Thursday, 1 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.12.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 December 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत १९ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. विधानसभेच्या ८९ जागांसाठी एकूण ७८८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी येत्या पाच तारखेला मतदान होणार असून, मतमोजणी आठ डिसेंबरला होणार आहे.

****

जागतिक एड्स दिन आज पाळला जात आहे. ‘आपली एकता, आपली समानता, एचआयव्हीसह जगणाऱ्याकरीताही यंदाच्या एड्स दिनाची संकल्पना आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त आज औरंगाबाद शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली. औरंगाबाद जिल्हा एड्स प्रतिबंध, नियंत्रण पथक आणि जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं ही जनजागृती फेरी काढण्यात आली. ही फेरी शहरातल्या क्रांती चौक, जिल्हा परिषद मार्गानं मराठवाडा सांस्कृतिक मंडळ खडकेश्वर इथं संपन्न झाली. यावेळी एडस जनजागृती संदर्भातील फलक हातात घेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

****

राज्यात विविध जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी फलाईन अर्थात पारंपारिक पद्धतीनंही उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे. तसं, अर्ज सादर करण्याची मुदत उद्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज दिली. यापूर्वी निवडणूक आयोगानं उद्या दोन डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सूचना केली होती.

****

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाशी संबंधित उपक्रमांमधे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त वातावरण तयार करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज त्यांनी याबाबतच्या संदेशात व्यक्त केली आहे.

****

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची गती वाढवण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते. या योजनेत ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची असून, ग्रामसेवकांनी त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली कामं गुणवत्तापूर्ण आणि अधिक गतीनं करावीत, फलोत्पादन विभागामार्फत प्रायोगिक तत्त्वावर एक आधुनिक कांदाचाळ निर्माण करुन त्याचा खर्च, कांद्याची सुरक्षा, शेतकऱ्यांना होणारा फायदा - तोटा आदी अभ्यास करण्याच्या सूचना भुमरे यांनी यावेळी दिल्या.

****

मुंबईत गोरच्या रुग्णांची संख्या ३२३ इतकी झाली असून, या आजारानं आठ बालकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गोवरच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दोन लाख ३० हजार घराचं सर्वेक्षण करण्यात आलं.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात औरंगाबाद जिल्ह्यातल्या आठ ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री, पैठण, करमाड या ठिकाणी हे आंदोलन होत आहे. विरोधी पक्षनेता जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद पुणे महामार्गावर गंगापूर इथल्या इसारवाडीफाटा इथं चक्वा जाम आंदोलन करण्यात आलं. राज्यभर शेतकऱ्यांकडून कृषीपंपासाठी वीज देयकाची सक्तीनं वसुली, पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडित करणं, तसंच पिक विमा कंपन्यांचा भोंगळ कारभार आणि बेशिस्त वागणुकीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती दानवे यांनी यावेळी दिली. या आंदोलनामुळे औरंगाबाद - पुणे महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाल्यानं पोलिसांनी दानवे आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

****

औरंगाबाद शहरातल्या रिक्षा चालकांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. हे आंदोलन शांततेत सुरु असून शहरातले सर्व रिक्षा चालक उत्स्फुर्तपणे या बंदमध्ये सहभागी झाले असल्याची माहिती औरंगाबाद रिक्षा चालक मालक कृती समितीचे अध्यक्ष सलिम खामगावकर यांनी दिली. रिक्षा मीटर कॅलेब्रेशनसाठी २८ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, वाहतूक पोलिसांची शहरात रिक्षा चालकांविरोधात मोहिम सुरु असून रिक्षा चालकांना २८३ च्या कलमाखाली गुन्हे दाखल करुन नये आदि मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना समितीच्या शिष्टमंडळानं आज सादर केलं.

****

औरंगाबाद शहरातल्या तीन मार्गांवर महापालिकेची स्मार्ट शहर बस सेवा आजपासून सुरु झाली आहे. यामध्ये सिडको ते रेल्वेस्थानक, रेल्वे स्थानक ते रेल्वेस्थानक रिंग रुट आणि रेल्वे स्थानक ते हर्सूल टी पॉईट मार्गाचा समावेश आहे. विद्यार्थी आणि प्रवाश्यांच्या मागणीनुसार या मार्गावर शहर बस सेवा सुरु झाली असून, शहरात आता २८ मार्गांवर ७० शहर बस धावत असल्याची माहिती औरंगाबाद स्मार्ट शहर बस विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे.

//**********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...