Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date –30 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० सप्टेंबर २०१९ सायंकाळी
६.००
****
विधानसभा निवडणुकीसाठी
अनेक मान्यवरांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब
थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर विधानसभा मतदार संघातून जोरदार शक्तीप्रदर्शन
करत अर्ज दाखल केला. निवडणूकीनंतर
राज्यात काँग्रेस आघाडीचाच मुख्यमंत्री असेल असा विश्वास, थोरात यांनी व्यक्त केला.
माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण
यांनी नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथून उमेदवारी अर्ज दाखल केला
बीड जिल्ह्यातल्या गेवराई विधानसभा मतदार संघातून
शिवसेना नेते बदामराव पंडित यांनी एक अर्ज अपक्ष तर एक अर्ज शिवसेनेच्या वतीनं दाखल
केला.
बीड जिल्ह्यातल्या एकूण सहा मतदारसंघात नऊ उमेदवारांनी
बारा अर्ज, परभणी जिल्ह्यात सहा उमेदवारांनी सहा अर्ज, जालना जिल्ह्यातल्या पाच पैकी
दोन विधानसभा मतदारसंघातून दोन उमेवारांनी, तर उस्मानाबाद जिल्ह्याच्या परांडा विधानसभा
मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाकडून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला
औरंगाबाद इथल्या सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार
यांची सिल्लोड विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षप्रमुख
उध्दव ठाकरे यांनी आज सत्तार यांना अधिकृत उमेदवारीचा ए बी फॉर्म दिला. उमेदवारी जाहीर
होताच सिल्लोडमध्ये शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि घोषणा देऊन जल्लोष केला.
****
शिवसैनिकांची संमती असेल, तर विधानसभा निवडणूक लढवण्यास
तयार असल्याची घोषणा, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते. आदित्य ठाकरे यांना वरळी मतदार
संघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
****
धनगर समाजाचे
नेते गोपीचंद पडळकर आज भारतीय जनता पक्षात परतले. मुंबईत प्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत पडळकर यांनी पक्षात
प्रवेश केला, मुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्षांनी त्यांचं स्वागत केलं. पडळकर यांना
बारामती मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी देण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी
दिले. शिरपूरचे आमदार काशिनाथ पावरा, शिरपूरचे काँग्रेस नेते प्रभाकर चव्हाण यांच्यासह
अनेकांनी यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
दरम्यान, बीड जिल्ह्यातल्या केज
विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी आज भारतीय
जनता पक्षात प्रवेश केला. परळी इथं गोपीनाथ गडावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार
डॉ प्रीतम मुंडे यांनी नमिता मुंदडा यांचं पक्षात स्वागत केलं.
***
धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी विधानसभा
निवडणुक लोकसंग्राम या आपल्या पक्षातर्फेच लढवणार असल्याची घोषणा केली, ते आज धुळे
इथं समर्थकांच्या मेळाव्यात बोलत होते. जो पक्ष आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद देईल त्या
पक्षात प्रवेश करण्यास आपण तयार असल्याचंही अनिल गोटे यांनी जाहीर केलं.
****
केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीच्या घेतलेल्या
निर्णयाचे पडसाद नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं उमटले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी
लासलगाव इथं कांदा लिलाव बंद पाडला तसंच मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता
रोको आंदोलन केलं.
****
जालना शहरात, औरंगाबाद मार्गावर आज सकाळी स्कुटीवरून
जाणाऱ्या दोन महिलांना अज्ञात वाहनानं धडक दिली, या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला,
तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. मनिषा इंगोले असं मृत महिलंचे नाव आहे.
****
रक्तदानाविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी
यादृष्टीनं उद्या एक ऑक्टोबर हा दिवस ‘ऐच्छिक रक्तदान दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार
आहे. “आयुष्यात एकदा तरी रक्तदान करा” हे यावर्षीचं घोषवाक्य आहे. औरंगाबाद इथल्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात ऑक्टोबर महिन्यात यानिमित्त विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी आज औरंगाबाद
इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. रक्ताची तूट भरून काढण्यासाठी नागरिकांच्या सक्रीय
सहभागाची आवश्यकता असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
महात्मा गांधींजींच्या १५० व्या जयंती निमित्तानं,
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा क्षेत्रीय जनसंपर्क विभाग आणि महात्मा गांधी मिशन यांच्या
संयुक्त विद्यमानं, उद्या औरंगाबाद इथं गांधीजींच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शन
आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे चित्रप्रदर्शन उद्यापासून तीन
ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री नऊ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य चालू राहणार आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातल्या गोदावरी
नदीकाठच्या सात गावातल्या नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार तसंच अधिकारी आणि
पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातल्या रस्त्यांच्या दूरवस्थेकडे
प्रशासनाकडून लक्ष दिलं जात नसल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी हा निर्णय घेतल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे
****
No comments:
Post a Comment