Wednesday, 24 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.02.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेला आज दोन वर्षं पूर्ण होत आहेत. देशातल्या अल्पभूधारक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांना उत्पन्नवाढीसाठी विविध मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेत शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये, याप्रमाणे तीन हप्त्यात वर्षभरात सहा हजार रूपये जमा होतात. या योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्यानं पहिला क्रमांक मिळवला आहे. केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते आज या पुरस्काराचं वितरण होणार आहे.

****

भारत-इंग्लंड दरम्यान तिसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून अहमदाबाद मधल्या मोटेरा इथल्या सरदार वल्लभभाई पटेल मैदानात सुरु होणार आहे. सामन्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या मैदानाचं औपचारिक उद्घाटन होणार आहे.

दिवसरात्र खेळला जाणारा हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होईल. या सामन्यात गुलाबी चेंडू वापरला जाणार आहे. मालिकेत एक - एक सामना जिंकून दोन्ही संघ बरोबरीत आहेत.

****

वनमंत्री संजय राठोड यांच्या दौऱ्यावेळी काल पोहरादेवी परिसरात त्यांचे समर्थक मोठ्या संख्येनं जमा झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गर्दीची गंभीर दखल घेतली आहे. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा प्रशासन तसंच पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी असे निर्देश, मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. वाशिमचे जिल्हाधिकारी तसंच जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबतचा अहवाल देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत 

****

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतपिकांच्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करून सविस्तर अहवाल, २८ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा प्रशासनांना दिले आहेत. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या संदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. औरंगाबाद, बीडसह अनेक जिल्ह्यांमध्ये शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

****

पंढरपूर इथलं विठ्ठल रुक्मिणी मंदीर आज द्वादशीलाही बंद आहे. काल माघी एकादशीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, पंढरपुरात संचारबंदी लावली होती. संचारबंदी उठल्यानंतर भाविक येण्याची शक्यता असल्यानं, भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदीर आजही बंद असल्याचं, मंदिर समितीनं सांगितलं.

****

No comments: