Wednesday, 3 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.02.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ फेब्रुवारी २०१९ दुपारी १.०० वा.

****

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. चर्चेला सुरुवात करताना भारतीय जनता पक्षाचे सदस्य भुवनेश्वर कालिता यांनी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. भाजपचे दुसरे सदस्य विजय पाल सिंह यांनी, कोविड महामारीचा सामना करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांचं कौतुक केलं.

विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी यावेळी बोलताना, तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराचा त्यांनी निषेध नोंदवला. काश्मीर बद्दल बोलताना आझाद यांनी, जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली.

अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे नवनीत कृष्णन्, बीजू जनता दलाचे प्रसन्न आचार्य यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.      

****

देशात काल ११ हजार ३९ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ११० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी सात लाख ७७ हजार २८४ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५४ हजार ५९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १४ हजार २२५ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी चार लाख ६२ हजार ६३१ रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाले असून, सध्या एक लाख ६० हजार ५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, देशभरात आतापर्यंत ४१ लाख ३८ हजार ९१८ नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. 

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आजपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून, त्यांनी सकाळी सटाणा इथल्या देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या स्मारकाची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित होते.

****

राज्यातल्या होतकरु तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळवण्यासाठी राज्य शासनामार्फत १० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसंच स्टार्टअप्सना गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्राकरताही दोन लाख रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल मुंबईत या योजनांचा शुभारंभ करण्यात आला. ज्या तरुणांना नवीन काही करण्याची इच्छा आहे, त्यांना साधन, संपत्ती आणि मार्गदर्शन देऊन जगासमोर आणावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

****

जिल्हा नियोजनाचे काम करताना सर्व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात येतील, असं आश्वासन बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. बीड इथं जिल्हास्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. राज्य शासनाने बीड जिल्ह्याचा नियोजन आराखडा मंजूर करून जानेवारीतच संपूर्ण निधी उपलब्ध करून दिला असून, यामध्ये कोणताही निधी कमी केला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

****

नांदेड जिल्ह्यात अनुकंपा नियुक्तीसाठी शासन निर्णयातल्या तरतुदीनुसार जी पदं उपलब्ध आहेत, त्याबाबत नियमात बसणारी प्रकरणं तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत. अनुकंपा नियुक्तीबाबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सर्व कार्यालयनिहाय अनुकंपा ज्येष्ठता याद्या नियमानुसार अद्यावत करुन त्या प्रसिद्ध करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.

****

किसान रेल्वेनं मालवाहतूक करणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वाहतूक भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येत आहे, अशी माहिती, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क कार्यालयानं दिली आहे. ३१ जानेवारी पर्यंत विभागातून ३३ किसान रेल्वे सोडण्यात आल्या, या गाड्यांमधून १३ हजार ६५८ टन कांदा वाहतूक करण्यात आली. सहा कोटी ५८ लाख रुपये भाड्यापोटी रेल्वे विभागाला महसुल प्राप्त झाला असल्याचं, रेल्वे विभागानं पत्रकाद्वारे कळवलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं काल सामाजिक अधिकारीता शिबीर एडिआयपी योजनेअंतर्गत दिव्यांगांना सायकल आणि इतर कृत्रिम उपकरणांचं वाटप आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. केंद्र सरकारनं दिव्यांगांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी विविध योजना राबवल्या, दिव्यांग कायद्यात सुधारणा करून नौकरी, शिक्षण, व्यवसाय याठिकाणी प्रचंड सवलती निर्माण करुन दिल्याचं, आमदार पवार यांनी यावेळी सांगितलं.

****

बेशिस्त, बेजबाबदार, लाचखोर तसंच नैतिक अधःपतनाच्या तक्रारी असलेल्या आठ पोलिस कर्मचाऱ्यांना, परभणीचे जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी काल निलंबित केलं. अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांशी संबंध साधत स्वतःचा आर्थिक फायदा करून घेणं, अवैध वाळू वाहतूक करणारांकडून पैसे वसूल करण्याच्या आरोपाखाली हे निलंबन करण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे. आज परभणी शहरात नऊ पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं असल्याची माहिती, वसंतराव नाईक मराठवाड़ा कृषी विद्यापीठातल्या हवामानशास्त्र विभागानं दिली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...