Saturday, 12 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 12.06.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१२ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या २४ कोटी ९३ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या. काल दिवसभरात ३१ लाख ५० हजारांहून अधिक नागरिकांना लस टोचण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

****

कोविड विषाणू संसर्गाची तिसरी लाट येणार की नाही हे कोरोनाला न ठरवू देता, गावांनी कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, आणि आपली गावं कोरोनामुक्त ठेवावीत असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरपंचांना केलं आहे. काल औरंगाबाद, अमरावती, नागपूर या तीन विभागातल्या १९ जिल्ह्यांतल्या सरपंचांशी साधलेल्या संवादात मुख्यमंत्र्यांनी सावधानता बाळगत नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं.

****

नांदेड शहरास पाणी पुरवठा करणारा डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प आज सकाळी ९५ टक्के क्षमतेनं भरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत असून त्यामधून गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या पूर नियंत्रण अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या नेकनूर गावालगत कळसंबर परिसरात उसाच्या शेतात बिबट्या दिसून आला. या बिबट्याच्या हल्ल्यात या परिसरातील एक शेतकरी गंभीर जखमी झाले असून नेकनूर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. वन विभागाने या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

****

मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी १३ आणि १४ जून या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील समुद्र किनारे आणि लगतच्या परिसरात न जाण्याचं आवाहन नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनाद्वारे करण्यात आलं आहे.

****

अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि प्रथितयश साहित्यिक पु. ल. देशपांडे यांची आज पुण्यतिथी. यानिमित्तानं केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी पुलंना अभिवादन केलं.

****

 

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 28 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 28 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...