आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१२ सप्टेंबर
२०१९ सकाळी ११.००
वाजता
****
पुणे – बंगळूर महामार्गावर
सातारा जवळच्या लिंब खिंड परिसरात आज पहाटे एका खाजगी बस आणि ट्रकमधील भीषण अपघातात
सहा जण ठार आणि वीस जण जखमी झाले आहेत. पहाटे पाच वाजता हा अपघात झाला. अपघात ग्रस्त
बस बंगळूरकडे जात होती. मृतांची ओळख अद्याप पटली नसून ते बंगळूरचे रहिवासी असावेत,
असं पोलिसांनी म्हटलं आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यात
महापुरानं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कृषी विभागानं पूर्ण केले आहेत. संपूर्ण
कोल्हापूर जिल्ह्यात अठ्ठ्याहत्तर हजार एकशे दोन हेक्टर जमिनीवरची पिकं महापुरामुळं
बाधित झाल्याचं स्पष्ट झालं आहे. केवळ शेतीक्षेत्राचं तेराशे कोटी रुपयाचं नुकसान झालं
आहे. या महापुराचा कोल्हापूर जिल्ह्यातल्या साडे तिनशे पेक्षा जास्त गावांना फटका बसला
आहे. हा सविस्तर अहवाल केंद्र आणि राज्य शासनाला पाठवण्यात आला आल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या
सर्व सेवा सोसायट्यांचा कारभार जिल्हा बँकेशी ऑनलाइन जोडला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण कृषी आणि व्यावसायिक
कर्ज पुरवठा सुरळीत होणार आहे. काल सांगली इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ब्यान्नववी
वार्षिक सर्वसाधारण सभा झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष
दिलीप पाटील अध्यक्षस्थानी होते.
****
गेल्या दहा दिवसांपासून साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाची
आज गणेश विसर्जनानं सांगता होत आहे. यासाठी प्रशासनानं सर्व व्यवस्था केली आहे. औरंगाबाद
इथं मुख्य विसर्जन मिरवणुकीला शहरातल्या संस्थान गणपतीपासून सुरूवात होणार आहे.
परभणी महानगरपालिकेनं
गणेश मूर्तींचं विसर्जन नदी किंवा इतरत्र कुठंही न करता ते पालिकेच्या जलशुध्दी केंद्राजवळच्या
हौदात करावं असं आवाहन केलं आहे.
****
वन तसंच सामाजिक वनीकरण विभागातल्या रोजंदारी कामगारांनी
काल औरंगाबाद इथल्या प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी
तीव्र निदर्शनं केली. रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करा, थकीत वेतन त्वरीत द्या यासह
अन्य मागण्यांचं निवेदन मुख्य वन संरक्षक प्रकाश महाजन यांना देण्यात आलं. वन कामगारांच्या
मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन वन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन
मागे घेण्यात आलं.
*****
***
No comments:
Post a Comment