Tuesday, 20 October 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.10.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२० ऑक्टोबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पावसामुळे खरडून गेल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या शेतातल्या विहिरीत गाळ साचलेला आहे, तसंच इलेक्ट्रिक पंप किंवा इरिगेशन संचाचं नुकसान झालं आहे, या नुकसानीसाठी वेगळ्या विशेष योजना तयार करण्याची गरज असल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता बळीराजाला पंचनामे न करता तत्काळ दिलासा देण्यासाठी इच्छाशक्तीची गरज हवी असं फडणवीस यांनी नमूद केलं.

****

कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, आणि तामिळनाडू या पाच राज्यात रोज नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांमध्ये गेल्या महिन्याभरापासून घट झाली आहे. महाराष्ट्रातल्या रुग्णांची संख्या २२ हजारावरून नऊ हजारांवर आली आहे. दरम्यान, देशातही आता सक्रिय रुग्णांची एकूण संख्या गेल्या सलग चार दिवसांपासून आठ लाखापेक्षा कमी असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३६ हजार ६८९ झाली आहे. यापैकी ३३ हजार ७८२ रुग्ण संसर्गमुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण एक हजार ३६ रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला असून, सध्या एक हजार ८७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

सण उत्सवांच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे ५० विशेष गाड्या सोडणार आहे. यामध्ये मुंबई गोरखपूर, पुणे निजामुद्दीन, मडगाव नागपूर मडगाव, लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर, या गाड्यांचा समावेश आहे. फक्त कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना रेल्वेत बसताना, प्रवासादरम्यान तसंच गंतव्यस्थानी उतरल्यावर कोविड संबंधी नियमांचं पालन करणं आवश्यक असेल.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...