Sunday, 23 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.10.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 October 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६.१०

****

·      टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर चार गडी राखून रोमहर्षक विजय.

·      भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोचं जून २०२३ मध्ये चांद्रयान ३ चं प्रक्षेपण.

·      परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी.

आणि

·      आनंदाचा शिधा या शिधासंचाचं आजपासून ऑफलाईन पध्दतीने वितरण.

****

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारतानं पाकिस्तानवर चार गडी राखून विजय मिळवला. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत, निर्धारित २० षटकांत आठ बाद १५९ धावा केल्या. अर्शदीप सिंह आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी तीन तीन तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक बळी घेतला. पाकिस्ताननं दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरवात अडखळत झाली. सलामीवीर केएल राहुल आणि कर्णधार रोहीत शर्मा प्रत्येकी चार धावांवर बाद झाले. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने हार्दिक पंड्याच्या साथीने भारताचा डाव सावरत धावसंख्येला आकार दिला. हार्दिक चाळीस धावांवर आणि त्यानंतर आलेला दिनेश कार्तिक एका धावेवर तंबूत परतला. रविचंद्रन अश्विनने विजयी एक धाव काढली. ५३ चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीनं ८२ धावांची नाबाद झंझावाती खेळी करून, रोमहर्षक विजय खेचून आणणारा विराट कोहली, सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. दरम्यान विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या अन्य एका सामन्यात श्रीलंकेनं आयर्लंडचा ९ गडी राखून पराभव केला.

या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी नेदरलंडसोबत होणार आहे.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रो, जून २०२३ मध्ये चांद्रयान ३ चं प्रक्षेपण करणार आहे. चांद्रयान ३ जवळपास पूर्ण तयार असून त्याच्या प्रक्षेपणासंबंधीच्या पूर्व चाचण्याही पूर्ण झाल्या असल्याचं इस्रो चे प्रमुख डॉक्टर सोमनाथ यांनी सांगितलं आहे. ३६ व्यावसायिक उपग्रहाचं काल मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांनी श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि इन स्पेस यांचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान दीपावली निमित्त आज उत्तरप्रदेशात अयोध्येत दीपोत्सव साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं या दीपोत्सवात सहभागी होत आहेत. राम की पौडी याठिकाणी सुमारे १५ लाख पणत्या तर अयोध्येतील अन्य मंदिरांमध्ये सुमारे तीन लाखावर पणत्या लावल्या जाणार आहेत.

****

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. मदतीची ही मागणी शेतकऱ्यांनी केली असून, त्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सध्याचं सरकार हे उत्सवी सरकार असून त्यांच्याकडे भावनेचा दुष्काळ असल्याची टीका ठाकरे यांनी केली. पंचनामे आणि इतर कार्यवाही होत राहील, मात्र नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली. ते म्हणाले...

हे अस्मानी संकट आल्यानंतर सरकारचं कर्तव्य असतं की, शेतकऱ्याला उघड्यावरती पडू द्यायचं नाही, त्याचं घरदार उघड्यावरती पडता कामा नये. हे उत्सवी सरकार आहे. पण उत्सव साजरे करताना आपल्या राज्यातील प्रजा ही समाधानी आहे की नाही? हे पाहणं हे त्या त्या राज्यकर्त्याचं काम असतं आणि त्या कामामध्ये, त्या कर्तव्यामध्ये हे सरकार अपयशी ठरतय. पंचनामे होतील तेव्हा होतील ओला दुष्काळ खरं म्हणजे जाहीर आतापर्यंत करायला पाहिजे होता पण भावनेचा दुष्काळ असल्यामुळे सरकार ते करेल असं वाटत नाही. माझ्या शेतकऱ्याला तत्काळ मदत ही मिळालीच पाहिजे. आणि ते म्हणताय हेक्टरी पन्नास हजार रुपये ही मागणी त्यांची आहे, आणि त्या मागणीला शिवसेनेचा पूर्ण पाठींबा आहे.

या पत्रकार परिषदेपूर्वी ठाकरे यांनी गंगापूर तालुक्यामधील दहेगाव शिवार इथं पाहणी केली. पेंढापूर इथं त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नसल्याचं, कृषीमंत्री सांगत आहेत, त्यामुळे प्रत्यक्ष स्थिती पाहण्यासाठी हा आपला प्रतिकात्मक दौरा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

****

राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक अनुदान तसंच पीकविमा या दोन्हीही प्रकारची मदत करण्याची गरज असल्याचं, परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. आज बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात मुंडे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली, त्यानंतर मुंडे यांनी राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम कुमार गुप्ता तसंच कृषी विभागाचे सचिव एकनाथ डावले यांना शेतीच्या बांधावरून थेट फोन करून नुकसानाची माहिती दिली. शेतकऱ्यांशीही मुंडे यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला, राज्य सरकारकडे मदतीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील बुट्टे वडगाव इथल्या अतिवृष्टीमुळे बाधित चव्हाण कुटुंबाला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीची मदत केली आहे. चव्हाण कुटुंबातील ऋषिकेश चव्हाण या चिमुकल्याचं वृत्त माध्यमांमधून प्रसारित झालं होतं, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ऋषिकेश चव्हाण ची भेट घेतली. आणि दिवाळी साठी ऋषिकेश सह चव्हाण कुटुंबियांना कपडे, मिठाई, फटाके तसंच ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.

****

आयुर्वेद दिन आज सर्वत्र साजरा केला जात आहे. केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जनतेला आयुर्वेद दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. देशातील नागरिकांनी हजारो वर्षांपासूनच्या आयुर्वेद उपचार पद्धतीचं महत्व समजून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या सातव्या आयुर्वेद दिन समारोहात ते बोलत होते.

हिंगोलीमध्ये यानिमित्ताने निमा या डॉक्टरांच्या संघटनेतर्फे निमा वॉकेथॉन घेण्यात आली. त्याआधी धन्वंतरी पूजन करण्यात आलं.

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दीपावली निमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आनंद, चैतन्य आणि प्रकाशाचा हा सण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, संपन्नता आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

प्राधान्य कुटूंब आणि अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा या शिधासंचाचं वितरण आजपासून ऑफलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ आणि १ लिटर पामतेल या चार वस्तू लवकरात लवकर मिळू शकतील अशी माहिती अन्न, नागरी आणि पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. हा शिधा पीओएस मशीनद्वारे ऑनलाईन नोंद करून वाटप केला जात होता, मात्र इंटरनेटच्या माध्यमातून ही प्रक्रिया संथगतीने होत असल्यामुळे ऑफलाईन पद्धतीने वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी या ऑफलाईन वितरणाचा लाभ आपापल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन घ्यावा असं आवाहन चव्हाण यांनी केलं आहे.

दरम्यान, आनंदाचा शिधा किट घेण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या स्वस्त धान्य दुकानांवर नागरिकांनी गर्दी केली आहे. तांत्रिक अडचणींमुळे नोंदवहीत नोंद घेऊन शिधा किट वाटप करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडूनही केली जात होती.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील सुमारे २ हजार स्वस्त धान्य दुकानांद्वारे ५ लाख ९७ हजार ८१२ शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप केला जात असल्याचं खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितलं आहे. नांदेड इथं “आनंदाचा शिधा” वाटपाचा प्रातिनिधिक शुभारंभ करतांना ते आज बोलत होते. अत्यंत कमी कालावधीत हे किट जनतेपर्यंत यशस्वीपणे पोहचवले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.

****

दहावीची परीक्षा यंदा १०० टक्के अभ्यासक्रमावर घेतली जाणार आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली. कोविड काळात झालेल्या परीक्षांमध्ये अभ्यासक्रमात मंडळाकडून कपात करण्यात आली होती. यंदा मात्र दहावीच्या प्रश्नपत्रिका शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरायला प्रारंभ झाला असून अर्ज भरण्याची शेवटची मुदत १० नोव्हेंबरपर्यंत आहे. पुनर्परीक्षार्थींसाठी अर्ज भरण्याची मुदत ११ ते २५ नोव्हेंबर अशी आहे. मार्च महिन्यात या परीक्षा होणार आहेत.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...