Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 26
September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद विवाद प्रकरणी
सुनावणीची कालमर्यादा वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणी सर्व
युक्तिवाद येत्या अठरा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना सरन्यायाधीश रंजन गोगोई
यांनी आज पुन्हा सर्व पक्षांना केली. पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर दररोज या प्रकरणाची
सुनावणी होत आहे. सुनावणीची वेळ दररोज एक तासाने वाढवून आता सायंकाळी पाच वाजेपर्यंत
या प्रकरणी सुनावणी घेतली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात पुरातत्व खात्यानं दिलेल्या
अहवालावर शंका व्यक्त केल्याप्रकरणी मुस्लीम पक्षानं न्यायालयाची आज माफी मागितली.
****
आर्थिक गैरव्यव्हार प्रकरणात सक्तवसूली संचालनालयाकडून
चौकशी होत असलेले उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेणं
गरजेचं असल्याचं, सक्तवसुली संचालनालयानं म्हटलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयात आज झालेल्या
सुनावणीदरम्यान, न्यायालयानं वाड्रा तपासाला सहकार्य करत नाहीत, असं न्यायमुर्ती चंद्रशेखर
यांना सांगत, त्यांच्या कोठडीची मागणी केली.
दरम्यान, या प्रकरणी वाड्रा
हे सहकार्य़ करत असून दिलेल्या तारखांना ते हजर राहील्याचं वाड्रा यांच्या वकिलांनी
न्यायालयाला सांगितलं आहे, या प्रकरणाची अंतिम सुनावणी ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या दोन ऑक्टोबरला गांधी
जयंतीच्या औचित्यावर अहमदाबाद इथं होणाऱ्या कार्यक्रमात, देश उघड्यावर शौचापासून मुक्त
झाल्याची घोषणा करणार आहेत. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती निमित्तानं अहमदबादच्या
साबरमती नदीच्या किनाऱ्यावर देशभरातल्या २० हजार सरपंचांना पंतप्रधान या दिवशी संबोधित
करतील, अशी माहिती गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी दिल्याचं पीटीआयचं वृत्त
आहे.
****
‘मन की बात' या आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रम
श्रृंखलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी ११ वाजता देशविदेशातल्या नागरिकांशी
संवाद साधणार आहेत. मन की बात या कार्यक्रम मालिकेचा हा सत्तावन्नावा भाग असेल. आकाशवाणी
आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रावरुन तसंच डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एआर आय डॉट कॉम
या संकेतस्थळावरुन या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे
दोन फुटाने उघडण्यात आले असून ३५ हजार १०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने नदीपात्रात पाणी
सोडण्यात येत आहे. पाणी सोडण्याचं प्रमाण दुपारपर्यंत प्रतिसेकंद ५५ हजार घनफुटांपर्यंत
वाढू शकतं, त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या लोकांनी तसंच प्रशासनानं सतर्क राहण्याचं आवाहन
जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, पुण्यात पावसाशी निगडित घटनांमध्ये मरण
पावलेल्या नागरिकांची संख्या आता अकरा झाली आहे. यामध्ये काल रात्री भिंत कोसळून मरण
पावलेल्या पाच जणांचाही समावेश आहे.
****
बुलडाणा जिल्हयातल्या चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणात
पाऊस झाल्यानं पैनगंगा नदीला पूर आला आहे. या पाण्याची आवक लक्षात घेता पेनटाकळी प्रकल्पामधून
नदीपात्रात सहा हजार सातशे बेचाळीस घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे.
नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे.
दरम्यान, खामगाव तालुक्यात उभारण्यात आलेल्या निम्न
ज्ञानगंगा प्रकल्पामधे यावर्षी प्रथमच पाणी साठवण्यात येत आहे. पहिल्याच वर्षी दमदार
पावसामुळे प्रकल्प ओसंडून वाहत आहे.
****
अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात
पोलिसांनी ५ लाख ३८ हजार ८८५ रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. मतदारसंघातल्या
पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत कासमार तपासणी नाका इथं, अकोल्यातल्या एका व्यापाऱ्याकडे
ही रक्कम आढळून आली. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या जांब
शिवारात एका शेतातल्या आखाड्यावर लपवून ठेवलेल्या गुटख्याच्या साठ्यावर स्थानिक गुन्हे
अन्वेषण विभागाच्या पथकानं काल छापा मारला. यात वीस लाख ६२ हजार दोनशे रुपये किंमतीचा
गुटखा जप्त करण्यात आला. परभणी जिल्ह्यातल्या बोरी इथल्या गुटखा विक्रेत्याचा हा माल
असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
सांगली जिल्ह्यातल्या कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणी
संशयित गणेश शेवाळे यास न्यायालयानं सात दिवस पोलीस कोठडी दिली आहे. या घोटाळ्यातील
मुख्य सूत्रधार सुधीर मोहिते हा अद्याप फरार आहे. या गुन्ह्यातील संदीप मोहिते, हनुमंत
जगदाळे हे अटकेत आहेत. या प्रकरणी आत्तापर्यंत अकराशे तक्रारी दाखल झाल्या आहेत.
****
कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी कश्यपनं
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दक्षिण कोरियात इंचिऑन इथं सुरू
असलेल्या य स्पर्धेत कश्यपने काल मलेशियाच्या डॅरेन ल्यू याचा २१-१७, ११-२१, २१-१२
असा पराभव केला.
*****
***
No comments:
Post a Comment