Friday, 11 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 11.06.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 June 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – जून २०२ दुपारी १.०० वा.

****

महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात आज आषाढी वारी संदर्भातल्या आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या दहा पालख्या २० बसेसच्या माध्यमातून पंढरपुरात पोहोचतील, प्रत्येक पालखीसाठी ४० वारकऱ्यांना परवानगी असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाही पायी वारीला परवानगी दिली नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. मुख्य मंदिर मात्र भाविकांसाठी आणि दर्शनासाठी बंदच असणार आहे. सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल, त्याचबरोबर सर्व सहभागी वारकऱ्यांना वैद्यकीय चाचणी बंधनकारक केली असल्याचं ते म्हणाले.

****

एचआयव्ही एड्स विरोधातल्या लढाईत भारत सर्व देशांसोबत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. एचआयव्ही एड्स संबंधी संयुक्त राष्ट्र संघाच्या ७५व्या अधिवेशनात ते आज बोलत होते. भारताच्या राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमात संशोधन आणि सुधारणा करुन, या आजाराच्या प्रसाराचा सर्वात जास्त धोका असलेल्या भागापर्यंत पोहोचण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचं, आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.

****

देशात राष्ट्रीय महत्त्व असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, गेल्या पाच वर्षात अशा संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांच्या संख्येत २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचं, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी सांगितलं. देशातल्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या सर्वेक्षणाचा २०१९ - २० या वर्षाचा अहवाल काल सादर झाला, त्यात ही बाब नमूद करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षात उच्च शिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेणाऱ्यामध्ये ११ पूर्णांक चार दशांश इतकी वाढ झाली असून, मुलींच्या संख्येतली वाढ १८ टक्के असल्याचं निशंक यांनी सांगितलं.

****

देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या २४ कोटी ५८ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या. काल दिवसभरात ३० लाख ३२ हजारांहून अधिक नागरिकांना लस टोचण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

****

विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यात २६ सप्टेंबर २०२१ रोजी होणाऱ्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या राज्य पात्रता परीक्षा-सेटचा अर्ज भरण्याची मुदत १७ जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत दहा जून ही होती.

****

औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलाच्या वाहनांचं लोकार्पण आज पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झालं. जिल्हा नियोजन आणि विकास निधीतून ही वाहनं पोलिस दलाला प्राप्त झाली असून, यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमता, गतिमानतेत अधिक वाढ होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास, देसाई यांनी व्यक्त केला.

****

नांदेड जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातल्या देगलूर, हिमायतनगर, माहूर, माळाकोळी, वाई, सिंदखेड, तळणी, कंधार आणि लोहा या भागात मुसळधार पावसाची नोंद झाली.

****

रंगाबाद इथल्या शिवसैनिकांनी आपआपल्या वॉर्डात शासनाच्या नियमावलीसंबंधी जनजागृती करावी असं आवाहन, शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केलं. पाच जूनपासून शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यात, निर्धार कोरोना मुक्त गाव, ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. याअतंर्गत कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढत असतानांची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीचा आढावा दानवे यांनी घेतला.

****

परभणी जिल्ह्यातल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि शेतकरी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना चालू महिन्यादोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ या दरानं धान्य मिळणार आहे. जिल्ह्यातील पात्र शिधा पत्रिकाधारकांनी अधिकृत शिधावाटप दुकानातून धान्य घ्यावं असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा यांनी केलं आहे.

****

औरंगाबाद, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती करीता अर्ज मागवण्यात येत आहे. यासाठी येत्या ३० जूनपर्यंत निहीत नमुन्यात अर्ज करण्याचं आवाह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाकंडून करण्यात आलं आहे.

****

जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं ‘भारतीय योग संस्थान’च्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं २१ जून पर्यंत निशुल्क ऑनलाईन योग शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये आज पासून १४ जून पर्यंत चार दिवस ‘रक्तदाब रोग निवारण शिबीराचं’ आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती विभागीय प्रमुख डॉ.उत्तम काळवणे यांनी दिली आहे.

****

नाशिक शहरात वृक्ष तोडल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला आहे. संरक्षित सूचित असलेली झाडं तोडल्यास दहा हजार रुपये, तर सूचित नसलेली झाडं तोडल्यास पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या शिवाय शहरात काही रस्त्यांवर मधोमध झाडे असून, अशा डेरेदार वृक्षांचं अन्यत्र रोपण करण्याचाही निर्णयही महानगरपालिकेनं घेतला आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 28 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 28 June 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...