Thursday, 4 February 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 February 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 February 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१० मि.

****

** संसदेच्या दोन्ही सभागृहांत कृषी कायद्यांवरून विरोधकांचा गदारोळ कायम

** राज्यातली सर्व विद्यापीठं आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयाचे नियमित वर्ग येत्या १५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीसह सुरु करण्याचा निर्णय

** ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक आणि सर्व सुविधायुक्त फिरतं रुग्णालय सुरू करणार - आरोग्य मंत्री राजेश टोपे

** भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात

** कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मा एकादशी यात्रेदरम्यान पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनाकरीता बंद ठेवण्याचा मंदिर समितीचा निर्णय

** राज्यात दोन हजार ९९२ नव्या कोविड रुग्णांची नोंद तर मराठवाड्यात बीड जिल्ह्यात दोन बाधितांचा मृत्यू

** आणि

** मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध विकास कामांची पाहणी करणार

****

संसदेच्या दोन्ही सभागृहांत काल विरोधकांनी कृषी कायद्यांवरून गदारोळ केला. लोकसभेचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं, तर राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा झाली. चर्चेला सुरुवात करताना भारतीय जनता पक्षाचे सदस्य भुवनेश्वर कालिता यांनी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी यावेळी बोलताना, तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराचा त्यांनी निषेध नोंदवला. तसंच इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद व्यक्त करत, अनेक सूचना मांडल्या. राज्यसभेत शून्यकाळ संपताच आम आदमी पक्षाच्या तीन सदस्यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, मोबाइल फोनचा वापर करून सभागृहातलं कामकाज रेकॉर्ड करू नये, असं आवाहन सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सर्व सदस्यांना केलं.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरु करण्याबाबत, विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करून सहमती झाली असताना देखील, विरोधी पक्षाचे सदस्य सभागृहात गदारोळ करत असल्याबद्दल संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नाराजी व्यक्त करत, हा राष्ट्रपतींचा अपमान असल्याचं मत व्यक्त केलं. लोकसभेचं कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आलं. मात्र तरीही प्रत्येक वेळी कामकाज सुरू होताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू ठेवल्यानं, कामकाज तहकूब करण्यात आलं.

****

शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह हॅशटॅग चालवणारी खाती आणि ट्वीटस बंद करण्याचे आदेश देऊनही अशी खाती अनब्लॉक केल्याबद्दल केंद्र सरकारनं ट्विटरला कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयानं शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह संदेश आणि असे संदेश देणाऱ्या खात्यांवर बंदी आणणायचे आदेश ट्विटरला दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी ट्विटरनं केली नसल्याचं आढळल्यानं सरकारनं ट्विटरला नोटीस बजावली आहे. ट्विटरला सरकारी आदेशांचं पालन करणं अनिवार्य असून, ट्विटर न्यायालयाची भूमिका बजावू शकत नाही, असंही सरकारनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचाराची चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे. या हिंसाचाराची केंद्र सरकार चौकशी करत असल्याची खात्री असल्यानं, सर्वोच्च न्यायालय मध्यस्थी करणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. २६ जानेवारीला शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढत दिल्लीत प्रवेश केला. यावेळी दिल्लीच्या सीमेवर तसंच दिल्लीत मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलकांकडून हिंसाचार करण्यात आला होता. याची चौकशी व्हावी अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या.

****

राज्यातली सर्व अकृषी, अभिमत, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठं आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग येत्या १५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीसह सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मुंबईत काल ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले......

येत्या १५ फेब्रुवारी पासून ५० टक्के उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील महाविद्यालय सुरु होतील. दुसऱ्या टप्यामध्ये वसतीगृह सुरु होतील. परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही मार्ग विद्यापीठाने खुले ठेवलेले आहे. यूजीसी ने जी सुरक्षीततेची गाईडलाईन दिलेली आहे. त्याचं तंतोतंत पालन करुन, संबधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करुन कॉलेज सुरु करावीत अशा पध्दतीचा जीआर आजच आम्ही निर्गमित केलेला आहे. परिक्षांच्या बाबत ऑफलाईन, ऑनलाईन दोन्ही पर्याय आहे. उपस्थितीच्या बाबतीमध्ये ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य नाही. पुढच्या आठ दहा दिवसामध्ये नक्की ऑफलाईन ची प्रेझेंटी किती असावी, ऑनलाईनची प्रेझेंटी किती असावी यासंदर्भातील निर्देश देखील आम्ही विद्यापीठाशी चर्चा करुन संबधित महाविद्यालयाला देऊ.

****

अनुसूचित जातीतील सर्व पात्र विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशिप, देशांतर्गत शिष्यवृत्ती, विद्यावेतन आणि तत्सम योजनांचा लाभ हा विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून देण्यात यावा असे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण आयुक्तांना दिले आहेत. कोविड प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालयं जरी बंद असली तरी ऑनलाईन, डिजिटल, ऑफलाईन आदी पद्धतींनी बहुतांश महाविद्यालयात शिक्षण सुरू असल्याचं ते म्हणाले. सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध योजना राबवल्या जातात त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा असंही मुंडे म्हणाले.

****

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक आणि सर्व सुविधा असणारं फिरतं रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. विशेषतः गरोदर महिलांना रुग्णालयातून  त्यांच्या घरी सुरक्षित सोडण्यासाठी ही सुविधा असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात दोन रुग्णालयं सुरू केली जाणार आहेत. मुंबईतही अशा फिरत्या रुग्णालयात वाढ केली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं.

****

औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार राजेश धोंडीराम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानपरिषदेचे सदस्य म्हणून सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.

****

पुण्यात काल संवाद, आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली. यावेळी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबर ४० वर्षे साथसंगत करणारे ज्येष्ठ टाळ वादक माऊली टाकळकर यांचा विशेष सत्कार विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलतांना अभ्यंकर यांनी पंडित भीमसेन जोशी यांनी संतवाणीव्दारे संपूर्ण जगाला ब्रह्मानंद दिल्याचं सांगितलं. याचं कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास आणि विराज जोशी यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आणि संगीताच्या विविध पैलूंवर रचलेल्या रचनांचे सादरीकरण केलं.

दरम्यान, आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीनं येत्या सहा आणि सात फेब्रुवारीला अभिवादन या संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात संगीताच्या मैफली तसचं पंडीत भिमसेन जोशी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार असल्याचं आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितलं.

रम्यान, भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर वाढवण्यात आलेल्या टाळेबंदीचा विचार करता पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं मा यात्रेदरम्यान २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी भाविकांना मंदिर दर्शनाकरीता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांनी पंढरपूरला येऊ नये असं आवाहन मंदिर समितीनं केलं आहे. श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद असताना मंदिराच्या बाहेरच्या परिसरात भाविकांना येऊ द्यायचे किंवा नाही या विषया संदर्भात शासन निर्णय घेईल असं समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगिलं

****

राज्यात काल दोन हजार ९९२ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ३३ हजार २६६ झाली आहे. काल ३० रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार १६९ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५२ शतांश टक्के झाला आहे. तर काल सात हजार ३० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ४३ हजार ३३५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ३७ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ३७ हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल बीड जिल्ह्यात दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या १३७ रुग्णांची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात ३१ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात ३४, बीड २९, नांदेड १६, उस्मानाबाद आठ, जालना आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी सात, तर परभणी जिल्ह्यात पाच नवे रुग्ण आढळून आले.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या विविध विकास कामांच्या पाहणी दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त काल विभागीय आयुक्त सुनील केंद्रीकर यांनी गरवारे क्रीडा संकुल इथल्या जलकुंभाची, प्रोझोन मॉल ते कलाग्रामपर्यंत सुरू असलेल्या रस्ते कामांची, तसचं चिकलठाणा इथल्या क्रीडा संकुल कामांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय उपस्थि होते.

****

नांदेड जिल्ह्यातल्या ग्रामीण रुग्णालय भोकर इथले आरोग्य सहायक तथा महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष सत्यजित टिप्रेसवार यांनी कोरोना लस घेतली आहे. कोविड-19 पासून सुरक्षीत होण्यासाठी सर्व आरोग्याधिकारी, कर्मचारी यांनी लस घेण्याचं आवाहन टिप्रेसवार यांनी केलं आहे.

मी दिनांक २८ जानेवारी २०२१ रोजी कोविड लस घेतली आहे. ती अत्यंत सुरक्षित आहे. साधारण लसीप्रमाणे मला थोडाफार त्रास झालेला आहे. तरी माझे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना नम्र विनंती आहे की आपण ही कोविड लस घ्यावी.

****

परभणी जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीनं काल रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १७५ जणांनी रक्तदान केलं. यावेळी परिवहन विभागाच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

****

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरातील नवीन मोंढा परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक टिप्पर पोलिसांनी जप्त केला. चालक सय्यद तौसिफ सय्यद लाल आणि जाफर पठाण यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करत पोलीसांनी टिप्परसह पाच लाख चार हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

****

नांदेड जिल्ह्यातील माहूरगड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता देऊन देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलावीत अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाबाबत मुंबईत विभागवार झालेल्या चर्चेत चव्हाण यांनी मराठवाड्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधलं.

****

कुविख्यात गुंड छोटा राजन याचा हस्तक आणि मोक्काच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. परमानंद हंसराज ठक्कर असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे. मुंबईतील एकाच जागेची बनावट कागदपत्र तयार करून बांधकाम व्यावसायिकांकडे पंचवीस कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन सह परमानंद ठक्कर आणि इतर चार जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

****

आयुर्वेदिक शिक्षण घेतलेल्या स्नातकांना आधुनिक वैद्यकशास्त्रातील शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्याचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी काल परभणी आणि नांदेड इथं भारतीय वैद्यकीय मंड‍ळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कालपासून साखळी उपोषण सुरु केलं आहे. या मागण्यांचं निवेदन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या एका परिपत्रकानुसार आयुर्वेदिक शिक्षण घेतलेल्या स्नातकांना आधुनिक वैद्यक शास्त्रातील शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

****

नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, बिलोली या तीन तालुक्यातील सरपंच पदाचं आरक्षण शुक्रवारी सकाळी ११ वाजता संबंधित तालुका मुख्यालयी काढलं जाणार आहे, असं प्रशासनानं कळवलं आहे.

****

केंद्र सरकारनं केलेले तीनही कृषी कायदे रद्द करण्याबरोबरचं राज्य सरकारनं टाळेबंदीच्या काळातील तीन महिन्याचं घरगुती आणि शेती पंपाचं वीज बिल माफ करावं याकरिता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनाची तीव्रता वाढवावी असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत ते बोलत होते. कार्यकर्त्यांनी राज्यात चळवळ मजबूत करण्यासाठी सभासद नोंदणी अभियान राबविण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या जुना मोंढा परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा शहरात दाखल होत असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

****

सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील कंदर आणि परिसरातील केळीची निर्यात वाढावी यासाठी आराखडा तयार करुन नियोजनबध्द प्रयत्न करणार असल्याचं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल सांगितलं. कंदरच्या केळीचा ब्रँड विकसित झाला असून तो प्रसिध्द व्हावा तसच उत्पादकता वाढावी, उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी सर्व संबंधित विभागांना एकत्रित करुन आराखडा तयार केला जाणार असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले.

****////****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 11 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...