Monday, 22 February 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 February 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 February 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१० मि.

****

** राज्यात कोविड नियमांचं उल्लंघन झाल्यास पुन्हा टाळेबंदी लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा; सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमं तसंच आंदोलनं, मोर्चे यांना पुढील आदेशापर्यंत बंदी 

** राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू, अमरावती, वाशिम, अकोला, यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेनंतर बाजारपेठ बंद, शेगावचं गजानन महाराज मंदीरही भाविकांना दर्शनासाठी बंद

** मराठवाड्यात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ, काल दिवसभरात ५१५ नव्या रुग्णांची नोंद तर आठ जणांचा मृत्यू; औरंगाबाद शहरात २० पेक्षा जास्त रुग्ण असलेला परिसर बंद करण्याचा निर्णय

** मराठवाडा विभाग दक्षिण मध्य रेल्वेतून मध्य रेल्वेला जोडण्यासाठी लढा उभारण्याची खासदार डॉक्टर भागवत कराड यांची घोषणा

आणि

** बीड जिल्ह्यात एकोणतीस हजार सातशे चौऱ्यांशी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अपात्र

****

मास्क वापरा आणि टाळेबंदी टाळा, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, राज्यात नियमांचं उल्लंघन झाल्यास पुन्हा टाळेबंदी लावण्याचा इशारा दिला आहे. ते काल सामाजिक संपर्क माध्यमांवरून बोलत होते. राज्यात सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमं, आंदोलनं, मोर्चे यांना पुढील आदेशापर्यंत बंदी घातली असून, शासकीस कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. नागरिकांना पुन्हा टाळेबंदी हवी का, असा प्रश्न विचारत, यावर निर्णय घेण्यासाठी आठवडाभराची मुदत मुख्यमंत्र्यांनी देऊ केली. ते म्हणाले…

लॉकडाऊन करायचा का? आणि हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. या प्रश्नाचं उत्तर पुढचे आ‍ठ दिवस आपल्याकडनं घेणार आहे. ज्यांना लॉकडाऊन नको आहे, ती लोकं या सुचना ज्या आहेत, मास्क वापरणे, हात धुणं, आंतर ठवणे हे पाळतील. आणि ज्यांना लॉकडाऊन हवा आहे, ते विनामास्कचे फिरतील. बघुया किती जणांना लॉकडाऊन हवा आहे. आणि किती जणांना लॉकडाऊन नको आहे. मास्क घाला लॉकडाऊन टाळा, शिस्त पाळा लॉकडाऊन टाळा.

 

राज्यात कोविड रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. अमरावती विभागात काही निर्बंध पुन्हा लावावे लागत आहेत, कोविडची दुसरी लाट दारात उभी आहे, त्यामुळे काही बंधन पाळावी लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मी जबाबदार ही नवी मोहिम स्वयंशिस्तीने पाळण्याचं आवाहन त्यांनी केलं.

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबविली आणि यशस्वी केली. तशी एक नवी मोहीम आपण राबविली पाहिजे. ती म्हणजे मी जबाबदार. मी जबाबदार म्हणजे काय? ही जी काय आपली बंधन आहेत. मी घराबाहेर पडताना मास्क घालेनच, हात धुणार, पुर्वी प्रत्येकाच्या खिशामध्ये छोटी सॅनीटायझरची बाटली होती. हात आपण लगेच धुत होतो आणि अंतर ठेवणे या तीन गोष्टी पाळा आणि मला खात्री आहे ही मोहीम आपण सगळे जण आज पासून राबवाल.

 

गेल्या वर्षभरात वैद्यकीय सुविधांमध्ये मोठा सकारात्मक बदल झाला. कोरोनामुळे लावलेल्या शिस्तीचं पालन करणं आवश्यक असताना, मात्र मधल्या काळात शिथिलता आली. त्यानंतर होत असलेली रुग्ण वाढ चिंताजनक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन कामकाजाचं दिवसभरातल्या २४ तासांत विभाजन करण्याची तसंच वर्क फ्रॉम होम या कार्यपद्धतीचा अधिकाधिक अवलंब करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यानी केलं. ते म्हणाले.

ऑफिसच्या वेळा या विभागानं काही जणांनी ज्यांना ऑफीसमध्ये येण्याची आवश्यकता नाही वर्क फ्रॉम होम केल. आणि वर्क फ्रॉम होममध्ये सुध्दा आपण तुकड्या केल्या की आज या महिन्यामध्ये ही जी बॅच आहे माझी ही वर्क फ्रॉम करेल त्याच्यानंतर ती ऑफीसमध्ये यायला लागेल, ही वर्क फ्रॉम करेल तर कारण नसताना जी गर्दी होते ती गर्दी मग ट्रेनमध्ये असेल बसमध्ये असेल कार्यालयामध्ये असेल ईतर वेळेला खाण्यापिण्याच्या ठिकाणी असेल ही आपण नियंत्रीत ठेवु शकतो.

 

कोरोनासोबतच्या युद्धात सर्वसामान्यांच्या हातात शस्त्र म्हणजे औषध किंवा अद्याप लस नाहीये, मात्र मास्करुपी ढाल वापरावी, लसीकरणाच्या पूर्वी आणि लसीकरणानंतही मास्क वापरणं सर्वांना बंधनकारक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. केंद्र सरकारच्या निर्धारित वेळापत्रकानुसार सर्वसामान्यांना लस मिळेल. आरोग्य अधिकारी- कर्मचारी, कोविड योद्धे तसंच पहिल्या फळीतल्या नऊ लाख जणांना आतापर्यंत राज्यात लस देण्यात आली असून, या लसीचे घातक दुष्परिणाम नाहीत, त्यामुळे कोविड योद्ध्यांना लस घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

दरम्यान, देशभरात वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारनं राज्य सरकारांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संसर्गाचा जास्त प्रादुर्भाव जाणवत असलेल्या राज्यांसह इतर राज्यांनीही जास्त रुग्णसंख्येची ठिकाणं, प्रतिबंधित क्षेत्रं म्हणून जाहीर करावीत, रॅपिड अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आलेल्या लोकांची आरटी-पीसीआर चाचणी करणं अनिवार्य करावं, आणि संसर्गाच्या सर्वेक्षणावर नव्यानं लक्ष द्यावं, असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत.

****

राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी निर्बंध घालण्यात आले आहेत. पुणे आणि नाशिक जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अमरावती, वाशिम, अकोल, यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेनंतर दुकानं, आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालयं सहा दिवस बंद राहणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथलं श्री गजानन महाराज मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलं आहे.

****

राज्याच्या कोविडमुक्तीच्या दरात घट होऊन तो ९५ टक्क्यांच्या खाली म्हणजे ९४ पूर्णांक ९६ शतांश टक्के झाला असून, रुग्णसंख्या २१ लाखावर पोहोचली आहे. काल सहा हजार ९७१ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या, लाख ८८४ झाली आहे. काल ३५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५१ हजार ७८८ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ४८ शतांश टक्के झाला आहे. काल दोन हजार ४१७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ९४ हजार ९४७ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. सध्या राज्यभरात ५२ हजार ९५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ कायम आहे. काल दिवसभरात ५१५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर विभागात आठ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जालना जिल्ह्यातल्या चार, औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन, तर परभणी इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात काल २०१ रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात ९६, नांदेड ६०, बीड ५३, लातूर ४४, उस्मानाबाद २४, परभणी २१, तर हिंगोली जिल्ह्यात १६ नवे रुग्ण आढळून आले. 

****

औरंगाबाद शहरात रुग्णसंख्येत वाढ होत असून, महानगरपालिकेनं कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. एखाद्या कॉलनीत किंवा वसाहतीमध्ये २० पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास तो परिसर बंद करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर स्वतंत्र घरामध्ये कोरोना रुग्ण आढळल्यास त्या घरावर ‘येथे कोरोना रुग्ण आहे’, असं स्टीकर लावण्यात येणार असून, त्यासाठी पथकं स्थापन करण्यात आली असल्याचं पाडळकर यांनी सांगितलं.

****

कोविडचा नवा उद्रेक पाहता, सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी खबरदारी बाळगणं आवश्यक असल्याचं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. ठाणे जिल्ह्यात कोविड काळात विविध प्रकारे सेवा देणाऱ्या ४० कोविड योद्ध्यांचा, राज्यपालांच्या हस्ते काल मुंबईत सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. केरळ तसंच महाराष्ट्रात कोविड रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब असल्याचं, राज्यपाल म्हणाले. मात्र परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखणं, मास्कचा वापर करणं यासारख्या सवयी लावून घेतल्यास आणि लोकांमधला सेवा आणि समर्पण भाव टिकून राहिला कोरोनाचा पराभव निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोविड काळात आरोग्य तसंच स्वच्छता कर्मचारी, सामान्य नागरिक यांनी तर उत्तम काम केलंच, परंतु विविध सरकारी विभागांनी उल्लेखनीय काम केल्याचं, राज्यपालांनी नमूद केलं.

****

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि त्यांच्या पत्नी यांना कोविडचा संसर्ग झाला आहे. नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, योग्य खबरदारी घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर...

लस घेतल्यानंतरही मास्क वापरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. आपण लस घेतली आहे त्यामुळे ताप आला तरी कोणतीही चाचणी करण्याची गरज नाही अस मानून दुर्लक्ष केले असत तर आपल्याकडून लोकांना संसर्ग झाला असता. आपल्यासोबत पत्नीला ही संसर्ग झाला असून त्यामुळे कुटुंबीयांची कोविड तपासणी लक्षणे दिसताच महत्वाची ठरते. कोणतीही लक्षणे अंगावर काढू नये, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद.

 

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कोविड उपचार सुविधांचा आढावा घेतला. जिल्ह्यात प्राणवायू सुविधा असलेल्या १ हजार १०० रुग्णखाटा तर १९६ व्हेंटिलेटर आहेत. कोविड सुश्रुषा केंद्रात ९६० रुग्णखाटांची सुविधा पुनर्स्थापित करण्याचं काम वेगात सुरू आहे. केंद्र तसंच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं तंतोतंत पालन करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

बीड जिल्ह्यात कोविडबाधितांची वाढती संख्या पाहता, जिल्हाधिकारी राजेंद्र जगताप यांनी काल वैद्यकीय उपचार सुविधेचा आढावा घेतला. जिल्ह्यात आठ रुग्णालयात एक हजार १३८ रुग्णखाटांची सुविधा सध्या करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकास मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे, गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना देण्यात येत आहेत, विनाकारण घराच्या बाहेर पडू नये असं आवाहनही जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

परभणीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी काढलेल्या मिरवणुकीतून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शनिवार बाजारातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले आहेत.

****

लातूर जिल्ह्यात टाळेबंदी लावण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी स्पष्ट केलं. याबाबत सामाजिक संपर्क माध्यमांवरून चुकीची माहिती फिरत आहे, नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे

****

उजनी धरणाचं पाणी धनेगाव मार्गे लातूर शहरासाठी आणलं जाणार असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडणार असल्याची माहिती, पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख, आमदार धीरज देशमुख यावेळी उपस्थित होते. ऑक्सीजनचा प्रकल्प उभारण्यासाठी वीज अत्यंत महत्त्वाची असून, मांजरा परिवार वीज उत्पादन चांगलं करत आहे. त्यामुळे यापुढील काळात मांजरा परिवाराने ऑक्सीजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याबाबत विचार करावा, असं आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केलं.

****

मराठवाडा विभाग दक्षिण मध्य रेल्वेतून मध्य रेल्वेला जोडण्यासाठी लढा उभारणार असल्याचं, खासदार डॉ.भागवत कराड यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. दक्षिण मध्य रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक गजानन माल्या यांनी औरंगाबाद नजिक चिकलठाणा इथल्या पीटलाईनला मंजूरी दिली असून याबाबतचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठवला आहे. या पीटलाईनसाठीची २४ एकर जागा उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. औरंगाबाद इथं रेल्वेमार्गावर एक उडाणपुल आणि चार भुयारी मार्गाला मंजुरी मिळाली असून शिवाजी नगर भुयारी मार्गासाठी निधी मंजूर झाला असल्याचं खासदार कराड यांनी सांगितलं.

****

माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २८ फेब्रुवारी रोजी नांदेड इथं आयोजित तिसरा राज्यस्तरीय शंकर साहित्य दरबार कार्यक्रम, कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तुर्तास रद्द करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे संयोजक डी. पी. सावंत आणि समिती प्रमुख प्राध्यापक जगदीश कदम यांनी ही माहिती दिली.

****

शेतरस्ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांनी सामंजस्यानं पुढाकार घ्यावा असं आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केलं आहे. ते काल लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात उंबडगा खुर्द इथं शेत रस्ते तसंच पाणंद रस्त्यांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. काल एकाच दिवशी औसा तालुक्यातल्या ६१ गावांत ४१४ किलोमीटर लांबीच्या १५३ वेगवेगळ्या शेत रस्ते तसंच पाणंद रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आलं.

****

बीड जिल्ह्यातल्या एकोणतीस हजार सातशे चौऱ्यांशी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अपात्र असूनही, या योजनेचा लाभ घेतल्याचं दिसून आलं आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती केंद्रीय आयकर विभागाच्या माहितीशी संलग्न केल्यानंतर, हे शेतकरी आयकर भरणारे असल्याचं दिसून आलं. या शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला योजनेचा निधी परत घेण्याचं काम जिल्हा प्रशासनानं सुरू केलं आहे.

****

नांदेड इथल्या वृक्षमित्र फाऊंडेशन या संस्थेच्या स्वयंसेवकांनी काल गोवर्धन घाट नदी परिसरातील कचरा, प्लास्टिक, जलपर्णी आदी काढून साफसफाई मोहीम राबवली. आगामी तीन रविवारी सकाळी साडे सात ते साडे दहा या वेळात गोदावरी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. प्रा. परमेश्वर पौळ यांनी आकाशवाणीशी बोलतांना दिली.

//********//

No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 16 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 16 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...