Tuesday, 23 February 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 February 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 February 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०

****

** शालेय शुल्कासंदर्भात राज्यस्तरीय तसंच विभागीय शुल्क नियंत्रण समित्यांची स्थापना करण्यात येणार

** अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतपिकांच्या नुकसानाचे सविस्तर अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्देश 

** वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात आजपासून रात्रीची संचारबंदी

** जालना जिल्ह्यात येत्या ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालयं तसंच आठवडी बाजार बंद

आणि

** उस्मानाबाद जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश

****

शालेय शुल्कासंदर्भात राज्यस्तरीय तसंच विभागीय शुल्क नियंत्रण समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. पालकांनी या समित्यांकडे शुल्क वाढीबाबतच्या तक्रारी पाठवाव्या, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. शालेय शुल्कासंबंधी प्राप्त तक्रारींसंदर्भात झालेल्या एका बैठकीत त्या बोलत होत्या. कोविड कालावधीमध्ये शाळा बंद असताना काही शाळांकडून शुल्कासाठी तगादा लावला, शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर काढणं, सत्र परीक्षेची गुणपत्रिका न देणं, उशिरा शुल्क भरल्यास दंड वसूल करणं, अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित शाळांची संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत त्वरित चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश गायकवाड यांनी दिले आहेत. अनधिकृतपणे चालवल्या जाणाऱ्या शाळांवर शिक्षण हक्क कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

****

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतपिकांच्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून सविस्तर अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या संदर्भात वडेट्टीवार यांनी दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून आढावा घेतला. सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. औरंगाबाद, बीडसह अनेक जिल्ह्यांमध्ये शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या नुकसानाचा सविस्तर अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे निर्देश वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

****

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून आपलं ३० वर्षांचं सामाजिक राजकीय जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वनमंत्री संजय राठोड यांनी केला आहे. ते आज वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी इथं पत्रकारांशी बोलत होते. पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूबद्दल आपल्याला दु:ख आहे, मात्र या प्रकरणावरून घाणेरडं राजकारण केलं जात आहे, या आरोपात काहीही तथ्य नसल्याचं राठोड यांनी सांगितलं. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्यातून सत्य बाहेर येईल, मात्र समाज माध्यमं तसंच प्रसार माध्यमातून होणारी बदनामी थांबवा, असं आवाहनही राठोड यांनी केलं.

राठोड यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोहरादेवी परिसरात त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले होते

या गर्दीच्या अनुषंगानं बोलताना, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी, समाजाची आड घेऊन राठोड हे आपण निरागस असल्याचा दावा करत असल्याचं सांगत, समाजाला वेठीस धरून घोषणाबाजी केल्याने मुद्दा बदलत नाही, कारण गुन्हेगाराला जात नसते, असं चित्रा वाघ यांनी नमूद केलं. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी नोंद घेऊन कारवाई करावी. हा प्रश्न फक्त पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यापुरताच मर्यादित नाही, तर लैंगिक अत्याचार पीडित सगळ्या महिलांशी हा प्रश्न निगडित असल्याचं मत वाघ यांनी मांडलं. हे सरकार अत्याचाऱ्यांना अभय देण्याचं काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

****

या वर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यक खत पुरवठा वेळेवर आणि मागणीप्रमाणे करावा, अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. भुसे यांनी आज दिल्लीत केंद्रीय खतं आणि रसायन मंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन ही मागणी केली. राज्याला खरीप हंगामासाठी सुमारे ४४ लाख ५० हजार मेट्रीक टन खताची आवश्यकता असते. गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये जून ते ऑगस्ट या कालावधीत खत पुरवठा विस्कळीत झाला होता. यंदा ज्या महिन्यामध्ये पिकाच्या गरजेप्रमाणे खताची मागणी आहे त्याप्रमाणे वेळेवर आणि पुरेसा खत पुरवठा व्हावा, असं भुसे यांनी यावेळी सांगितलं.

****

स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. संत गाडगेबाबा यांची दशसुत्री आमच्यासाठी समाज कार्याची प्रेरणा असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हटलं आहे.

****

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी, तर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार अशोक मिरगे यांनी गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

नांदेड जिल्ह्यात भोकर ग्रामीण रुग्णालयात गाडगेबाबांना अभिवादन करण्यात आलं. रुग्णालयाचे वैधकीय अधिक्षक डॉ अशोक मुंडे यांनी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

****

वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येत आहे. रात्री अकरा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, आणि मनपा आयुक्त यांच्या बैठकीत निर्णय झाला. येत्या १४ मार्चपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. याकाळात जीवनावश्यक वस्तू, औद्योगिक क्षेत्र आणि त्यातले कर्मचारी यांना या संचारबंदीतून वगळण्यात आलं आहे.

****

जालना शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर येत्या ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालयं तसंच तालुका आणि गाव पातळीवरचे आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज याबाबत माहिती दिली. दहावी आणि १२ वीचे वर्ग मात्र सुरू राहणार आहेत. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर महसूल आणि पोलीस प्रशासनानं दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली असल्याचं जिल्हाधिकारी बिनवडे यांनी सांगितलं.

****

लातूर इथं विद्यार्थ्याच्या एका वसतीगृहात ४५ विद्यार्थ्याना कोविडची लागण झाल्याचे तपासणीत आढळून आलं आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ लक्ष्मण देशमुख यांनी ही माहिती दिली. औद्योगिक वसाहतीत असलेल्या या वसतीगृहाल्या बाधित विद्यार्थ्याना बार्शी रस्त्यावरील कोवीड केंद्रात ठेवण्यात आलं आहे. पालिकेने या वसतीगृहाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत केला आहे. वसतीगृहाला लागून असलेल्या इमारतीत इंग्रजी शाळा भरवली जाते, ही शाळा सुध्दा पुढचे दहा दिवस बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.

****

यवतमाळ जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोविड तपासणी करण्यासाठी यवतमाळ सीमेवर छावणी सुरू करण्यात येत आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी ही माहिती दिली. वैद्यकीय पथकामार्फत सर्व प्रवाशांची अॅटीजेन चाचणी केली जाणार आहे. कोविड बाधित आढळणाऱ्या रुग्णांना परत पाठवून विलगीकरणात ठेवण्यात येईल, असं जिल्हाधिकारी ईटनकर यांनी स्पष्ट केलं आहे.

****

परभणी इथं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज स्वतः रस्त्यावर उतरत नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांच्यासह महापालिकेचे पथक सकाळपासून बाजारपेठांमधून नियंत्रण ठेवत होतं. जिल्हाधिकाऱ्यांसह या पथकाने शहरातल्या अनेक भागातून पायी निरीक्षण करत, काही वाहनधारकांना समज दिली तर काहींना दंडही ठोठावला. व्यापाऱ्यांनाही मास्क वापरणं, सॅनिटायझरची व्यवस्था करणं, सामाजिक अंतर राखणं आदी सूचना करण्यात आल्या

****

उस्मानाबाद जिल्ह्यात दोन बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलं आहे. उस्मानाबाद शहरात १४ फेब्रुवारीला तर लोहारा तालुक्यात मार्डी इथं १५ फेब्रुवारीला हे विवाह होणार होते. जिल्हा बाल संरक्षण् अधिकारी ए.बी. कोवे यांच्या मार्गदर्शनात शेवटच्या क्षणी विवाहस्थळी पोहोचून हे विवाह थांबवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांवर कायमस्वरुपी भर्तीसाठी आज बँकेच्या सुमारे एक हजार ९०० शाखांमधल्या कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली. गेल्या सुमारे पाच वर्षांपासून बँकेत रिक्त पदांवर भर्ती झालेली नाही. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात २६ फेब्रुवारीला बँकेच्या सर्व ३२ प्रादेशिक कार्यालयांसमोर, ६ मार्च रोजी बँकेच्या पुण्यातल्या मुख्यालयासमोर निदर्शनं केली जाणार आहेत. तर १२ मार्च रोजी देशव्यापी संपाचा इशारा ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशननं दिला आहे.

****

पंढरपूर इथलं विठ्ठल रुक्मिणी मंदीर उद्या द्वादशीलाही बंद राहणार आहे. आज माघी एकादशीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, पंढरपुरात संचार बंदी लावलेली आहे. ही संचारबंदी उठल्यानंतर भाविक उद्या द्वादशीला येण्याची शक्यता असल्याने, भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदीर उद्याही बंद राहणार असल्याचं, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितलं आहे.

****

भारत आणि इंग्लंड संघात सुरू असलेल्या चार कसोटी क्रिकेट सामान्यांच्या मालिकेतला तिसरा सामना उद्यापासून अहमदाबाद इथं सुरू होणार आहे. दिवस आणि रात्र खेळवल्या जाणाऱ्या या सामन्याला दुपारी अडीच वाजता सरुवात होईल. मालिकेत एक एक सामना जिंकून दोन्ही संघ बरोबरीत आहेत.

//********//

 

No comments: