Saturday, 20 March 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 March 2021 Time 7.10am to 7.25am Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 March 2021

Time 7.10am to 7.25am

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० मार्च २०२१ सकाळी ७.१० मि.

****

** नागरिकांनी नियमांचं पालन करावं, अन्यथा टाळेबंदी हा पर्याय असल्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

** राज्यातल्या खासगी कार्यालयं आणि आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचा आदेश 

** मराठा आरक्षण प्रकरणी अशोक चव्हाण हे समाजाची दिशाभूल करत असल्याचा प्रवीण दरेकर यांचा आरोप

** राज्यात नवे २५ हजार ६८१ कोविडग्रस्त; मराठवाड्यात १३ रुग्णांचा मृत्यू तर नव्या तीन हजार ४३३ रुग्णांची नोंद

** औरंगाबाद शहरात आज आणि उद्या कडकडीत बंद; जालना जिल्ह्यात कडक उपाययोजनांचे निर्देश

** हिंगोलीत महिलांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर; नांदेड जिल्ह्यात वर्क फ्रॉम होम ला चालना देण्याची सूचना

आणि

** मराठवाड्याच्या काही भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस

****

राज्यात कोविडचा वाढता धोका पाहता, नागरिकांनी नियमांचं पालन करावं, अन्यथा टाळेबंदी हा पर्याय असल्याचा इशारा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते काल नंदुरबार जिल्ह्यात मोलगी आणि धडगाव भागाचा दौरा केल्यानंतर बोलत होते. गेल्या सप्टेंबर महिन्यात राज्यात कोविड संसर्गाने सर्वोच्च बिंदू गाठला होता आताची परिस्थिती त्यापेक्षाही पुढे गेली आहे. यावर टाळेबंदी हा मार्ग असला तरी जनतेच्या सहकार्याने हा धोका निश्चितच थोपवला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणच्या लसीकरण सोयी सुविधांचा आढावा घेत नागरिकांशी संवाद साधला. लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, तसंच लसीकरणानंतर कोविडच्या नियमांचे पालन करावं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

****

कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने मिशन बिगीन अंतर्गत राज्यातली सर्व खासगी कार्यालयं आणि आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. आरोग्य तसंच इतर अत्यावश्यक सेवा आणि उत्पादन क्षेत्राला यातून वगळण्यात आलं आहे. सामाजिक अंतर राखणं सोयीस्कर होण्यासाठी, उत्पादन क्षेत्रास कामाच्या पाळ्यांमध्ये वाढ करण्याची मुभा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने घेता येईल, असंही आदेशात नमूद आहे. नाट्यगृहं तसंच सभागृहांमध्येही ५० टक्के उपस्थिती असावी, मात्र त्यांचा वापर धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे किंवा सभांसाठी करता येणार नाही, असंही या आदेशात म्हटलं आहे.

****

राज्यात खासगी कौशल्य विद्यापीठे स्थापन करण्यास नुकतीच मान्यता देण्यात आली असून यासंदर्भात प्रकल्प अहवालांची छाननी करण्यासाठी छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे अपर मुख्य सचिव या छाननी समितीचे अध्यक्ष असतील.

****

मराठा आरक्षणाचा विषय हाताळणारे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात दरेकर यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन, सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्याला नाही, असं अशोक चव्हाण सांगतात, मात्र सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीत महान्यायवादी वेणुगोपाल यांनी, राज्यांना आरक्षणासंदर्भात स्वतःचा कायदा करण्याचा अधिकार असून, त्यावर केंद्रीय कायद्याचे कोणतेही निर्बंध नसल्याचं सांगितलं. यावरून महाविकास आघाडी सरकार आणि अशोक चव्हाण हे जनतेची आणि मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचं स्पष्ट होतं, असं दरेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासात, मोठ्या चुका झाल्याचा निर्वाळा राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिल्यानंतरही शिवसेनेकडून सचिन वाझेची पाठराखण कशासाठी केली जात आहे, असा प्रश्नही दरेकर यांनी उपस्थित केला.

****

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान यांनी काल राज्यसभेत मराठवाड्यातल्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकण तसंच विद्युतीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्या राज्यसभेत शून्य प्रहरात बोलत होत्या. मराठवाड्यातले परभणी, नांदेड, जालना, या जिल्ह्यातल्या कृषी उत्पादनांना बाजारपेठ मिळून, विकासाला चालना मिळावी, यासाठी या भागातल्या रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण तसंच विद्युतीकरण होणं आवश्यक असल्याचं खासदार खान यांनी नमूद केलं.

****

लातूर इथं रेल्वे पीटलाईनसाठी मंजूर निधी देण्यासाठी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी दिली आहे. श्रृंगारे यांनी गोयल यांची नवी दिल्लीत भेट घेऊन, लातूर इथं रेल्वे संदर्भात विविध मुद्यांवर चर्चा केल्यानंतर ही माहिती दिली. पीटलाईनमुळे रेल्वेगाड्यांची स्वच्छता तसंच देखभालीची कामं होणार असून यामुळे लातूर रेल्वे स्थानकास विशेष महत्व येणार आहे.

****

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कान्हूराज बगाटे यांची नेमणूक नियमबाह्य असून यापुढे सनदी अधिकाऱ्यांमधून ही नियुक्ती करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. संस्थानचे माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर काल झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं हे निर्देश दिले.

****

विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल मुंबईत जे जे रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेतली. ‘ही लस पूर्णतः सुरक्षित असून सर्व पात्र व्यक्तींनी लस अवश्य घ्यावी, असं आवाहन, या दोन्ही नेत्यांनी केलं आहे.

****

राज्यात काल २५ हजार ६८१ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २४ लाख २२ हजार ०२१ झाली आहे. काल ७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५३ हजार २०८ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक २० शतांश टक्के झाला आहे. काल १४ हजार ४०० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २१ लाख ८९ हजार ९६५ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९० पूर्णांक ४२ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ७७ हजार ५६० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल नव्या तीन हजार ४३३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १३ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी पाच, जालना जिल्ह्यातल्या दोन, तर हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार २५१ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ६९७, जालना ५६७, लातूर २४२, बीड २९४, परभणी २१५, उस्मानाबाद ११९, तर हिंगोली जिल्ह्यात ४८ नवे रुग्ण आढळून आले.

****

औरंगाबाद जिल्ह्यात वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज रहण्याचे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात पालकमंत्र्यांनी काल दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनातल्या सर्व यंत्रणांचा आढावा घेतला. कोविड सुश्रुषा केंद्र आणि सर्व रुग्णालयांमध्ये अतिरिक्त रुग्णखाटा उपलब्ध ठेवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल पालकमंत्री देसाई यांनी समाधान व्यक्त केलं. घाटी रुग्णालयातल्या मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देसाई यांनी दिले.

 

दरम्यान, औरंगाबाद शहरात आज आणि उद्या कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व बँकाही आज ग्राहकांसाठी बंद राहणार असून कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी उपस्थित राहता येणार असल्याचं, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी ग्रामीण भागात ८ हजार रुग्णखाटा उपलब्ध करण्याचं नियोजन असून कोविड चाचण्यांची क्षमता प्रतिदिवस हजारापर्यंत करण्याचे नियोजन असल्याची माहिती डॉ.गोंदावले यांनी दिली.

पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी औरंगाबाद जिल्ह्यात रात्री आठ ते सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले.

सर्व नागरिकांनी औरंगाबाद जिल्ह्यातील या पार्शल लॉकडाऊनला आणि विकेंड लॉकडाऊनला अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र, कोरोनाच्या पेशंटची संख्या वाढत असतांना एक असा निर्णय घेण्यात आला आहे की, आजपासून पुढील आदेश येईपर्यंत रात्री आठ ते सकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कर्ऱ्फ्यू लावण्यात आलेला आहे. सर्व नागरिकांना असं अपील आहे की रात्री आठच्या अगोदर घरात जावं.अतिआवश्यक असेल औषधी घ्यायची असेल तरचं घराचे बाहेर पडावे, कुठल्याही प्रकारची गर्दी टाळावी,मला अपेक्षा आहे की सर्व नागरिक या आदेशाचं पालन करतील .

औरंगाबाद शहरात प्रवेश करणाऱ्यांची आजपासून शहराच्या सीमांवर अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे. जालना, बीड, जळगाव, नाशिक, पुणे, तसंच पैठण रस्त्यावर एकूण सहा ठिकाणी तपासणी नाके उभारून कोविडची लक्षणं आढळणाऱ्या प्रवाशांची अँटिजेन चाचणी केली जाणार आहे.

****

जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी न लावता कडक उपाययोजना राबवण्याचे निर्देश आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. जालना शहर आणि जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची होत असलेली लक्षणीय वाढ लक्षात घेऊन टोपे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीत जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, असा कोणताही निर्णय पालकमंत्री टोपे यांनी घेतला नाही.

****

हिंगोली इथं कोविडची लागण झालेल्या महिला रुग्णांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आलं असून, या ठिकाणी महिला वैद्यकीय अधिकारी आणि महिला आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातलं हे पहिलंच महिला कोविड सेंटर आहे. शहरालगत लिंबाळा भागात अल्पसंख्याक मुलींच्या वसतीगृहामध्ये सुरू केलेल्या या केंद्रात १०० रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था आहे, तातडीची गरज भासल्यास ऑक्सीजन सिलिंडरही उपलब्ध आहेत.

****

लातूर जिल्ह्यात सर्व व्यापारी बांधवांनी आपल्या दुकानाच्या दर्शनी भागात 'नो मास्क - नो एंट्री ' असा फलक लावण्याचं आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल केलं आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाच्या बैठकीत ते बोलत होते. सर्व व्यापाऱ्यांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं, असे निर्देश आयुक्त मित्तल यांनी दिले. सर्व दुकानं तसंच आस्थापना नियोजित वेळेत बंद करून दंडात्मक कारवाई होणार नाही, याची खबरदारी घ्यावी असं आवाहन व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात सर्व आस्थापना ५० टक्के उपस्थितीत चालवण्यात याव्यात, तसंच वर्क फ्रॉम होम पद्धतीला चालना देण्यात यावी, असे निर्देश प्रशासनानं जारी केले आहेत. ३१ मार्चपर्यंत सर्व मंगल कार्यालय, सभागृह, खाजगी शिकवणी वर्ग, आठवडी बाजार, उपाहारगृहं आदी बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्यांविरोधात आपत्त्कालीन कायद्यान्वये कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना कोविड संसर्ग झाला आहे. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. आपण गृहविलगीकरणाचा पर्याय निवडला असून, ई-तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कार्यालयीन कामकाज पाहत असल्याचं वर्षा ठाकूर यांनी सांगितलं आहे.

****

मराठवाड्यातल्या काही भागात काल गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. परभणी जिल्ह्यात काल सोनपेठ तसंच गंगाखेड परिसरात पाऊस झाला, सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसात गारपीटही झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या सिपोरा बाजार, बोरगाव जहागीर, परिसरात गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

****

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उद्या २१ मार्चला मतदान होणार आहे. सकाळी आठ ते दुपारी चार यावेळेत मतदान होईल. परवा २२ मार्चला  सकाळी नऊ वाजता मतमोजणी होणार आहे.

****

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या संचालक मंडळासाठीही उद्या जिल्ह्यातल्या ११ तालुक्यांत सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. कोविडबाधित मतदादारांना शेवटच्या अर्ध्या तासात दुपारी साडे तीन ते चार वाजेपर्यंत मतदान करता येणार असल्याचं, निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी सांगितलं.

****

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक विधीज्ञ विश्वंभरराव माने यांचं काल पुण्यात उपचारादरम्यान निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर शिरूर अनंतपाळ तालुक्यात लक्कडजवळगा या मूळ गावी आज सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. माने यांना  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांचा शोक संदेश यावेळी वाचून दाखवण्यात आला

****

परभणी जिल्ह्यात वीज देयकाची थकबाकी असणाऱ्या कृषीपंपांची वीज जोडणी तोडण्याची मोहीम सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या निषेधात काल वीज महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केलं. यापुढे वीजजोडण्या तोडल्यास वीज वितरण कार्यालयात जनावरं बांधण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला. कार्यकारी अभियंता के.एम.जमदाडे यांनी 'शासनाच्या ध्येय धोरणानुसार कारवाई केली जाईल', अशी प्रतिक्रिया दिली.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएसीच्या उद्या होत असलेल्या परीक्षांसाठी औरंगाबाद शहरातील स्मार्ट शहर बस सेवा सुरु राहणार आहे. परीक्षार्थींसाठी शहरातल्या विविध मार्गांवर सकाळी सात ते नऊ आणि संध्याकाळी पाच ते सात यावेळेत ही बससेवा सुरु राहणार असल्याचं महापालिकेच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.

//********//

 

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्...