Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 20 February 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** राज्यातल्या
सर्व गावांमध्ये इंटरनेट सुविधा पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं सहकार्य करण्याची मुख्यमंत्र्यांची
मागणी
** मधुमक्षिकापालनाकडे
आर्थिक प्रगतीचा मार्ग म्हणून पहाण्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचं आवाहन
** जालना जिल्ह्यात
आज तीन कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू
** बीड जिल्ह्यात विना मास्क
फिरणाऱ्या दिडशे नागरिकांवर दंडात्मक कारवाई
** परभणी जिल्ह्यात दहावी बारावी
वगळता सर्व शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत तर सर्व आठवडी बाजार १५ मार्चपर्यंत बंद
आणि
** कळमनुरी तालुक्यात
असोलवाडी इथं दगावलेल्या ३०० कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचं निष्पन्न
****
राज्यात सर्व गावात इंटरनेट सुविधा पोहोचवणं, हे आपलं उद्दिष्ट्य असून, त्यासाठी
केंद्र सरकारनं सहकार्य करण्याची मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या नीती आयोगाच्या
सहाव्या बैठकीत ते बोलत होते. भारतनेट च्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पोहोचवली जात
असली तरीही, महाराष्ट्रात दुर्गम भागातली अडीच हजाराहून अधिक गावं, इंटरनेट किंवा मोबाईलने
जोडली गेली नसल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून
राज्याला ही सुविधा लवकरात लवकर पुरवण्याची मागणी ठाकरे यांनी केली. सार्वजनिक वाहतूक
व्यवस्थेतही सुधारणा व्हावी म्हणून राज्य शासन प्रयत्न करत असून, केंद्राने अशा प्रकल्पांना
प्राधान्याने साहाय्य करावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
कोविड काळातही राज्य शासनाने विकास थांबवला नसून संकटावर मात करत मार्ग काढल्याचं
मुख्यमंत्री म्हणाले.
****
मधुमक्षिकापालन हे उत्पन्नाचे प्रभावी साधन असून याकडे शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने
आर्थिक प्रगतीचा मार्ग म्हणून पहाण्याचं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं
आहे. राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, तसंच महाबळेश्वर इथल्या मध संचानालयाच्या, प्रशासकीय
इमारतीचे उद्घाटन तसंच विविध उपक्रमांचा शुभारंभ देसाई यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी
ते बोलत होते. आज ग्राहकांकडून मधाची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मध संचालनालयाने
शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाबाबत प्रशिक्षित करावं, असं उद्योगमंत्र्यांनी सांगितलं.
उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यावेळी उपस्थित होत्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये
तसंच अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या, पोषण आहाराबरोबर
एक चमचा मध मिळेल, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
****
अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात एका डॉक्टरने कुटुंबाची हत्या करून आत्महत्या
केल्याचा प्रकार समोर आला आहे. राशीन इथं ही धक्कादायक घटना घडली. महेंद्र थोरात असं
या डॉक्टरचं नाव असून, त्यांनी ४० वर्षीय पत्नी आणि अनुक्रमे सोळा तसंच चार वर्षांच्या
दोन मुलांना विषारी इंजेक्शन देऊन हत्या केली आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं,
आत्महत्येपूर्वी महेंद्र थोरात यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून समोर आल्याचं, पोलिसांकडून
सांगण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे
करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले
आहेत. जिल्ह्यात फळपिकं, भाजी-पाला तसंच अन्य पिकांचं नुकसान झाल्याच्या तक्रारी विविध
महसूल मंडळामधून मिळाल्या आहेत. जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या खंबीरपणे
पाठीशी उभे राहील, असं मुंडे यांनी म्हटलं आहे.
****
प्रशासनाने साखर कारखान्यांकडून ऊस देयकाच्या विलंब व्याजाची वसुली प्रक्रिया सुरू
करावी अशी मागणी ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद
इंगोले केली आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे
सादर केलं आहे. मराठवाड्यात २०१४-१५ च्या गळीत हंगामात साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना
टप्प्याटप्प्याने मोबदला दिला, त्यामुळे ऊस उत्पादकांना विलंब व्याज देण्याची मागणी
इंगोले यांनी एका जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. उशीरा
दिलेल्या देयकाचं विलंब व्याज शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले
होते, साखर आयुक्तांनी कारखान्यांना त्याबाबतचे आदेश दिले होते. मात्र आयुक्तांच्या
या आदेशाला एकाही साखर कारखान्याने प्रतिसाद दिला नाही, याकडे इंगोल यांनी लक्ष वेधलं
आहे.
****
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर
यांच्या २०९ व्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. आचार्य बाळशास्त्री
जांभेकर यांचा राज्य सरकारने थोर पुरूषांच्या यादीत समावेश केल्यानंतर प्रथमच राज्यभर
जांभेकर यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी केली जात आहे. जांभेकर यांच्या जन्मतारखेबाबत
विविध मतप्रवाह होते. मात्र शासनाने शुध्दीपत्रक जारी करून, जांभेकर यांची जयंती २०
फेब्रुवारी रोजी साजरी करण्याचे आदेश नुकतेच दिले. त्यानुसार आज नवी मुंबईत कोकण भवन
इथं जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठात कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी, बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी
चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केलं.
****
हैदराबाद इथल्या डॉ रेड्डीज लॅबोरटीजने संशोधित केलेल्या कोविड प्रतिबंधक ‘स्फुटनिक’
या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्रीय औषध महानियंत्रकांकडे परवानगी मागितली आहे.
या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातली चाचणी उद्या संपणार आहे.
****
जालना जिल्ह्यात आज तीन कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या संसर्गानं
जिल्ह्यात दगावलेल्या रुग्णांची संख्या आता ३८० झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ७० नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून
आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १४ हजार ४३२ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त
झालेल्या २१ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले १३ हजार ६६५ रुग्ण
या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ३८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
बीड जिल्ह्यात कोविडबाधितांच्या संख्येत वाढ होत असून, जिल्ह्यात आज ५८ नवे कोविडबाधित
आढळून आले आहेत. जिल्हाधिकारी आर एस जगताप यांनी याची गांभीर्याने दखल घेत, विना मास्क
फिरणाऱ्या दिडशे पेक्षा जास्त नागरिकांवर आज दंडात्मक कारवाई केली
****
परभणी जिल्ह्यात कोविड बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीचे
वर्ग वगळून इतर सर्व वर्ग २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक
मुगळीकर यांनी दिले आहेत. मात्र सर्व शिक्षकांनी ऑनलाईन साधनांचा वापर करून अध्यापन
सुरू ठेवावं, असंही आदेशात नमूद केलं आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय
घेण्यात आला आहे. जिल्ह्यातले सर्व आठवडी बाजार १५ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
नगर परिषदांचे मुख्याधिकारी, आदींनी या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देश
देण्यात आले आहेत.
****
लातूर जिल्हयात सार्वजनिक ठिकाणी तसंच मंगल कार्यालयांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक
नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहेत. रस्त्यावर थुंकणे, मास्क न वापरणे, समारंभात संख्या
मर्यादेचं पालन न करणे, यासह विविध कारणांसाठी शंभर रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत
दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
****
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी आज कोविड प्रतिबंधात्मक
लस घेतली. इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कोविड प्रतिबंधात्मक लस घ्यावी
अस आवाहन डॉ लहाने यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात असोलवाडी इथं दगावलेल्या ३०० कोंबड्यांना
बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. मृत कोंबड्यांचे नमुने पुणे आणि भोपाळ
इथल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अहवालानुसार या
कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाले आहे. असोलवाडी इथं एक किलोमीटर
त्रिज्येतील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत.
****
परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात मौजे तिडी पिंपळगाव शिवारात काही कोंबड्या दगावल्याचं
आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तिडी पिंपळगावसह १० किलोमीटरचा
परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. या परिसरात प्रशासनाने सर्वेक्षणाचं
काम हाती घेतलं असून, गावात कोंबड्यांची खरेदी विक्री, वाहतुक, प्रदर्शन वगैरेंवर प्रतिबंध
लागू केले आहेत.
****
लातूर जिल्ह्यात विद्युत रोहित्र बसवणं तसंच थकबाकीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुबाडणूक
करणाऱ्यां कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी माजी आमदार शिवाजीराव पाटील
कव्हेकर यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन कव्हेकर यांनी लातूर परिमंळाचे मुख्य अभियंता
रविंद्र कोलप यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या
प्रश्नांची दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा कव्हेकर यांनी दिला आहे.
****
वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनात आज हिंगोली इथं शिवसेना आणि बंजारा समाजाच्या
वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. गेल्या दहा दिवसांपासून पूजा चव्हाण या युवतीच्या
आत्महत्येप्रकरणी राठोड यांच्यावर आरोप होत आहेत. मात्र राठोड हे निर्दोष असून त्यांची
बदनामी करण्याचे कारस्थान असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांनी
केला आहे.
****////****
No comments:
Post a Comment