Friday, 13 September 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 13.09.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –13 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ सप्टेंबर २०१  सायंकाळी ६.००
****
काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर दोन मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळात झालेला समावेश रद्दबातल ठरवण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. मात्र राजकीय लाभासाठी केलेल्या अशा नियुक्त्या नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे. विखे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेले जयदत्त क्षीरसागर आणि भारतीय रिपब्लीकन पक्षाचे अविनाश महातेकर यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलं. याविरोधात दाखल याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं हे मत नोंदवलं. अशा पद्धतीनं मंत्रिमंडळात घेणं नैतिकदृष्ट्या योग्य नसलं, तरी न्यायालय त्यांना अपात्र ठरवू शकत नाही, असं न्यायालयानं नमूद केलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून जाधव यांचं पक्षात स्वागत केलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचं सांगितलं. भाजपनं शिवसेनेला देऊ केलेल्या जागांसंदर्भात पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं, ठाकरे म्हणाले.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले उद्या नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. उदयनराजे यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली. काल पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
****
दिव्यांगाच्या अडचणी सोडवून त्यांचं जीवन सुखकर व्हावं, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी आपण लवकरच शासकीय यंत्रणांसोबत चर्चा करू, अशी ग्वाही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिली आहे. आज मुंबई इथं दृष्टीहीन व्यक्तींच्या कल्याणासाठी अखिल भारतीय ध्वजदिन निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपालांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. नॅशनल असोशिएशन ऑफ ब्लाईंड अर्थात नॅब या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगाच्या कल्याणासाठी अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येत असल्यची माहिती नॅब संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी यावेळी दिली.
****
राज्यात आठशे छप्पन हेक्टर क्षेत्रावर ६८ वन उद्यानांची निर्मिती प्रगतीपथावर असून यासाठी जवळपास एकशे पस्तीस कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुंबई इथं झालेल्या एका बैठकीत ही माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रजाती आणि वन्यजीवांविषयी आस्था निर्माण व्हावी यासाठी स्वर्गीय उत्तमराव पाटील वन उद्यान योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात २ वन उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. तसंच वृक्षांचं महत्त्व आणि उपयोगिता सांगणारं संग्रहालय निर्माण करण्याचंही या योजनेत नियोजित असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
****
राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर कुष्ठरोग निर्मूलनासाठी आशा सेविकांनी योगदान द्यावं, असं आवाहन कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी केलं आहे. आज अमरावती जिल्ह्यात मोर्शी इथं राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यात १३ ते २७ सप्टेंबर दरम्यान आशा सेविका, पुरुष स्वयंसेवक तसेच आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत प्रत्येक गावात जाऊन स्त्री पुरुषांची तपासणी आणि सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५९ वा दीक्षांत समारंभ उद्या आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. विद्यापीठाच्या नाट्यगृहात उद्या सकाळी दहा वाजता हा दीक्षांत समारंभ होणार आहे. यावर्षीपासून क्यू आर कोड असलेल्या पदव्याचं वितरण करण्यात येणार असल्याचं कुलगुरुंनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात झरी परिसरात अद्ययावत साखर कारखाना उभारण्याची घोषणा आमदार डॉ राहुल पाटील यांनी केली आहे. झरी इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन तसंच तीन कोटी रुपयांच्या कामांचं लोकार्पण पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ऊस लागवडीसाठी या भागात उपलब्ध सुपीक जमीन, आणि लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याची उपलब्धता, यामुळे हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...