोटी रुपये कर जमा झाला आहे.
****
संतश्रेष्ठ
ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या साडे सातशेव्या जयंती निमित्ताने परभणी शहर महानगरपालिकेच्या
वतीनं काल पालखी काढण्यात आली. मुख्यलेखाधिकारी प्रभाकर काळदाते यांच्या हस्ते माऊलींच्या
प्रतीमेची आरती करण्यात आली. देशमुख गल्ली इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखी सोहळ्याचा
समारोप झाला.
****
No comments:
Post a Comment