Monday, 21 November 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.11.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 November 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१०

****

·      सीमा प्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी राज्यसरकारकडून दोन मंत्र्यांची नियुक्ती.

·      पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांची धडपड केविलवाणी-भाजपची टीका तर कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी राज्यपालांविरोधात आजही आंदोलन.

·      आकाशवाणी आणि दूरदर्शनची विश्वासार्हता आजही कायम-प्रसारभारतीचे नवनियुक्त सीईओ गौरव द्विवेदी.

आणि

·      ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष तसंच महिला संघांची विजयी घोडदौड कायम.

****

सीमा प्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीमा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उच्चाधिकारी समितीची सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत सूचना केली होती.

यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी ज्येष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन यांची नियुक्ती करण्यात आली असून, समन्वयासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

सनदशीर मार्गाने सीमा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असून आम्ही सीमावासीयांबरोबर आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ सीमा भागातील बांधवांना प्रभावीपणे मिळावा, यासाठी सीमा प्रश्न हाताळणाऱ्या विशेष कक्षाचं बळकटीकरण करावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ पूर्वीप्रमाणे सीमा भागात देण्यास तसंच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देखील सीमा भागातील नागरिकांना देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 

दरम्यान, आपण मांडलेल्या सूचनांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवत मान्यता दिल्याचं दानवे यांनी सांगितलं. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सीमा भागातल्या ८६५ गावांना बंद झालेले मुख्यमंत्री धर्मदाय योजनेतून मिळणारे लाभ पुन्हा सुरू करावेत, यासह अनेक विनंतीवजा सूचना आपण केल्या, मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवत त्या तत्काळ मान्य केल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

****

हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र उत्तम पर्याय असून अमेरिकेसारख्या देशानं अधिकाधिक गुंतवणूक करावी असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी यांनी फडणवीस यांची आज मुंबईत त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी फडणवीस बोलत होते. अमेरिका - महाराष्ट्र द्वी-पक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी राज्य शासनाच्या योजना आणि प्राधान्यक्रम याबाबत फडणवीस यांनी यावेळी माहिती दिली. देशाला हरित ऊर्जेच्यादृष्टीने समर्थ करण्यासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी महाराष्ट्र पावलं उचलत असून, यासाठी अमेरिकेनं सहकार्य करावं असं आवाहन फडणवीस यांनी केलं.

****

जनादेशाची पर्वा न करता सत्ता मिळवताना लोकशाहीचे सामान्य संकेत झुगारणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी सुरू असलेली धडपड केविलवाणी असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. हिंसाचार करून गरीबांना वेठीस धरणाऱ्या आणि देशात अस्थिरता माजवणाऱ्या नक्षलवाद्यांचे उघड समर्थन करणाऱ्यांच्या साथीने उद्धव ठाकरे लोकशाही वाचवणार की लोकशाही संकटात टाकणार असा सवालही उपाध्ये यांनी केला. वैचारिक विरोधावर विश्वास नसलेल्या तसंच दहशत माजवण्याचाच इतिहास असलेल्या संभाजी ब्रिगेडसोबतही ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी युती केली. हिंदुत्वाची अस्मिता असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची निंदा करणाऱ्या काँग्रेसपुढे ज्यांनी गुडघे टेकले, ते उद्धव ठाकरे लोकशाही संकटात असल्याचा कांगावा करतात हे हास्यास्पद असल्याचं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल कथित अवमानकारक विधान केल्याविरोधात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आज मुंबईत गिरगाव चौपाटी इथं शिवसेनेच्यावतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन तसंच निषेधाचे फलक दाखवून आपला विरोध दर्शवला,  पोलिसांनी अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांना ताब्यात घेतलं.

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एका दूरचित्रवाहिनीला मुलाखत देताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल धुळ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यपाल आणि त्रिवेदी यांच्या प्रतिमेस जोडे मारुन प्रतिमा दहन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तीव्र शब्दात दोघांचा निषेध केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात राज्यपालांच्या निषेधात आंदोलन करण्यात आलं.

औरंगाबाद इथल्या मुकुंदवाडी इथं महाविकास आघाडीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी फलक झळकावत राज्यपालांविरोधात घोषणा देत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

****

हुतात्मा स्मृति दिनानिमित्त दक्षिण मुंबईत शिवेसेनेनं हुतात्मा स्मारक इथं संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आज अभिवादन केलं. हुतात्मा स्मारक इथं शिवेसना सचिव खासदार अनिल देसाई, लोकसभा खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं.

****

आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांची विश्वासार्हता आजही कायम असल्याचं, प्रसारभारतीचे नवनियुक्त सीईओ - मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी म्हटलं आहे. द्विवेदी यांनी आज प्रसारभारतीच्या सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारला, त्यानंतर ते बोलत होते. आकाशवाणी आणि दूरदर्शन हे दोन्ही विभाग अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मानस, द्विवेदी यांनी व्यक्त केला.

****

२०२३-२४ च्या अर्थसंकल्पाच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज दूरदृश्यप्रणाली द्वारे बैठक घेतली. या बैठकीला अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पंकज चौधरी, केंद्रीय अर्थसचिव डॉ. टी.व्ही. सोमनाथन आणि मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अनंत नागेश्वरन यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. सीतारमण यांनी अर्थसंकल्पासंदर्भातील सल्लामसलतीसाठी आज उद्योग क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि हवामान बदल क्षेत्रातील तज्ञांच्या पहिल्या गटाशी चर्चा केली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या रोजगार मेळाव्यात देशभरातल्या ७१ हजार कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रं प्रदान केली जाणार आहेत. आभासी माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान सर्व कर्मचाऱ्यांना संबोधित करतील. देशभरात ४५ ठिकाणी ही नियुक्तीपत्रं कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रदान केली जातील. या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांच्या हस्ते कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूललाही सुरवात केली जाईल. नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता, नैतिकता, सत्यनिष्ठा आणि मनुष्यबळासंबंधीच्या धोरणांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे.

****

उस्मानाबाद इथं सुरु असलेल्या ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत पुरुष तसंच महिला संघाने विजयी घोडदौड कायम राखली आहे. पुरुष संघाने उत्तराखंडवर तर महिला संघाने अरुणाचल प्रदेश वर विजय मिळवला. महिलांच्या सामन्यात महाराष्ट्रने अरुणाचल प्रदेशचा १८-३ असा एक डाव १५ गुणांनी एकतर्फी धुव्वा उडवला. पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने उत्तराखंडवर १७-७ असा पराभव केला. महिलांच्या दुसऱ्या एका सामन्यात गोव्याने सीमा सुरक्षा दलाचा १८-४ असा पराभव करत एक डाव १४ गुणांनी विजय मिळवला. पुरुषांच्या अन्य एका सामन्यात विदर्भाने जम्मू-काश्मीरवर २३-८ असा एकतर्फी विजय मिळवला.

****

पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद अहमदनगरला मिळालं आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आमदार संग्राम जगताप हे यंदाच्या स्पर्धेचे आयोजक असणार आहेत. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ही स्पर्धा होण्याची शक्यता असून तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. यंदा या स्पर्धेत ३४ जिल्ह्यांसह ११ महानगरपालिकांचे संघ सहभागी होणार असल्याची माहिती कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी दिली. सर्व जिल्हा संघांना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी संघ पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासाठी जिल्ह्यांनी निवडचाचणी स्पर्धा आयोजित केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...