Thursday, 23 June 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.06.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 June 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या आमदारांची संख्या ४६ वर पोहचली आहे. रामटेकचे शिवसेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल यांच्यासह चार आमदार गुवाहाटी इथल्या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. आज आशिष जैस्वाल यांच्यासह सदा सरवणकर, दीपक केसरकर, संजय राठोड, मंगेश कुडाळकर हे आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाले.

****

नवीन भारताची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला प्रत्येक सरकारी योजनेत सहज प्रवेश मिळणं गरजेचं असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज उद्योग आणि वाणिज्य भवनाच्या “वाणिज्य भवन” या इमारतीचं आणि निर्यात पोर्टलचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक करदात्याचा आदर करण्यासाठी सरकार विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमुळे भारत आधुनिक होत आहे. या भवनाच्या माध्यमातून देश विदेशातले लोक भारताची वाढलेली शक्ती बघतील, असं उद्योग आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यावेळी म्हणाले.

****

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेद्वारे जीसॅट-24 या दळणवळण उपग्रहाचं फ्रेंच गयानातल्या कौरु इथल्या अंतरिक्ष केंद्रावरुन आज सकाळी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. इस्रोनं न्यू स्पेस इंडियासाठी हा उपग्रह तयार केला असून, फ्रेंच कंपनी एरियनस्पेसनं तो अंतरिक्षात पाठवण्याची व्यवस्था केली. जीसॅट-24 हा 24-केयु बँड दळणवळण उपग्रह असून, त्याचं वजन चार हजार किलोहून अधिक आहे. डीटीएच सेवेच्या वापरासाठी संपूर्ण भारतात हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे. अंतरिक्ष क्षेत्रातील सुधारणांनंतर न्यू स्पेस इंडियानं हाती घेतलेला मागणीनुसार पुरवठा केलेला पहिला उपग्रह आहे. न्यू स्पेस इंडिया ही अंतरिक्ष विभागाच्या अंतर्गत भारत सरकारची कंपनी असून हा उपग्रह त्यांनी टाटा प्ले कंपनीला पूर्णपणे भाडेतत्वावर दिला आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी, जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरातीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार असून, जर्मनीत २६ आणि २७ जून ला होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान पर्यावरण, ऊर्जा, हवामान, अन्न सुरक्षा, आरोग्य आणि लिंग समानता आणि लोकशाही आदी विषयांवर आपले विचार मांडतील. या महत्वाच्या  मुद्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने या शिखर परिषदेला अर्जेन्टिना, इंडोनेशिया, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिका या लोकशाही असणाऱ्या देशांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २६ जूनला आकाशाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ९०वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १९६ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १४ लाख ९१ हजार ९४१ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९६ कोटी ६२ लाख ११ हजार ९७३ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या १३ हजार ३१३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ३८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दहा हजार ९७२ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ८३ हजार ९९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचं सन २०२१-२२ मधलं थकीत परिरक्षण अनुदान वितरीत करण्यास ग्रंथालय संचालनालयानं मान्यता दिली आहे. ३३ कोटी ७० लाख ४१ हजार रुपयांचं हे अनुदान असून, यासंदर्भातला शासन निर्णय आज जारी करण्यात आल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

****

पावसाळ्यात विविध कारणांमुळे होणारे संभाव्य अपघात लक्षात घेत सार्वजनिक किंवा घरगुती वीज यंत्रणा आणि उपकरणांपासून सावध राहण्याचं आवाहन, महावितरणनं केलं आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास किंवा आपात्कालीन परिस्थितीत मदत पाहिजे असल्यास महावितरणच्या चोवीस तास सुरू असणाऱ्या, एक नऊ एक दोन किंवा एक नऊ एक दोन शून्य या मदत क्रमांकांवर संपर्क साधण्याचं आवाहनही महावितरणनं केलं आहे.

****

उस्मानाबाद इथल्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातला वरीष्ठ लिपिक इजाज अजीम शेख याला दहा हजार रुपयांची लाच घेताना काल रंगेहात अटक करण्यात आली. एका महिला कर्मचाऱ्यांकडून बदलीच्या कामासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी काल गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातल्या मलमपोडूर इथल्या एका इसमाची तीक्ष्ण शस्त्रानं हत्या केली. लकीकुमार ओक्सा असं मृत इसमाचं नाव असून तो बिनागुंडा इथला रहिवासी होता.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...