Monday, 19 October 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 19 OCTOBER 2020 TIME – 18.00

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 October 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १९ ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.००

****

** अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय लवकरच घेवू -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन

** राज्य सरकार नाकर्ते असून विविध पातळ्यांवर अपयशी- विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

** औरंगाबाद जिल्ह्यात आज एका कोविडग्रस्ताचा मृत्यू; मृतांची संख्या एक हजार ३५

आणि

** वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना १० लाख रुपये लाच घेताना रंगेहात अटक

****

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय लवकरच घेवू असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणीनंतर ते सोलापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यावरचा अतिवृष्टीचा धोका अद्याप टळलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. नुकसानाची सविस्तर माहिती घेवून शेतकऱ्यांना मदत करून, गरज पडल्यास केंद्राकडे मदत मागू, पंतप्रधानांनी आपल्याला दूरध्वनीवरून मदतीची तयारी दर्शवली असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यापूर्वी आज सकाळी मुख्यमंत्री सोलापूर इथं पोहोचले, त्यानंतर त्यांनी अक्कलकोट तालुक्यात अनेक गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर सोलापुरात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला जिल्ह्यात पुरामुळे मृत्यू पावलेल्या १० व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपये मदतीचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी पडझड झालेल्या घरांची पाहणी केली, तसंच आपदग्रस्तांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.

****

राज्य सरकार नाकर्ते असून विविध पातळ्यांवर अपयशी ठरलं असल्याची टीका विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान, तुळजापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यातल्या शेतकऱ्याला टोलवाटोलवी नको असून, राज्य सरकार काय करणार हे स्पष्ट सांगावं, अशी मागणी शेतकरी करत असल्याचं, फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना सरकारचा बचाव करावा लागतो आहे, यातून सरकारचा नाकर्तेपणा बाहेर येत असल्याचं फडणवीस म्हणाले. भाजपने नुकसानग्रस्त भागाचे दौरे घोषित केल्यानंतर राज्य सरकारने दौऱ्यांचा कार्यक्रम जाहीर केला, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. 

****

अतिवृष्टीने जेवढे नुकसान झालं आहे, तेवढी मदत नक्कीच केली जाणार असल्याचं आश्वासन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे. ते उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं बोलत होते. प्रशासनाने सरसकट सर्व पिकांचे पंचनामे पूर्ण करून त्वरीत अहवाल सादर करावा, असे निर्देश वडेट्टीवार यांनी दिले. विमा संरक्षणाखाली येणारी जमीन तसंच पीक विमा भरलेल्या खातेदारांची माहिती तयार करावी, पिक विमा कंपनीने त्वरित पंचनामे पूर्ण करून पीक विम्याची रक्कम त्वरित देण्याची कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली. नुकसान झालेले रस्ते, पूल, पाझर तलाव आदीच्या दुरुस्तीबाबत स्वतंत्र अहवाल शासनाला सादर करावा, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

****

कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वाऱ्याच्या प्रसिद्ध दसरा महोत्सवाबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं निर्णय घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. तीनशे वर्ष जुना दसरा महोत्सव साजरा करण्याच्या परवानगीसाठी नांदेडच्या गुरुद्वारा सचखंड  मंडळानं केलेल्या याचिकेवर न्यायालयानं स्थानिक परिस्थितीनुसार याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दिले. मंडळाचे सचिव रवींद्रसिंग बुंगई यांनी ही माहिती दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

आणि आता ऐकू या राज्याचे वनमंत्री तसंच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी कोविड जनजागृतीअंतर्गत केलेलं आवाहन

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार ३५ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या ३६ हजार ५७६ झाली असून सध्या १ हजार ९४७ जणांवर उपचार सुरू आहेत.

****

धुळे जिल्ह्यात आज २४ नवीन कोरोनाबाधित रुग्णाची वाढ झाली. आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १३ हजार १०८ वर पोहोचली आहे. आज ४६ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातील १२ हजार ३७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रीय रुग्णांची संख्या घटून ३६३ इतकी झाली असून आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आज विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानापोटी सरसकट हेक्टरी ७५ हजार रुपये मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी जमा करावी, पीक विमा देण्यात यावा, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, रब्बीच्या पेरणीसाठी २५ हजार रुपये अनुदान द्यावे, या आणि इतर मागण्या आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी केल्या. गंगापूरचे माजी पंचायत समिती सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी १४ नोव्हेंबरला काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा जाधव यांनी दिला. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेऊन, त्यांना निवेदन देण्यासाठी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना बाहेरच रोखलं, त्यावेळी शेतकऱ्यांनी सोबत आणलेले टमाटे, मक्याची कणसं, सोयाबीन आणि इतर पिकं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात फेकून निषेध नोंदवला.

****

परळी इथल्या वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना १० लाख रुपये लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जैन यांच्या निवासस्थानी आज दुपारी धाड टाकून ही कारवाई केली. या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. वैद्यनाथ बँकेने कळंब इथल्या बँकेच्या एका सभासदाला अंदाजे अडीच कोटी रुपयाचे कर्ज मंजूर केलं होते. या प्रकरणी चेअरमन अशोक जैन यांनी १५ लाख रुपये लाच मागितली होती, त्यापैकी १० लाख रुपये घेताना, त्यांना पकडण्यात आलं.

****

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज परभणीच्या गंगाखेड रस्त्यावरील हाजी आशरफ पाडेला हॉस्पिटलमधील कोविड सेंटरला भेट देवुन माहिती घेतली. यावेळी आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार डॉ. राहूल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश विटेकर, महानगर जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, नगरसेवक मोईन आदी उपस्थित होते.

****

राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जालना तालुक्यातल्या आंतरवाला, गोलापांगरी, कुंभेफळ या गावांमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शासन शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन काम करत असून, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलं. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यावेळी उपस्थित होते.

****

परभणी जिल्ह्यात पूर्णा इथं तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी आज जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. माता रमाई तसंच पंतप्रधान घरकुल योजनेच्या घरकुलांचे हप्ते त्वरित वितरित करण्यात यावेत, यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

नाशिक जिल्ह्यातील कळवण इथं आज कांद्याला प्रतिक्विंटल ८ हजार ५०० रूपये इतका उच्चांकी भाव मिळाला. दिंडोरी तालुक्यातील वणी इथं कांद्याला आठ हजार शंभर रुपये तर लासलगाव बाजार समितीच्या आवारात देखील कांद्याला क्विंटलमागे ६ हजार ८९१ रुपये भाव मिळाला. विंचूर इथंही सहा हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 04 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...