Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 February
2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.
****
सरकारनं कोविड
काळात देशात अत्यंत कमी वेळेत आरोग्य सुविधा बळकट केल्या असल्याचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राविषयी असणाऱ्या तरतुदीसंदर्भात
आयोजित वेबिनारमध्ये ते आज बोलत होते. सरकारी आणि खासगी क्षेत्राच्या एकत्रित प्रयत्नांनी
कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळांचं व्यापक नेटवर्क उभं केलं गेलं, असं ते म्हणाले. आरोग्य
क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद करण्यात आल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. अनेक
उपाययोजना राबवून अनेक लोकांचे प्राण वाचवण्यात भारतानं यश संपादन केलं असून, भविष्यात
कोणत्याही संकटाला तयार असलं पाहिजे, हे आपलं लक्ष्य असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
पंतप्रधान शेतकरी
सन्मान योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला देशात पहिला क्रमांक मिळाला
आहे. या योजने अंतर्गत पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांनाही सन्मानित केलं जाणार आहे. शेतकरी
सन्मान योजनेला दोन वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यांचा
आणि निवडक जिल्ह्यांचा उद्या नवी दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात
येणार आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी या उल्लेखनीय कामगिरी बद्दल अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. या योजने अंतर्गत राज्यात आता पर्यंत एक कोटी
१४ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून एक कोटी ५लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुमारे
११ हजार ६३३ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
****
राज्यात कोरोना
विषाणू प्रादुर्भावामुळे टाळेबंदी लावणार असल्याच्या वृत्ताचं गृहमंत्री अनिल देशमुख
यांनी खंडन केलं आहे. चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी
ट्विट संदेशाद्वारे दिला आहे.
****
संत गाडगेबाबा
यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. गाडगेबाबांनी जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे
चिकित्सक, डोळसपणे बघण्याचा संदेश दिला, प्रगत, पुरोगामी
महाराष्ट्राच्या जडणघडणीत संत गाडगेबाबांच्या विचारांचं मोठे योगदान असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यांनीही संत गाडगेबाबा यांना अभिवादन केलं आहे.
नांदेड जिल्हा
परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर आणि शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्या हस्ते संत
गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.
****
वैद्यकीय विद्याशाखेच्या एमबीबीएस अंतिम वर्षाच्या परीक्षा येत्या आठ मार्चपासून
ऑफलाइन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा
विभागानं ही माहिती दिली. तर २३ मार्चपासून प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या परीक्षा
होणार असल्याची माहिती परीक्षा विभाग प्रमुख डॉ. अजित पाठक यांनी दिली.
****
मध्यप्रदेशातल्या एका काँग्रेस आमदाराचा सोलापूर इथला तेल कारखाना आणि मालमत्तेवर
आयकर विभागाने छापा घातला आहे. निलेश डागा असं या काँग्रेस आमदाराचं नाव असून चिंचोळी
औद्योगिक वसाहतीत बैतुल ऑइलमिल या नावाने हा कारखाना सुरू आहे. रविवारी मध्यरात्रीपासून
सुरू झालेल्या या कारवाईत आतापर्यंत साडे सात कोटी रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे.
कारवाई अद्याप सुरू असल्याने अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील
चापानेर ग्रामपंचायतीनं आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दर बुधवारी भरणारा
हा बाजार आता भरणार नसल्याचं परिपत्रक ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांनी जारी केलं
आहे.
****
कीर्तनकारांनी कीर्तनातून महाआवास योजनेचा प्रसार करावा असं आवाहन उस्मानाबाद जिल्हा
परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी केलं आहे. उस्मानाबाद इथं कीर्तनकारांच्या
मेळाव्यात कीर्तनकार म्हणून डॉ. फड उपस्थितांना मार्गदशन करत होते. समाजातील दारिद्रय,
अज्ञान, बेरोजगारी, रोग, चुकीच्या प्रथा नष्ट होण्यासाठी संत साहित्याच्या प्रसाराबरोबर
शासनाच्या योजनांचाही प्रसार करावा, असं आवाहन फड यांनी केलं.
****
वस्तू आणि सेवा
कर जीएसटी कायद्यातील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी 'कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया
ट्रेडर्स'-'कॅट'ने येत्या २६ फेब्रुवारीला 'भारत बंद' पुकारला आहे. पुण्यासह देशातल्या
विविध ८४ व्यापारी संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. 'कॅट'चे राज्य शाखेचे कार्यकारी
अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी ही माहिती दिली. कोविडमुळे व्यापाऱ्यांवर संकट ओढावलेलं
असताना व्यापारवाढीसाठी प्रयत्न करण्याऐवजी 'जीएसटी'तील विविध जाचक अटींची पूर्तता
करण्यात व्यापाऱ्यांचा बराच वेळ जात आहे. त्यामुळे हे आंदोलन पुकारल्याचं, बाठिया यांनी
सांगितलं. औरंगाबाद जिल्हा व्यापारी माहसंघानंही या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान तिसरा कसोटी क्रिकेट सामना उद्यापासून अहमदाबाद इथं खेळला
जाणार आहे. दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल.
//************//
No comments:
Post a Comment