Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11
June 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर
पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे.
सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा
स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३
९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२
७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
**
कोविड रुग्ण आणि मृत्यूबाबत आकडेवारी लपवली नाही - आरोग्य विभागाचा खुलासा
**
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीसाठी फक्त दहा पालख्यांना बसमधून वारीची परवानगी
**
वीज देयकाची माफी होवू शकत नाही - ऊर्जा मंत्री नीतीन राऊत यांची स्पष्टोक्ती
आणि
**
महाविकास आघाडी सरकारने विमा कंपन्यांचा फायदा करणारे
निर्णय घेतल्याची माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची टीका
****
कोरोना विषाणूचे रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपवण्यात आली नसल्याचा खुलासा राज्याच्या आरोग्य
विभागानं केला आहे. कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या,
बरे होणारे रुग्ण, मृत्यू यांच्या माहितीची
व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्यासाठी महाराष्ट्राची साथरोग सर्वेक्षण यंत्रणा
पारदर्शकपणे काम करत असून कोणतीही आकडेवारी लपवण्याचा प्रश्नच येत नाही, असं आरोग्य विभागानं म्हटलं
आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा माहिती
प्रलंबित राहते. तथापि ती अद्ययावत करण्यासाठी जिल्हा आणि महापालिका यांच्याकडे
नियमित पाठपुरावा केला जातो असंही विभागातर्फे सांगण्यात आलं. रुग्ण अथवा मृत्यूची
नोंद घेऊ नका, अशी कोणतीही सूचना दिली जात नाही, असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
****
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी वारीसाठी केवळ दहा
पालख्यांनाच बसमधून वारी नेण्यास परवानगी देण्यात आली
आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यासंदर्भात
झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
रिंगण आणि रथोत्सवाला १५ वारकऱ्यांना परवानगी देण्यात
आली असून वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची कोविड
चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या सोहळ्यात कोरोनाच्या सर्व नियमांच काटेकोरपणे पालन करणं बंधनकारक असल्याचंही
उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं. मुख्य मंदिर
मात्र भाविकांना दर्शनासाठी बंदच राहणार आहे.
****
राज्यात
उभारण्यात येणाऱ्या २५ हजार मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पातंर्गत १७ हजार मेगावॅट सौरऊर्जा
प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी
दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यातल्या निधोना उपकेंद्राचे ई - लोकार्पण
महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयातून ऊर्जामंत्री राऊत यांच्या हस्ते आज झालं. त्यानंतर
ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. या अंतर्गत मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचे
प्रकल्प येणार असून रोजगार वाढीला चालना मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. टाळेबंदीनंतर
अनेक संघटनांनी वीज देयकाच्या माफी संदर्भात मागणी केली आहे. मात्र, वीज देयकाची माफी
होवू शकत नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते म्हणाले.
जी जी मंडळी वीज वापरत असेल, त्या लोकांनी वीजेचं बील तर भरलंच पाहिजे.परंतू त्यांना जर काही अडीअडचणी असतील तर आमच्या अधिकाऱ्यांचे ॲप्स आहेत. त्या ॲपवर जावं. आपली तक्रार त्या ठिकाणी नोंदवावी. त्यांना जर हफ्ते पाडून पाहिजे असतील. तर हफ्ते सुद्धा त्याठिकाणी पाडून दिले जातील, सवलत दिली जाईल,परंतू वीजेची माफी होवू शकत नाही आणि होवू शकरणार नाही. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण वीजेची जी माफी आहे. ते देण्याचं काम राज्य सरकारचं असतं केंद्र सरकारचं असतं. ते काही खात्याचं नसतं. कारण खातं हे सार्वजनिक कंपन्या आहेत.सार्वजनिक उपक्रम आहेत. आणि त्यामुळे ते करता येणे शक्य नाही.
विदर्भ,
मराठवाड्यातल्या उद्योगांसाठी असलेलं अनुदान बंद झाली नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट
केलं. राज्यातल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळण्यासाठी कृषी वीज जोडणी कार्यक्रम महाऊर्जा
अभियानाअंतर्गत राबवत असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान,
औरंगाबाद नजिक वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या ३३ किलोव्हॅट उपकेंद्राचं लोकार्पणही राऊत
यांच्या हस्ते आज करण्यात आलं.
****
वीज
देयकातली शासनाकडे जमा होणारी रक्कम माफ करावी, अशी मागणी औरंगाबाद जिल्हा व्यापारी
महासंघाकडून ऊर्जामंत्री नीतीन राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन महासंघाच्या
वतीनं ऊर्जामंत्र्यांना देण्यात आलं. घरगुती वीज देयकातून १६ टक्के, वाणिज्यिक देयकातून
२१ टक्के तर औद्योगिक देयकातून ९ पूर्णांक दोन दशांश टक्के रक्कम सरकारकडे जमा होते,
हा भाग पुढचे सहा महिने माफ करावा, असं या निवेदनात म्हटलं आहे.
****
राज्यात दूरसंचाराचे मनोरे आणि पायाभूत सुविधा उभारणी करणाऱ्या संस्थांना
येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय
दूरसंचार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली.
जिल्हास्तरीय समित्यांच्या स्थापनेमुळे दूरसंचारचे मनोरे आणि पायाभूत सुविधा
उभारणी करताना येणाऱ्या अडचणी जिल्हास्तरावरच सोडवण्यात येतील तसंच राज्यात
दूरसंचार पायाभूत सुविधांचे एक मजबूत जाळे उभारण्यास गती मिळेल असा विश्वास
राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
****
महाविकास आघाडी सरकारने कापूस, धान,
तूर आदी पिकांच्या खरेदीची कार्यक्षम यंत्रणा तयार करावी अशी मागणी
भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे
केली. गेल्या वर्षी कापूस, भात, सोयाबीन,
तूर खरेदीची केंद्रे वेळेत सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना अनेक
गैरसोयींना तोंड द्यावे लागले होते. या वर्षी तरी आघाडी सरकारने या पिकांच्या
खरेदी केंद्रांची कार्यक्षम यंत्रणा तयार करावी असं पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
****
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांचा फायदा करणारे
निर्णय घेतल्याची टीका राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे. ते आज
औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे सरकारने उंबरठा उत्पादन तीन वर्षाकरिता
गोठवलं, त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याचा लाभ न मिळता, विमा कंपन्यांना लाभ झाल्याचं
बोंडे यांनी सांगितलं. ते म्हणाले...
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
असतांना २०१९ मध्ये १२८ लाख शेतकऱ्यांनी विमा काढला होता. त्यापैकी ८५ लाख शेतकऱ्यांना
पाच हजार ७९५ कोटी रुपयांचा विमा मिळाला. आणि उद्धव ठाकरे सरकारने उंबरठा उत्पादकता
घटवली, हवामानाचे निकष बदलवले आणि परिणाम हा झाला की, २०२० मध्ये १३८ लाख शेतकऱ्यांनी
पिक विमा काढला होता. त्यापैकी फक्त १५ लाख शेतकऱ्यांना ९७४ कोटी रुपयांचा विमा प्राप्त
होतो आहे.आणि कंपन्यांना चार हजार २३४ कोटी रुपयांचा नफा होत आहे.
****
औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज आठ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या सहा आणि जालना जिल्ह्यातल्या दोन जणांचा समावेश आहे.
दरम्यान घाटीत नऊ नवे रुग्ण दाखल झाले आणि पंधरा जणांना बरे झाल्यानं सुटी देण्यात
आली.
****
बीड
जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले नवे १३० रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक २८ रुग्ण
बीड तालुक्यात, त्याखालोखाल केज तालुक्यात २३, शिरूर १६, अंबाजोगाई १५, माजलगाव १३,
आष्टी ९, धारूर ७, वडवणी ६, पाटोदा ५, तर गेवराई तसंच परळी तालुक्यात प्रत्येकी ४ नवे
रुग्ण आढळले.
****
कृषी विभागातल्या अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांनी व्यापक भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहण्याचे
निर्देश कृषी विभागाचे प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे
पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिले आहेत. नांदेड इथं झालेल्या
आढावा बैठकीत ते आज बोलत होते. विकेल ते पिकेल याचा अर्थ फक्त शेतकऱ्यांनी आपला शेतमाल घेऊन बाजारात बसणं इतकाच
नसून, शेतकऱ्यांना व्यापक प्रमाणात मार्गदर्शन अपेक्षित
असल्याचं डवले यांनी यावेळी सांगितलं.
****
परभणी शहरात जिंतूर रोडवरील विसावा कॉलनीत कोविड नियमांचं उल्लंघन
केल्याप्रकरणी १५ जणांकडून तीन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
****
नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयात ८० टक्के पाणीसाठा
उपलब्ध असूनही महापालिकेच्या वतीनं नागरीकांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात
आहे. याविषयी नागरिकांनी महापालिका प्रशासना विरूध्द समाज माध्यमातून तीव्र नाराजी
व्यक्त करत शहराला दररोज पाणीपुरवठा केला जावा अशी मागणी पालकमंत्री अशोक चव्हाण
यांच्याकडे समाज मध्यमांवरून केली आहे.
//*********//
No comments:
Post a Comment