Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date –26 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ सप्टेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
पंजाब आणि महाराष्ट्र
सहकारी बँक-पीएमसी बँकेतून खातेधारकांना दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी
रिजर्व्ह बँकेनं दिली आहे. रिजर्व्ह बँकेनं परवा मंगळवारी पीएमसी बँकेवर सहा महिन्यांसाठी
निर्बंध घातले, यावेळी खातेधारकांना बँकेतून फक्त एक हजार रुपये काढण्याची परवानगी
दिली होती, ही मुदत दहा हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. या निर्णयामुळे बँकेच्या
किमान साठ टक्के ठेवीदारांना आपली शंभर टक्के रक्कम काढून घेता येणार आहे.
****
देशातल्या ऐतिहासिक
स्थळांच्या संरक्षणासाठी सर्वांनी योगदान द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या
नायडू यांनी केलं आहे. प्रसिद्ध पुरातत्व आणि इतिहासतज्ञ डॉ.जी. बी देगलूरकर यांना
आज पुण्यात उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी
ते बोलत होते. जुन्या कलाकृती आणि वारशांचं जतन करणं हे फक्त सरकारचं नव्हे तर प्रत्येकाचं
कर्तव्य आहे असं ते म्हणाले. इतिहासात पुणेकरांच्या उल्लेखनीय कर्तृत्वाला उपराष्ट्रपतींनी
उजाळा दिला. एक लाख रुपये आणि सोन्याच्या फाळानं भूमी नांगरत असलेली बालशिवाजीची प्रतिमा,
तसंच पुण्याच्या ग्रामदेवता अंकित असलेलं सन्मानचिन्ह, असं पुरस्कारचं स्वरुप आहे
****
राज्य सहकारी बँक घोटाळा
प्रकरणात सक्तवसुली संचालनालय-ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात
गुन्हा दाखल केल्याप्रकरणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आश्चर्य व्यक्त
केलं आहे. ते आज अहमदनगर जिल्ह्यात राळेगण सिद्धी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. शिखर
बँक घोटाळ्या संदर्भातल्या सुमारे वीस चौकशी अहवालात पवार यांचं नाव कुठेही नाही, असं
सांगतानाच, जे दोषी नाहीत त्यांना विनाकारण अडकवू नये, असं मत हजारे यांनी व्यक्त केलं.
आपण दिलेल्या पुराव्यात शरद पवार यांचं नाव नाही; पण पुरावे देऊनही ज्या अधिकाऱ्यांनी
कारवाई केलेली नाही, त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल व्हावा, असं हजारे यांनी नमूद
केलं.
****
विधानसभा निवडणुकीची
अधिसूचना उद्या जारी होणार आहे. उद्यापासून नामनिर्देशनपत्र सादर करता येणार असून,
नामनिर्देशन पत्र सादर करण्याची मुदत चार ऑक्टोबर रोजी दुपारी संपणार आहे. पाच ऑक्टोबरला
अर्जांची छाननी तर सात ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. एकवीस ऑक्टोबरला मतदान
तर चोवीस ऑक्टोबर मतमोजणी होणार आहे.
****
निवडणूक प्रक्रियेमध्ये
सुसूत्रता आणण्यासाठी आणि मतदारांच्या निवडणुकी संदर्भातल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी
निवडणूक आयोगानं १-९-५-० हा मदत क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. १९ सप्टेंबरपासून आतापर्यंत
या क्रमांकावर १४५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या क्रमांकावरून नागरिकांना निवडणूक
आणि मतदानासंदर्भातली माहिती मिळवता येणार आहे. सोबतच मतदार यादीसंदर्भातल्या अडचणीही
सोडवल्या जाणार आहेत.
****
धनगर समाजाचे नेते गोपीचंद
पडळकर यांनी वंचित आघाडी सोडण्याचा निर्णय आज जाहीर केला. आपल्या समर्थकांची बैठक घेऊन
दोन दिवसांत पुढची दिशा जाहीर करणार असल्याचं ते म्हणाले. ते आज सांगली इथं पत्रकार
परिषदेत बोलतं होते. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आहे, या प्रश्नातल्या
८० टक्के अडचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर केल्या आहेत, त्यामुळे हा प्रश्न
भाजपंच सोडवू शकेल अशी धनगर समाजाची धारणा झाली असल्याचं, ते म्हणाले. वंचित आघाडीचे
नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याशी आपले कसलेही मतभेद नाहीत, पण समाजाच्या प्रश्नासाठी
आपण वंचित आघाडी पासून अलिप्त होत आहोत असं पडळकर यांनी नमूद केल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त
आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदिप सिंग यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश
केला. अकाली दल या पक्षाचे आमदार बालकौरसिंग यांनीही आज भाजपात प्रवेश केला. राजकारणात
चांगल्या गोष्टीही करता येतात, आपण नरेंद्र मोदी यांच्या राजकारणापासून प्रभावीत असल्याचं
दत्त यानं म्हटलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या तडेगाव
इथले दोन युवक आज पूर्णा नदीपात्रात वाहून गेले. कचरु विठ्ठल गोफणे आणि नासेर नबी सय्यद
अशी त्यांची नावं असून, हे दोघे आज दुपारी बैल धुण्यासाठी नदी पात्रात उतरले असता,
ही घटना घडली. ग्रामस्थ तसंच प्रशासनाकडून या दोघांचा शोध घेतला जात आहे.
****
No comments:
Post a Comment