Monday, 23 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.09.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23  September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक सप्टेंबर २०१ दुपारी .०० वा.
****

 आयुष्यमान भारत ही फक्त एक आरोग्य योजना नसून, पन्नास कोटी भारतीयांसाठी ही योजना म्हणजे आरोग्याच्या क्षेत्रातला आशेचा किरण असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्वीटर संदेशात पंतप्रधानांनी या योजनेच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुलभ होऊन, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाल्याचं सांगितलं. या योजनेमुळे गरीबी आणि आजारपण यांचं दुष्ट चक्र नष्ट झाल्याचंही पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात नमूद केलं आहे.
****

 आयएनएक्स मीडीया प्रकरणी अटकेत असलेले माजी अर्थमंत्री पी. चिंदंबरम यांनी अर्थमंत्रालयाचं कार्यालय वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे.

 या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणी दरम्यान, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं, चिंदंबरम यांनी हे कार्यालय आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याच्या आरोप केला, मात्र चिंदंबरम यांनी आज दिल्ली उच्च न्यायालयात हा आरोप फेटाळून लावला.
****

 उद्योग करात कपात केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानले आहेत. या धाडसी निर्णयामुळे उद्योगांना दिलासा मिळालाच, शिवाय उद्योग क्षेत्रात नवीन गुंतवणूक येण्यासही या निर्णयामुळे चालना मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र हे देशाचं औद्योगिक केंद्र आहे, या निर्णयामुळे राज्यातही नवनवे उद्योग येण्यास मदत होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. रेपो रेटचा थेट संबंध कर्जाच्या व्याजदराशी जोडल्यामुळे, आता रेपो रेट कमी होताच, कर्जाचे हप्तेही कमी होतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुकूल असल्याचं, पक्षाचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे, ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती, त्यामुळे वंचित बहुजन आघाडी तसंच काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचंही नुकसान झालं, त्यामुळे समविचारी लोकांनी एकत्र यावं, असा आमचा प्रयत्न असल्याचं पवार यांनी सांगितलं. पुण्यातल्या आठ विधानसभा मतदार संघांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस चार जागा लढवणार असून, काँग्रेसला तीन तर एक जागा मित्र पक्षाला दिली जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

 दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठीचा आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.
****

 सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी आज पदाची शपथ घेतली. न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती रवींद्र भट्ट, न्यायमूर्ती रामासुब्रमण्यन, आणि न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तींची संख्या आता ३४ झाली आहे.
****

 सांगली जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या दूध संकलनात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १४ लाख लिटर दुधाचं संकलन होतं. मात्र महापुरामुळे हे संकलन दोन लाख लिटरनी कमी झालं आहे.  दराच्या स्पर्धेत  खासगी  दूध व्यवसायिकांच्या तुलनेत सहकारी संस्था मागं पडल्या आहेत.खाजगी व्यवसायिकांचे दूध संकलन ५० टक्के पेक्षा अधिक आहे, तर सहकारी संस्थांचा दूध संकलनातील सहभाग केवळ २३ टक्के एवढाच राहिला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 अकरावी प्रवेशासाठीच्या अंतिम फेरीला आजपासून सुरवात होणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ३० सप्टेंबरपर्यंत ही फेरी चालणार आहे. आतापर्यंत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले, प्रवेश रद्द केलेले, आतापर्यंत कोणत्याही फेरीत प्रवेश न मिळालेले, प्रवेश नाकारलेले, तसंच दहावीच्या फेरपरीक्षेत एटीकेटी सवलत घेऊन उत्तीर्ण झालेले आणि नव्याने अर्ज भरलेले विद्यार्थीही या फेरीत सहभागी होऊ शकतील, असं प्रभारी शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांनी सांगितलं आहे.
****

 माजी क्रिकेटपटू आणि उद्योजक माधव आपटे यांचं आज मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. आपटे यांनी १९५२ ते १९५३ या कालावधीत ७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं  प्रतिनिधीत्व केलं होतं.
*****
***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 16 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...