Saturday, 22 August 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.08.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 August 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.

****

देशात कोरोना विषाणुच्या सहा लाख ९७ हजार ३३० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंतची रुग्ण संख्या २९ लाख ७५ हजार ७०१ असून त्या तुलनेत हे प्रमाण २३ पूर्णांक ४३ शतांश टक्के आहे. या संसर्गासाठी कालपर्यंत तीन कोटी ४४ लाख ९१ हजार ७३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून यातल्या दहा लाख २३ हजार ८३६ नमुन्यांची तपासणी काल करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या संसर्गामुळे आतापर्यंत ५५ हजार ७९४ रुग्ण मृत्यूमुखी पडले असून यातले सत्तर टक्क्यांहून अधिक रुग्ण अन्य आजारही असलेले आहेत.     

****

सीमा सुरक्षा दलानं पंजाबमधे भारत पाकिस्तान सीमेनजिक कारवाई करताना पाच घुसखोरांना ठार केलं आहे. तरण तारण जिल्ह्यात एकशे तीन क्रमाकांच्या तुकडीनं आज पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. सीमेनजिक बेकायदा घुसखोरांच्या हालचाली टिपल्यानंतर या तुकडीनं घुसखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. घुसखोरांनी या तुकडीवर गोळीबार सुरू केल्यानंतर सैनिकांनी स्वसंरक्षणार्थ चोख प्रत्युत्तर देत त्यांना ठार केल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या सीमावर्ती भागात आता कसून शोध मोहीम सुरू आहे.

****

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एका कारवाईमधे एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. सुरक्षा दलांनी आज सकाळी क्रीरी भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी दहशतवाद्यानं सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केल्यानंतर उडालेल्या चकमकीत हा दहशतवादी मारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याची ओळख पटवली जात असल्याचही पोलिसांनी म्हटलं आहे.

****

केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालयातर्फे शिक्षक दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यात महाराष्ट्रातल्या दोघांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातल्या चेडगावच्या गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलराम तसंच मुंबईतल्या भाभा अणुशक्ती केंद्राच्या शाळेतील शिक्षिका संगीता सोहनी या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. देशभरातून ४७ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला असल्याचं मंत्रालयानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.

****

स्थलांतरित मजुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी दिली आहे. ते काल पालघर इथं आढावा बैठकीत बोलत होते. स्थलांतरामुळे कुपोषण, शाळाबाह्य विद्यार्थी अशा समस्या निर्माण होत असून आदिवासी समाजासाठी असलेल्या निधीचा योग्य वापर करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीही शासन प्रयत्नशील असल्याचं पाडवी यांनी यावेळी नमूद केलं.

****

सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या खात्यांचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरता जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यांच्या कार्यालयानं ही माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात बाळासाहेब पाटील यांना कोरोना विषाणुची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

****

सुखकर्त्या विधनहर्त्या गणरायाचं आज घरोघरी आगमन होत आहे. एकट्या मुंबईत सव्वा लाख घरगुती आणि दहा हजार सार्वजनिक गणरायाच्या छोट्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर सार्वजनिक मंडळांनी साध्या पद्धतीनं उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. मुंबईत पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून उत्सवावर नजर ठेवली जाणार असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नवी मुंबईत गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. यंदा केवळ ८४ गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी हाच आकडा १९३ होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाटे ३ वाजेपासून घरोघरी गणपती बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. धुळे तसंच सातारा जिल्ह्यातही ढोल-ताशाच्या गजरात गणरायाचं आगमन होत आहे.

****

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्र्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पाची दहाही दारं उघडण्यात आली आहेत. धरणात काल ९८ पूर्णांक ५० शतांश टक्के पाणीसाठा होता. महान पाटबंधारे विभागानं नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्यानं महान-काटेपूर्णा नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

****

मुंबईच्या वरळी परिसरात २७ लाख रुपये किंमतीच्या बनावट ‘एन 95 मास्कचा’ साठा पोलिसांनी जप्त केला आहे. एका वाहनातून हे मास्क विक्रीसाठी नेले जात असताना काल पोलिसांनी ही कारवाई केली.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 11 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...