Thursday, 17 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 17.06.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 June 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – जून २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईनं बारावीच्या मूल्यमापनाचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयात आज सादर केला. यासाठी तीन प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. इयत्ता दहावी मध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर ३० टक्के गुण देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल, असं सीबीएसईनं सांगितलं आहे. ३१ जुलै रोजी बारावीचे निकाल जाहीर होतील. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबद्दल आक्षेप आहे, त्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा परीक्षेला बसता येणार आहे, असं यावेळी सांगण्यात आलं. या आधारावर आता बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्याची शिफारस सीबीएसईनं केली आहे. कोविड प्रादुर्भावामुळे सीबीएसईनं बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.

****

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाची सुरक्षा आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्था - एनआयए च्या पथकानं, आज पहाटे मुंबई पोलिस दलातले माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकला. उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात एनआयएने याआधी शर्मा यांची चौकशी केली होती. अंबानी यांना धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी शर्मा यांचा संबंध असावा, असा एनआयएला संशय आहे.

****

राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी, आज राज्यभरातल्या तहसील कार्यालयांवर मोर्चे काढत निदर्शनं करण्यात येत आहे. किसान सभेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले आणि संगमनेर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी दुधाचा अभिषेक घालून आंदोलन केलं. संघटनेचे डॉ अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

****

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हिंगोली लोकसभा क्षेत्रासाठी एकूण दहा हजार ५७४ घरकुलांसाठी १५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ५० कोटी रुपयांचा निधी लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांना एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही अनेक लाभार्थ्यांना त्यांचे निम्मे हप्ते न मिळाल्याने त्यांची घरे अर्धवट राहिली होती. केंद्राच्या निधी अभावी हिंगोली लोकसभा मतदारसंघात ही योजना रखडली होती. त्याची दखल घेऊन खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदिप सिंग पुरी यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. 

****

कोविड-19 शी लढण्यासाठी अग्रस्थानी कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाचा शुभारंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे. २६ राज्यांमधल्या १११ प्रशिक्षण केंद्रांमध्ये या कार्यक्रमाची सुरूवात होईल. उद्या सकाळी ११ वाजता दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे हा कार्यक्रम होणार आहे.

****

फ्रान्सची टोटल एनर्जीज ही तेल कंपनी औरंगाबाद आणि मराठवाड्यात गुंतवणूक करण्याकडे लक्ष देत आहे. त्या उद्देशानं त्यांनी औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय आणि स्मार्ट सिटी विभागासोबत काल ऑनलाईन बैठक घेतली. औरंगाबाद भागातल्या जैव - ऊर्जा प्रकल्पात गुंतवणूक करण्यावर या संस्थेचा विचार आहे. भारत आणि फ्रान्सची रणनीतिक भागीदारी, ऊर्जा संबंध आणि सांस्कृतिक संबंध यासह अन्य विषयांवर यावेळी चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत आणि फ्रान्स एकत्रितपणे संयुक्त राष्ट्रानंतर सौर गटात नेतृत्व करतात. गुंतवणूकीसाठी सकारात्मक संकेत देताना टोटल एनर्जीजच्या प्रतिनिधींनी कच्च्या मालाच्या उपलब्धतेविषयीही अधिक माहिती मागविली असल्याचं, महापालिकेच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.

****

भारतीय स्टेट बँकेनं कोविड-19 बाधितांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी साडेआठ टक्के दरानं नियम आणि अटीनुसार वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. एसबीआयच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक शंकर येरावार यांनी काल ही माहिती दिली. एक एप्रिल २०२१ नंतर कोविड झाल्यास त्यांच्या नियमित कर्ज खातेदारांना कोविड कवच वैयक्तिक कर्ज तसंच सर्व नियमित पेन्शन धारकांना हे कर्ज मिळेल, असं येरावार यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या प्रधानमंत्री किसान योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी किसान क्रेडीट कार्डसाठी आपल्या कार्य क्षेत्रातील बँकेकडे आवश्यक कागदपत्रांसह तात्काळ अर्ज करण्याचं आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक मंगशे सुरवसे यांनी केलं आहे. किसान क्रेडीट योजनेअंतर्गत बँकामार्फत शेतकऱ्यांना आवश्यक त्या वेळी कर्ज खात्यामधून सुलभ आणि सोप्या कार्यपध्दतीद्वारे भांडवली कर्ज उपलब्ध होईल, असं ते म्हणाले.

****

नांदेड आणि परभणी जिल्ह्यात आज पहाटे पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद तालुक्यात आतापर्यंत २१८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. बन्नाळी गाव शिवारात पारंपारिक पद्धतीने खरीप हंगाम पेरणी करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...